शिवाजी विद्यापीठाचे मावळते कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचा सत्कार करताना कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर. शेजारी श्रीमती नागरबाई शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. |
मावळते प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांचा सत्कार करताना वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील. शेजारी सौ. सुनिता शिर्के व कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. |
कोल्हापूर, दि. १७ जून: शिवाजी विद्यापीठातील कुलगुरू
पदाचा माझा कार्यकाळ अत्यंत आनंददायी व चिरस्मरणीय झाला. या कालखंडात माझे विद्यापीठ
परिक्षेत्रात अनेक ऋणानुबंध निर्माण झाले, त्याचबरोबर विविध पदांच्या जबाबदाऱ्यांनी
अनुभवसंपन्न केले, अशी कृतज्ञतेची भावना शिवाजी विद्यापीठाचे मावळते कुलगुरू डॉ.
देवानंद शिंदे यांनी आज येथे व्यक्त केली.
कुलगुरू डॉ. शिंदे यांना आज विद्यापीठातर्फे औपचारिक
निरोप देण्यात आला. कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर जाहीर समारंभ टाळून मोजके पदाधिकारी
व मान्यवरांच्या उपस्थितीत झालेला हा निरोप समारंभ ‘फेसबुक लाइव्ह’ थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून
सुमारे २९०० जणांनी पाहिला. या सर्वांशी कार्यपूर्ती संवाद साधताना कुलगुरू डॉ.
शिंदे बोलत होते. यावेळी त्यांच्या मातोश्री नागरबाई शिंदे, पत्नी सौ. अनिता आणि
मुलगी कैरवी प्रमुख उपस्थित होते. कुलगुरूंच्या बरोबरीने प्र-कुलगुरू डॉ. डी.टी.
शिर्के यांचाही कार्यकाळ आज समाप्त झाला. त्यांनाही यावेळी निरोप देण्यात आला.
त्यांच्या पत्नी सौ. सुनिता शिर्के यावेळी उपस्थित होत्या.
डॉ. शिंदे म्हणाले, एका डोळ्यात हसू
आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू, अशी काहीशी मानसिक
अवस्था झाली आहे. पाहता पाहता पाच वर्षांचा कालावधी लोटला आहे. आपणा सर्वांच्या
साथीने हा पाच वर्षांचा प्रवास अत्यंत आनंददायी आणि चिरस्मरणीय झाला आहे. गेली पाच वर्षे आपण सारे अत्यंत एकदिलाने या विद्यापीठाचा
लौकिक वृद्धिंगत करण्यासाठी काम करीत आहोत. मी औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठातून येथे आलो, तेव्हा येथे माझे
कोणीच नव्हते; आणि आज मात्र
शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील तीनही जिल्ह्यांत माझे ऋणानुबंध निर्माण झाले
आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्मभूमीकडून
राजर्षी शाहू महाराज यांच्या कर्मभूमीकडे झालेल्या माझ्या या प्रवासाने
आशीर्वादाचा आणि सदिच्छांचा माझ्यावर इतका वर्षाव केला, की त्या प्रेमाने मी सद्गदित झालो आहे.
डॉ. शिंदे पुढे म्हणाले, शिवाजी
विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून पुण्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठ या तीन विद्यापीठांचा प्रभारी कुलगुरू म्हणून काम करण्याची
अभूतपूर्व संधी मला लाभली, याचे सारे श्रेय
शिवाजी विद्यापीठ परिवाराला आहे. डॉ.आंबेडकर, राजर्षी शाहू
यांच्यानंतर महात्मा फुले, लोकहितवादी आणि
पुन्हा डॉ. आंबेडकर यांच्या कर्मभूमीकडे झालेला हा प्रवास मला व्यक्तीशः अत्यंत अनुभवसमृद्ध
करणारा ठरला. शिवाजी विद्यापीठाचा कुलगुरु झाल्यामुळेच फुले-शाहु-आंबेडकर या विचारधारेचा
पाईक म्हणून माझी एका अर्थाने एक शैक्षणिक परिक्रमा पूर्ण झाली. या कार्यकाळात
माझ्या परीने विद्यार्थीकेंद्री व विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी उत्कृष्ट काम
करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला, असे ते म्हणाले.
कोल्हापूरकरांच्या प्रेमातून उतराई होणे अशक्य
कोल्हापुरातील प्रत्येक समाजघटकाने मला इतके प्रेम
दिले की त्यातून उतराई होणे अशक्य असल्याचे सांगून कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, या कोल्हापूरनगरीबद्दल
एका वाक्यात सांगायचे झाल्यास इतर शहरे तुम्हाला राहायचं कसे ते शिकवतात, परंतु कोल्हापूर तुम्हाला जगायचे कसे हे सांगते, शिकवते. या कोल्हापूरने मला जे शिकवलं, ते आता अखेरच्या श्वासापर्यंत त्या
पद्धतीनंच जगत राहीन, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी आपल्या कारकीर्दीत राबविलेल्या विविध योजना, उपक्रम यांचा आढावा
घेतला.
प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनीही विद्यापीठातील
सर्व घटकांनी आपल्याला केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले,
शिवाजी विद्यापीठ ही माझी मातृसंस्था आहे. तिला विविध भूमिकांतून योगदान देण्याचा
मी नेहमीच प्रयत्न केला. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासारख्या संवेदनशील
मनाच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाला योगदान देता आले, याचा मोठा आनंद आहे. छत्रपती
शिवाजी महाराजांवर, त्यांच्या गडकोटांवर अतिशय प्रेम करणारे, प्रत्येक गोष्टीतील
बारकावे पाहणारे, सामाजिक बांधिलकी सांभाळणारे असे बहुआयामी व्यक्तीमत्त्व लाभलेले
डॉ. शिंदे हे विलोभनीय व्यक्तीमत्त्व आहे. कामामध्ये परफेक्शनचा आग्रह, विद्यापीठाचे
ब्रँडिंग आणि डॉक्युमेंटेशन या बाबतीत त्यांनी शिवाजी विद्यापीठाला मोठेच योगदान
दिले आहे. या गोष्टी विद्यापीठाने पुढे निरंतर चालू राखल्या पाहिजेत, असे आवाहनही
त्यांनी केले.
यावेळी विविध विद्याशाखांच्या अधिष्ठाता यांचाही
कार्यकाळ संपुष्टात आला. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.एस.
पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. ए.एम. गुरव, मानव्यविद्या
विद्याशाखेच्या डॉ. भारती पाटील आणि आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत
यांनीही त्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी वित्त व लेखाधिकारी
व्ही.टी. पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक अभय जायभाये, बॅ. बाळासाहेब
खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्राचे संचालक डॉ. डी.के. गायकवाड,
प्राचार्य डॉ. डी.आर. मोरे, प्राचार्य डॉ. नितीन सोनजे, डॉ. पी.एन. वासंबेकर यांनी
आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व प्र-कुलगुरू डॉ.
डी.टी. शिर्के यांना विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह,
ग्रंथ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिकृती देऊन निरोप देण्यात
आला. सर्व अधिष्ठाता यांनाही ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे श्रीमती
नागरबाई शिंदे, सौ. अनिता शिंदे व कैरवी शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला.
कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर परीक्षा व
मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment