कोल्हापूर, दि. १०
जून: शिवाजी विद्यापीठाच्या
पद्मश्री (कै.) डॉ. ग.गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन
करीत असताना महत्त्वपूर्ण आश्वासनपूर्ती केल्याचा आनंद होतो आहे, असे उद्गार
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे काढले.
विद्यापीठाच्या पद्मश्री (कै.) डॉ. ग.गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने डॉ. शिवाजी जाधव लिखित ‘पद्मश्री डॉ. ग.गो. जाधव यांची पत्रकारिता’ आणि डॉ. आलोक जत्राटकर संपादित ‘‘पुढारी’कार पद्मश्री (कै.) डॉ. ग.गो. जाधव स्मृती व्याख्यानमाला संग्रह (सन १९८८-२०१९)’ या दोन पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे. या पुस्तकांचे आणि विद्यापीठाच्या जनसंपर्क कक्षाच्या वतीने निर्मित ‘शिव-वार्ता: माध्यमांच्या नजरेतून विद्यापीठ (सन २०१९-२०२०)’ या वार्तासंकलन पुस्तिकेचे प्रकाशन कुलगुरू डॉ. शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कुलगुरू कार्यालयात करण्यात आले. त्यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, डॉ. शिवाजी जाधव यांनी पद्मश्री. डॉ. ग.गो. जाधव
यांच्या पत्रकारितेविषयी पीएच.डी. संशोधन केले. या संशोधनावर आधारित ग्रंथातून डॉ.
ग.गो. जाधव यांच्या पत्रकारितेचे अनेक पैलू समोर येतात. त्यांनी त्या काळात हाताळलेले विविध मुद्दे,
स्थानिक विकासाचे प्रश्न, शेती, शेतकरी, कष्टकरी, महिला तसेच उपेक्षित घटकांच्या
संदर्भात केलेली पत्रकारिता आणि विविध चळवळींच्या संदर्भात त्यांची भूमिका, असे
अनेक विषय या ग्रंथाच्या माध्यमातून वाचकांसमोर येत आहे. पत्रकारितेशी निगडित सर्व
घटकांबरोबरच अभ्यासक, संशोधक व प्राध्यापक यांच्यासाठीही हे पुस्तक महत्त्वाचे
ठरणार आहे.
‘पुढारी’कार
पद्मश्री (कै.) डॉ. ग.गो. जाधव स्मृती व्याख्यानमाला संग्रहाविषयी बोलताना कुलगुरू
डॉ. शिंदे पुढे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून रुजू झाल्यानंतर डॉ.
जाधव स्मृती व्याख्यानमाला कार्यक्रमात, या मालेअंतर्गत झालेल्या व्याख्यानांचा
संपादित ग्रंथ प्रकाशित करण्याची घोषणा केली होती. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी
डॉ. आलोक जत्राटकर आणि डॉ. ग.गो. जाधव पत्रकारिता अध्यासन यांनी त्या
आश्वासनपूर्तीसाठी परिश्रम घेऊन हा व्याख्यानमाला संग्रह निर्माण केला आणि
आश्वासनपूर्तीचा आनंद मला मिळवून दिला, याचा अभिमान वाटतो. त्यासाठी डॉ. जत्राटकर
यांच्यासह अध्यासनाचे माजी चेअर प्राध्यापक डॉ. रत्नाकर पंडित आणि समन्वयक डॉ.
शिवाजी जाधव यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.
'शिव-वार्ता'चेही प्रकाशन
कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते यावेळी जनसंपर्क कक्षाचा उपक्रम असलेल्या ‘शिव-वार्ता: माध्यमांच्या नजरेतून विद्यापीठ (सन २०१९-२०२०)’ या पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले, विद्यापीठाच्या जनसंपर्क कक्षातर्फे विविध प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या विद्यापीठविषयक वार्ता संकलित स्वरुपात ‘शिव-वार्ता’मध्ये दरवर्षी प्रकाशित करण्यात येतात. या वर्षी सुद्धा त्याचे प्रकाशन होते आहे, ही आनंदाची बाब आहे. सर्व माध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या प्रत्येक बातमीला यात जागेअभावी स्थान देता येत नसले तरी त्या त्या कालखंडात विद्यापीठात झालेल्या घडामोडी आणि त्यांचे माध्यमांतील प्रतिबिंब यांची माहिती होण्याच्या दृष्टीने ‘शिव-वार्ता’ हा उपक्रम महत्त्वाचा आहे. त्याचे प्रकाशन करतानाही मोठे समाधान वाटते आहे.
या प्रसंगी विद्यापीठाच्या पद्मश्री (कै.) डॉ. ग.गो. जाधव पत्रकारिता
अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, माजी चेअर प्राध्यापक डॉ. रत्नाकर पंडित,
जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment