![]() |
शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे आयोजित 'प्रेरणा-२०२०' शिबिराच्या समारोप समारंभात ऑनलाईन मार्गदर्शन करताना महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी. |
![]() |
शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे आयोजित 'प्रेरणा-२०२०' शिबिराच्या समारोप समारंभात ऑनलाईन मार्गदर्शन करताना महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी. |
![]() |
शिबिराच्या समारोप समारंभात सहभागी झालेले कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्रा. अभय जायभाये आदी. |
‘प्रेरणा-२०२०’ शिबिराचा ऑनलाईन समारोप
कोल्हापूर, दि.
१६ जुलै: छत्रपती शिवाजी
महाराज हे अखिल भारताचे प्रेरणास्थान असून त्यांचा इतिहास आजही आपल्याला देशाप्रती
आपले कर्तव्य निभावण्यासाठी प्रेरित करणारा आहे. आजच्या युवा पिढीने त्यापासून
प्रेरणा घेत देशकार्याला सिद्ध व्हावे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल तथा
शिवाजी विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी काल सायंकाळी केले.
महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘प्रेरणा-२०२०’ या राज्यस्तरीय नेतृत्वगुण विकास प्रशिक्षण शिबिराच्या ऑनलाईन समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संबोधित करताना श्री. कोश्यारी बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर होते.
कुलपती श्री. कोश्यारी म्हणाले, आज शिवाजी महाराजांचे जीवन व कार्य हीच आजच्या तरुणांसाठी प्रचंड मोठी प्रेरणाशक्ती आहे. महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण वाटचाल करण्याचा निर्धार करावा. या शिबिरात ‘पद्मश्री’ पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या मान्यवरांचा आदर्श ठेवून आपण देशकार्य करण्यासाठी सज्ज व्हायला हवे. त्यांच्याप्रमाणे चांगल्या कामासाठीचे पुरस्कार आपल्यालाही मिळायला हवेत, अशी जिद्द ठेवून काम करीत राहायला हवे. आत्मविश्वास, संयम आणि स्वयंशिस्तीच्या बळावर ही गोष्ट साध्य करण्यात काहीच अडचण येणार नाही.
कुलपती श्री. कोश्यारी
पुढे म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात शिवाजी विद्यापीठाने राज्यस्तरीय नेतृत्व
गुणविकास शिबिर आयोजित करून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्त्व
विकासाची संधी उपलब्ध करून दिली, ही अभिमानास्पद बाब आहे. विविध कार्यक्रमांना
उपस्थित राहतो, तेव्हा ते कार्यक्रम इंग्रजीतून होतात, पण आपण मराठीतून सुरवात
केली, याचा मला मनस्वी आनंद झाला. कारण आपली मातृभाषा ही आपल्यासाठी महत्त्वाची
आहे. आपल्या भाषेतून सर्वांशी संवाद साधण्यावर आपण भर द्यायला हवा.
अध्यक्षीय
भाषणात कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले, युवकांमध्ये प्रेरणा ही महापुरुषांच्या चरित्रांतून,
व्यक्तिमत्त्वांतून येते. युवा जीवनात अशा आदर्श व्यक्तींना मानाचे स्थान असते. या
प्रेरणा शिबिरांतर्गत डॉ. अभय बंग,
पोपटराव पवार, डॉ.प्रकाश आमटे, इंद्रजित देशमुख, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी,
डॉ. भास्कर पेरे-पाटील, सयाजी शिंदे, डॉ. अविनाश पोळ इत्यादी
मान्यवरांशी विद्यार्थ्यांचा ऑनलाईन संवाद घडविण्यात आला. हे पिढी घडविण्याचेच काम
आपण करीत आहोत. विद्यार्थ्यांनीही हे विचार संचित आयुष्यभर जपावे आणि जीवनाचे
सार्थक करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या समारोप
समारंभाच्या सुरवातीला राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा. अभय जायभाये
यांनी स्वागत केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी प्रास्ताविक
केले. राज्य संपर्क अधिकारी डॉ. अतुल साळुंके यांनी शिबिराचा आढावा सादर केला. कुलपती
नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य अमित कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले तर व प्रा.
ज्ञानराजा चिघळीकर यांनी आभार मानले. शिबिरात युट्युब व वेबेक्सच्या माध्यतून
महाराष्ट्रातील एनएसएस स्वयंसेवक,
स्वयंसेविका, संचालक, कार्यक्रम अधिकारी मोठ्या
संख्येने सहभागी झाले.
No comments:
Post a Comment