Sunday, 19 July 2020

‘व्हायरस कवच फॅब्रिक स्प्रे’ संशोधन

शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचे

मंत्री उदय सामंत यांच्याकडून अभिनंदन

महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना 'व्हायरस कवच फॅब्रिक स्प्रे'चा नमुना सादर करताना संशोधक डॉ. किरणकुमार शर्मा. सोबत (डावीकडून) आमदार राजेश पाटील, प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, इकोसायन्स इनोव्हेशनचे अजय म्हेतर, डॉ. पी.एस. पाटील, आमदार ऋतुराज पाटील. 


कोल्हापूर, दि. १९ जुलै: शिवाजी विद्यापीठाने संशोधित केलेले व्हायरस कवच फॅब्रिक स्प्रे हे कोरोना विषाणूचा साखळी तोडण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे उत्पादन आहे. या संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठातील संशोधक अभिनंदनास पात्र आहेत, असे गौरवोद्गार राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे काढले.

शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्कूलचे सेंटर फॉर नॅनो फॅब्रिक्स येथील संशोधक डॉ. किरणकुमार शर्मा यांनी संशोधित केलेल्या या उत्पादनाचा नमुना आज मंत्री. श्री. सामंत यांना सकाळी सादर करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री श्री. सामंत म्हणाले, कोरोनाच्या काळात संपूर्ण जगभरात त्याला प्रतिबंध करण्यासाठीचे संशोधन सुरू झाले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी सुद्धा या काळात परिश्रम घेऊन एक महत्त्वपूर्ण उत्पादन जगातील आघाडीच्या प्रयोगशाळेतून तपासून सिद्ध केले आहे, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाने गेल्या तीन महिन्यांत लॉकडाऊनच्या कालखंडात सामाजिक जबाबदारी व बांधिलकीच्या भावनेतून आपली विद्यार्थी वसतिगृहाच्या तीन इमारती तसेच तंत्रज्ञान अधिविभागाच्या तीन इमारती अशा सहा इमारती जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केल्या. या ठिकाणी सुमारे दोन हजार व्यक्तींच्या क्वारंटाईन व उपचारांची व्यवस्था होऊ शकली. ही बाबही अत्यंत अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.


Saturday, 18 July 2020

शिवाजी विद्यापीठाचे कोरोनाबाबत महत्त्वपूर्ण संशोधन

‘व्हायरस कवच’ फॅब्रिक स्प्रेची निर्मिती

कोरोना विषाणूला ९९ टक्क्यांहून अधिक निष्क्रिय करण्याची क्षमता


शिवाजी विद्यापीठाच्या सेंटर फॉर नॅनो फॅब्रिक्सतर्फे संशोधित 'व्हायरस कवच फॅब्रिक स्प्रे' कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना सादर करताना इकोसायन्स इनोव्हेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत म्हेतर. सोबत (डावीकडून) डॉ. किरणकुमार शर्मा, डॉ. पी.एस. पाटील, अजय म्हेतर व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर.
 
शिवाजी विद्यापीठाच्या सेंटर फॉर नॅनो फॅब्रिक्सतर्फे संशोधित 'व्हायरस कवच फॅब्रिक स्प्रे'ची बाटली कुतुहलाने पाहताना प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर. 


कोल्हापूर, दि. १८ जुलै: संपूर्ण जगाला ग्रासलेल्या कोविड-१९ अर्थात कोरोना या विषाणूला निष्क्रिय करू शकणारे महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक संशोधन येथील शिवाजी विद्यापीठाच्या नॅनोफॅब्रिक्स सेंटरच्या संशोधकांनी केले आहे. येथे संशोधित करण्यात आलेल्या व्हायरस कवच या फॅब्रिक स्प्रे (कपड्यांवर मारावयाचा फवारा) तंत्रज्ञानामुळे कोरोना व्हायरससह अन्य अनेक घातक विषाणूंना निष्क्रिय करणे शक्य होणार आहे. ही माहिती प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी आज येथे दिली.

विद्यापीठात आज सकाळी नॅनोसायन्स व तंत्रज्ञान स्कूलचे संशोधक डॉ. किरणकुमार शर्मा यांच्यासह या उत्पादनाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पुणे येथील इकोसायन्स इनोव्हेशन प्रा.लि. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत म्हेतर, संचालक अजय म्हेतर यांनी कुलगुरू डॉ. करमळकर व कुलसचिव डॉविलास नांदवडेकर यांना भेटून या अत्यंत महत्त्वपूर्ण संशोधन व उत्पादनाबद्दल माहिती दिली. व्हायरस कवच तंत्रज्ञानाच्या प्रभावाने कोविड-१९ विषाणू ९९.९९ टक्क्यांपेक्षाही अधिक निष्क्रिय झाल्याचे आंतरराष्ट्रीय चाचण्यांमध्ये आढळल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शिवाजी विद्यापीठाच्या सेंटर ऑफ नॅनोफॅब्रिक्सचे संशोधक प्रा. किरणकुमार शर्मा यांनी प्रा. पी.एस. पाटील आणि डॉ. किरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या संदर्भातील महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे.

काय आहे संशोधन?


व्हायरस कवच फॅब्रिक स्प्रे तंत्रज्ञान हे वापरावयास अत्यंत सुलभ व सोपे आहे. हा स्प्रे फक्त आपल्या कपड्यांवर फवारायचा आहे. वाळल्यानंतर पुढे तो कपडे धुवून टाकेपर्यंत आपल्याभोवती संरक्षक कवचाप्रमाणे ते काम करते. कपडे धुतल्यानंतर पुन्हा त्यावर हे फवारले की झाले. यामध्ये केवळ सेंद्रिय कार्बोक्झिलिक अॅसिडची संयुगे आहेत, जी अजिबात विषारी नाहीत, तर पर्यावरणपूरक आहेत, असा दाखला अमेरिकेतील पर्यावरण सुरक्षा एजन्सी- ‘USEPA’ ने दिला आहे. त्याला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मान्यताही दिलेली आहे.

काय आढळले चाचण्यांत?

व्हायरस कवचया उत्पादनाच्या देशासह जगातील आघाडीच्या प्रयोगशाळांत चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विविध घातक विषाणूंना निष्क्रिय करण्याच्या त्याच्या गुणधर्मावर शिक्कामोर्तब झाले आहे. याचे अँटिमायक्रोबायल गुणधर्म तपासण्यासाठी व्हायरस कवच फवारलेल्या कपड्याच्या पृष्ठभागावर ग्राम-पॉझिटिव्ह प्रकारांतील (स्टॅफिलोकोकस ऑरेयस) आणि ग्राम-निगेटिव्ह प्रकारांतील (इशेरिषिया कोलाय) जीवाणूंचा सुमारे १५ मिनिटे संपर्क आला असता ती ९९.९९ टक्क्यांहूनही अधिक निष्क्रिय झाल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे या स्प्रेच्या अँटिव्हायरल गुणधर्मांची तपासणी अमेरिकेतील बायोसेफ्टी लेव्हल-४ प्रयोगशाळेत करण्यात आली. या ठिकाणी व्हायरस कवचफवारलेल्या कपड्यांवर सार्स-कोव्ह-२ हा कोविड-१९ साथीला जबाबदार असलेला विषाणू सुद्धा ९९.९९ टक्क्यांहून अधिक निष्क्रिय झाल्याचे आढळून आले. अमेरिकेतील बी.एस.एल.-४ ही प्रयोगशाळा फॅब्रिक अॅनालिसिसमध्ये जगातल्या आघाडीच्या सहा लॅबपैकी एक असून तेथील निष्कर्ष जगभरात मान्य केले जातात.

कशी होणार उपलब्धता?

व्हायरस कवच फॅब्रिक स्प्रे हा लवकरच सर्व महत्त्वाच्या औषध दुकानांमधून सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. याची किंमत २५० मि.ली. बाटलीसाठी रु. २७० तर ५०० मि.ली. साठी रु. ४९५ इतकी असणार आहे. सध्या पुण्यातील इकोसायन्सच्या प्रकल्पाची सुमारे ५००० बाटल्या प्रतिदिन इतकी उत्पादन क्षमता आहे.

विद्यापीठाच्या नॅनोसायन्स व तंत्रज्ञान विभागाचे मोलाचे संशोधन

शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स व तंत्रज्ञान विभागामध्ये गतवर्षी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाच्या (रुसा) अंतर्गत प्राप्त निधीमधून सेंटर फॉर नॅनो-फॅब्रिक्स सुरू करण्यात आले. नॅनो तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आधुनिक कपड्यांच्या निर्मितीसाठीचे संशोधन या ठिकाणी व्हावे, अशी अपेक्षा त्यामागे आहे. केंद्राने पहिल्याच दणक्यात साऱ्या जगाची डोकेदुखी असणाऱ्या कोविड-१९ या विषाणूला निष्क्रिय करणाऱ्या संयुगाची निर्मिती करून प्रभावी कामगिरी करून दाखविली आहे. व्हायरस कवच संयुगाच्या संशोधनाने भारत सरकारच्या निती आयोगातर्फे घेण्यात आलेल्या अटल इनोव्हेशन मिशन (AIM) या स्पर्धेत पहिल्या पाच अभिनव संशोधनांत स्थान मिळविले होते. या संशोधनाला मूर्त स्वरुप देऊन समाजापर्यंत आणण्यासाठी इकोसायन्स इनोव्हेशन प्रा.लि. ने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.


शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक उत्तरदायित्वाची प्रचिती देणारे संशोधन: कुलगुरू डॉ. करमळकर

कोविड-१९ साथीला आटोक्यात आणण्याबरोबरच या कोरोना विषाणूला अटकाव करण्यासाठीचे संशोधन साऱ्या जगभरात सुरू आहे. प्रत्येक समाजघटक आपापल्या परीने त्यासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतात आणि महाराष्ट्रात तर या विषाणूने कहर मांडला आहे. या पार्श्वभूमीवर, शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स विभागातील प्रा. कििरणकुमार शर्मा यांनी व्हायरस कवच या संयुगाची निर्मिती करून आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाची प्रचिती दिली आहे. त्यांची कामगिरी अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी काढले.

कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले, सार्स-कोव्ह-२ हा विषाणू एखाद्या पृष्ठभागावर सात सात दिवस राहू शकतो. इतका दीर्घकाळ टिकून राहण्याचा चिवटपणा असल्यामुळे त्याच्या स्पर्शातून संसर्गाची शक्यताही अधिक असते. यामध्ये आपल्या शरीरावरील कपड्यांचा वाटाही मोठा असू शकतो. आज कोरोना विषाणूच्या सामाजिक संसर्गाची साखळी तोडणे हेच आपल्यासमोरील प्रमुख आव्हान आहे. अशा वेळी व्हायरस कवच तंत्रज्ञानामुळे ती साखळी तोडण्याचे एक सक्षम अस्त्र आपल्या हाती आले आहे. त्यासाठी शिवाजी विद्यापीठातील डॉ. किरणकुमार शर्मा यांच्यासह इकोसायन्स इनोव्हेशनमधील सर्व तंत्रज्ञ अभिनंदनास पात्र आहेत.


Thursday, 16 July 2020

शिवाजी महाराजांचा इतिहास आजही प्रेरणादायी: कुलपती भगतसिंह कोश्यारी

शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे आयोजित 'प्रेरणा-२०२०' शिबिराच्या समारोप समारंभात ऑनलाईन मार्गदर्शन करताना महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी.

शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे आयोजित 'प्रेरणा-२०२०' शिबिराच्या समारोप समारंभात ऑनलाईन मार्गदर्शन करताना महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी.

शिबिराच्या समारोप समारंभात सहभागी झालेले कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्रा. अभय जायभाये आदी.

प्रेरणा-२०२० शिबिराचा ऑनलाईन समारोप

कोल्हापूर, दि. १६ जुलै: छत्रपती शिवाजी महाराज हे अखिल भारताचे प्रेरणास्थान असून त्यांचा इतिहास आजही आपल्याला देशाप्रती आपले कर्तव्य निभावण्यासाठी प्रेरित करणारा आहे. आजच्या युवा पिढीने त्यापासून प्रेरणा घेत देशकार्याला सिद्ध व्हावे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी काल सायंकाळी केले.

महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रेरणा-२०२० या राज्यस्तरीय नेतृत्वगुण विकास प्रशिक्षण शिबिराच्या ऑनलाईन समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संबोधित करताना श्री. कोश्यारी बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर होते.

कुलपती श्री. कोश्यारी म्हणाले, आज शिवाजी महाराजांचे जीवन व कार्य हीच आजच्या तरुणांसाठी प्रचंड मोठी प्रेरणाशक्ती आहे. महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण वाटचाल करण्याचा निर्धार करावा. या शिबिरात पद्मश्री पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या मान्यवरांचा आदर्श ठेवून आपण देशकार्य करण्यासाठी सज्ज व्हायला हवे. त्यांच्याप्रमाणे चांगल्या कामासाठीचे पुरस्कार आपल्यालाही मिळायला हवेत, अशी जिद्द ठेवून काम करीत राहायला हवे. आत्मविश्‍वास, संयम आणि स्वयंशिस्तीच्या बळावर ही गोष्ट साध्य करण्यात काहीच अडचण येणार नाही.

कुलपती श्री. कोश्यारी पुढे म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात शिवाजी विद्यापीठाने राज्यस्तरीय नेतृत्व गुणविकास शिबिर आयोजित करून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्त्व विकासाची संधी उपलब्ध करून दिली, ही अभिमानास्पद बाब आहे. विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतो, तेव्हा ते कार्यक्रम इंग्रजीतून होतात, पण आपण मराठीतून सुरवात केली, याचा मला मनस्वी आनंद झाला. कारण आपली मातृभाषा ही आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आपल्या भाषेतून सर्वांशी संवाद साधण्यावर आपण भर द्यायला हवा. 

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले, युवकांमध्ये प्रेरणा ही महापुरुषांच्या चरित्रांतून, व्यक्तिमत्त्वांतून येते. युवा जीवनात अशा आदर्श व्यक्तींना मानाचे स्थान असते. या प्रेरणा शिबिरांतर्गत डॉ. अभय बंग, पोपटराव पवार, डॉ.प्रकाश आमटे, इंद्रजित देशमुख, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, डॉ. भास्कर पेरे-पाटील, सयाजी शिंदे, डॉ. अविनाश पोळ इत्यादी मान्यवरांशी विद्यार्थ्यांचा ऑनलाईन संवाद घडविण्यात आला. हे पिढी घडविण्याचेच काम आपण करीत आहोत. विद्यार्थ्यांनीही हे विचार संचित आयुष्यभर जपावे आणि जीवनाचे सार्थक करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या समारोप समारंभाच्या सुरवातीला राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा. अभय जायभाये यांनी स्वागत केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर  यांनी प्रास्ताविक केले. राज्य संपर्क अधिकारी डॉ. अतुल साळुंके यांनी शिबिराचा आढावा सादर केला. कुलपती नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य अमित कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले तर व प्रा. ज्ञानराजा चिघळीकर यांनी आभार मानले. शिबिरात युट्युब व वेबेक्सच्या माध्यतून महाराष्ट्रातील एनएसएस स्वयंसेवक, स्वयंसेविका, संचालक, कार्यक्रम अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.


Wednesday, 1 July 2020

लॉकडाऊनमध्ये मुद्रित माध्यमे अधिक विश्‍वासार्ह!

शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता अध्यासनाच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष



