कोल्हापूर, दि. १ जुलै: लॉकडाऊनच्या
काळातही डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या तुलनेत मुद्रित माध्यमे अधिक विश्वासार्ह आहेत, असे निरीक्षण संशोधनातून सामोरे आले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री (कै.) डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने करण्यात आलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणात मुद्रित माध्यमांवरच सर्वाधिक विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. अध्यासनाच्या पी.
जी. डिप्लोमा इन ऑनलाईन जर्नालिझम या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी हे सर्वेक्षण केले असल्याची
माहिती समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी दिली आहे.
कोविड-१९ साथीमुळे राज्य आणि केंद्र सरकारने सुरक्षिततेचा
उपाय म्हणून लॉकडाऊन घोषित केला. या लॉकडाऊनच्या काळात विविध प्रसारमाध्यमांचा कशा
पद्धतीने उपयोग केला जातो आहे,
याचा अभ्यास अध्यासनाच्या वतीने करण्यात
आला. पारंपरिक, मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि वेब माध्यमांना वाचक, श्रोते-दर्शक आणि वापरकर्ते कसा प्रतिसाद
देतात, हे पाहणे अभ्यासाचे
उद्दीष्ट होते. या काळात कोणत्या माध्यमांतून येणारी माहिती अधिक विश्वासार्ह
वाटते, याची माहिती जाणून
घेण्याचाही या अभ्यासातून प्रयत्न करण्यात आला, अशी माहितीही डॉ. जाधव यांनी दिली.
लॉकडाऊनच्या काळात माध्यमांच्या वापरासंदर्भातील प्रश्नावली तयार करण्यात
आली. ही प्रश्नावली ऑनलाईन पद्धतीने भरून घेण्यात आली. महाराष्ट्रासह इतर राज्यांतीलही उत्तरदात्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. एकूण ३०० हून अधिक जणांनी
प्रश्नावली भरून दिली.
प्रश्नावलीचे विश्लेषण केले असता, मुद्रित माध्यमे सर्वाधिक विश्वासार्ह असल्याचे मत ६९.३ टक्के उत्तरदात्यांनी नोंदवले. १९.६ टक्के लोकांनी इंटरनेट तसेच मोबाईलवरील
माहिती विश्वासार्ह आहे, असे म्हटले; तर, ८.१ टक्के जणांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमातील माहिती विश्वासार्ह वाटत असल्याचे मत व्यक्त केले. ३ टक्के लोकांना पारंपरिक माध्यमे विश्वासार्ह वाटतात. याचाच अर्थ नागरिकांना मुद्रित माध्यमांची विश्वासार्हता इतर माध्यमांच्या
तुलनेत कैक पटीने अधिक वाटत
असल्याचेच दिसून येते.
लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. सोशल
मीडियासाठी लोकांनी लॉकडाऊनच्या काळात पूर्वीपेक्षा अधिक वेळ दिला.
लॉकडाऊनपूर्वी सोशल मीडियासाठी दिवसातील २ ते ४ तास वेळ देणार्यांची संख्या २०.३ टक्के होती. पण
लॉकडाऊनच्या काळात ही संख्या वाढून ३९.५ टक्के म्हणजे जवळजवळ
दुप्पट झाली. लॉकडाऊनच्या काळात
सोशल मीडियापैकी व्हॉट्सअॅपचा वापर सर्वाधिक होत असल्याचेही अभ्यासात दिसून आले. ५५.७ टक्के लोक लॉकडाऊनमध्ये व्हॉट्सअॅपचा वापर करत आहेत.
युट्यूब, ट्विटर, फेसबुक यांसह अन्य
माध्यमांपेक्षाही व्हॉट्सअॅपसाठी जास्तीत जास्त वेळ दिला जात असल्याचे हा अभ्यास
सांगतो.
इलेक्ट्रॉनिक वृत्त माध्यमांचाही यावेळी अभ्यास करण्यात आला. यामध्ये मराठी
वृत्तवाहिन्या पाहण्याकडे अधिक लोकांचा कल असल्याचे समोर आले. ६३.२ टक्के लोक
माहिती मिळविण्यासाठी मराठी वृत्तवाहिन्या पाहतात. हिंदी आणि इंग्रजी
वृत्तवाहिन्या पाहणार्यांची संख्या तुलनेने कमी आहे. स्थानिक भाषेतील माध्यमे
वापरणे सोयीचे असल्याने बहुतेक लोक मराठी वृत्तवाहिन्या पसंत करत आहेत.
लॉकडाऊनपूर्वी वृत्तवाहिन्या पाहण्याची वेळ कमी होती. लॉकडाऊनच्या काळात
वृत्तवाहिन्या पाहण्यासाठी दर्शकांकडून अधिकचा वेळ दिला जात आहे.
लॉकडाऊनच्या काळात माहिती मिळविण्यासाठी मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक तसेच वेब माध्यमांचा आधार घेण्यात आला. परंतु
माहितीची सत्यता आणि विश्वासार्हता आदींसाठी मुद्रित माध्यमांवरच
अद्यापही लोकांची भिस्त आहे. याच काळात इतर माध्यमांना वेळ देण्याचे प्रमाण वाढले
असले तरी वस्तुनिष्ठ माहितीसाठी लोक मुद्रित माध्यमांचाच आधार घेत
असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
No comments:
Post a Comment