कोल्हापूर, दि. १ जुलै: लॉकडाऊनच्या काळातही डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या तुलनेत मुद्रित माध्यमे अधिक विश्‍वासार्ह आहेत, से निरीक्षण संशोधनातून सामोरे आले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री (कै.) डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने करण्यात आलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणात मुद्रित माध्यमांवरच सर्वाधिक विश्‍वास व्यक्‍त करण्यात आला आहे. अध्यासनाच्या पी. जी. डिप्लोमा इन ऑनलाईन जर्नालिझम या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी हे सर्वेक्षण केले असल्याची माहिती समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी दिली आहे.
कोविड-१९ साथीमुळे राज्य आणि केंद्र सरकारने सुरक्षिततेचा उपाय म्हणून लॉकडाऊन घोषित केला. या लॉकडाऊनच्या काळात विविध प्रसारमाध्यमांचा कशा पद्धतीने उपयोग केला जातो आहे, याचा अभ्यास अध्यासनाच्या वतीने करण्यात आला. पारंपरिक, मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि वेब माध्यमांना वाचक, श्रोते-दर्शक आणि वापरकर्ते कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे अभ्यासाचे उद्दीष्ट होते. या काळात कोणत्या माध्यमांतून येणारी माहिती अधिक विश्‍वासार्ह वाटते, याची माहिती जाणून घेण्याचाही या अभ्यासातून प्रयत्न करण्यात आला, अशी माहितीही डॉ. जाधव यांनी दिली.
लॉकडाऊनच्या काळात माध्यमांच्या वापरासंदर्भातील प्रश्‍नावली तयार करण्यात आली. ही प्रश्‍नावली ऑनलाईन पद्धतीने भरून घेण्यात आली. महाराष्ट्रासह इतर राज्यांतीलही उत्तरदात्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. एकूण ३०० हून अधिक जणांनी प्रश्‍नावली भरून दिली.
प्रश्‍नावलीचे विश्‍लेषण केले असता, मुद्रित माध्यमे सर्वाधिक विश्‍वासार्ह असल्याचे मत ६९.३ टक्के उत्तरदात्यांनी नोंदवले. १९.६ टक्के लोकांनी इंटरनेट तसेच मोबाईलवरील माहिती विश्‍वासार्ह आहे, असे म्हटले; तर, ८.१ टक्के जणांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमातील माहिती विश्‍वासार्ह वाटत असल्याचे मत व्यक्‍त केले. टक्के लोकांना पारंपरिक माध्यमे विश्‍वासार्ह वाटतात. याचाच अर्थ नागरिकांना मुद्रित माध्यमांची विश्‍वासार्हता इतर माध्यमांच्या तुलनेत कैक पटीने अधिक वाटत असल्याचेच दिसून येते.
लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. सोशल मीडियासाठी लोकांनी लॉकडाऊनच्या काळात पूर्वीपेक्षा अधिक वेळ दिला. लॉकडाऊनपूर्वी सोशल मीडियासाठी दिवसातील ते तास वेळ देणार्‍यांची संख्या २०.३ टक्के होती. पण लॉकडाऊनच्या काळात ही संख्या वाढून ३९.५ टक्के म्हणजे जवळजवळ दुप्पट झाली. लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियापैकी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर सर्वाधिक होत असल्याचेही अभ्यासात दिसून आले. ५५.७ टक्के लोक लॉकडाऊनमध्ये व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करत आहेत. युट्यूब, ट्विटर, फेसबुक यासह अन्य माध्यमांपेक्षाही व्हॉट्सअ‍ॅपसाठी जास्तीत जास्त वेळ दिला जात असल्याचे हा अभ्यास सांगतो.
इलेक्ट्रॉनिक वृत्त माध्यमांचाही यावेळी अभ्यास करण्यात आला. यामध्ये मराठी वृत्तवाहिन्या पाहण्याकडे अधिक लोकांचा कल असल्याचे समोर आले. ६३.२ टक्के लोक माहिती मिळविण्यासाठी मराठी वृत्तवाहिन्या पाहतात. हिंदी आणि इंग्रजी वृत्तवाहिन्या पाहणार्‍यांची संख्या तुलनेने कमी आहे. स्थानिक भाषेतील माध्यमे वापरणे सोयीचे असल्याने बहुतेक लोक मराठी वृत्तवाहिन्या पसंत करत आहेत. लॉकडाऊनपूर्वी वृत्तवाहिन्या पाहण्याची वेळ कमी होती. लॉकडाऊनच्या काळात वृत्तवाहिन्या पाहण्यासाठी दर्शकांकडून अधिकचा वेळ दिला जात आहे.
लॉकडाऊनच्या काळात माहिती मिळविण्यासाठी मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक तसेच वेब माध्यमांचा आधार घेण्यात आला. परंतु माहितीची सत्यता आणि विश्‍वासार्हता आदींसाठी मुद्रित माध्यमांवरच अद्यापही लोकांची भिस्त आहे. याच काळात इतर माध्यमांना वेळ देण्याचे प्रमाण वाढले असले तरी वस्तुनिष्ठ माहितीसाठी लोक मुद्रित माध्यमांचाच आधार घेत असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.