Monday, 15 June 2020

शिवाजी विद्यापीठाचा डी.वाय. पाटील विद्यापीठासमवेत महत्त्वपूर्ण करार

संशोधन-विकासाच्या नव्या संधी;

विद्यार्थी-कर्मचाऱ्यांना होणार आरोग्य सुविधांचा लाभ


शिवाजी विद्यापीठ व डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठ यांच्यात झालेल्या सामंजस्य करार प्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व डीवायपी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुद्गल यांचेसमवेत (डावीकडून) डॉ. विनिता रानडे, डॉ. व्ही.व्ही. भोसले, प्र-कुलगुरू डॉ. शिंपा शर्मा, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. संजय जाधव आदी.


कोल्हापूर, दि. १५ जून: शिवाजी विद्यापीठाने आज येथील डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेच्या अभिमत विद्यापीठासमवेत शैक्षणिक व वैद्यकीय सुविधांच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण पंचवार्षिक सामंजस्य करार केला. या करारामुळे सार्वजनिक आरोग्य, औषधनिर्माण तसेच आरोग्यविषयक समाजशास्त्र आदी अनेक विषयांतील संशोधन विकास व अभ्यासाच्या संधी या करारान्वये उपलब्ध होणार आहेत. तसेच, या कराराचा विद्यापीठातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधा उपलब्धतेसाठी मोठा लाभ होणार आहे.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुद्गल, प्र-कुलगुरू डॉ. शिंपा शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला.

डी.वाय पाटील विद्यापीठाचे डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय हे सुमारे ८०० बेडचे मल्टीस्पेशालिटी शैक्षणिक रुग्णालय आहे. रुग्णांसाठी येथे अत्यावश्यक सुविधा २४ तास उपलब्ध आहेत. या रुग्णालयासमवेत शिवाजी विद्यापीठाने आज केलेल्या सामंजस्य करारान्वये विद्यापीठाचे विद्यार्थी, कर्मचारी आणि त्यांचे प्राथमिक नातेवाईक यांना २० टक्के सवलतीच्या दरात अंतर्गत सुविधा उपलब्ध होतील. प्रयोगशाळा व रेडिओलॉजी सेवा १० टक्के सवलतीच्या दरात दिल्या जातील. विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांमध्ये वेळोवेळी होणाऱ्या सुविधांची माहिती घेण्यासाठी तसेच एकूणच वैद्यकीय शिक्षण व विविध विकार संशोधन या क्षेत्रांतील अद्यावत माहिती घेण्यासाठी मुक्त प्रवेश राहील. शिवाजी विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांना डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या सहकार्याने विविध संशोधन प्रकल्प हाती घेता येऊ शकतील, इतकेच नव्हे, तर तेथील संशोधन मार्गदर्शकही त्यांना उपलब्ध होतील. रुग्णालयाच्या समुपदेशन केंद्राच्या सेवा येथील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना मोफत उपलब्ध होतील. शिवाजी विद्यापीठ परिसरातून डी.वाय. पाटील रुग्णालयापर्यंत रूग्णास नेण्यासाठी अँम्बुलन्स सेवा मोफत दिली जाईल. त्वचाविकार व मानसोपचार या संदर्भातील विशेष बाह्यरुग्ण सेवा विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रासाठी गरजेनुसार व मागणीनुसार उपलब्ध करुन दिल्या जातील. शिवाजी विद्यापीठात वेळोवेळी आरोग्य शिबिरे व रक्तदान शिबिरेही आयोजित केली जातील. विद्यापीठात होणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, अन्य कार्यक्रम इत्यादी प्रसंगी अँम्बुलन्स तसेच अन्य आरोग्यविषयक सुविधा दोहो बाजूंनी ठरविलेल्या दरानुसार उपलब्ध करून देण्यात येतील. त्याचप्रमाणे वेळोवेळी आरोग्यविषयक व्याख्यानांचेही आयोजन करण्यात येईल.

या सामंजस्य करारावर डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुद्गल, कुलसचिव डॉ. व्ही.व्ही. भोसले आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी

डी.वाय.पी. विद्यापीठाचे उपकुलसचिव तसेच शिवाजी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय जाधव, अधीक्षक विनोद पंडित, शिवाजी विद्यापीठाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. विनिता रानडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. व्ही.व्ही. गायकवाड आदी उपस्थित होते.

 

सामंजस्य करार दूरगामी महत्त्वाचा: कुलगुरू डॉ. शिंदे

या करारासंदर्भात बोलताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठासमवेत करण्यात आलेला सामंजस्य करार हा आरोग्य, औषधनिर्माण तसेच आरोग्यविषयक अन्य पूरक सेवा यांच्याशी संबंधित संशोधन विकासाच्या अनुषंगाने दूरगामी महत्त्वाचा आहे. शिवाजी विद्यापीठात सध्या वैद्यकीय माहितीशास्त्राचा आंतरराष्ट्रीय एम.एस्सी. अभ्यासक्रम सुरू आहे. या विद्यार्थ्यांसाठी तर तो महत्त्वाचा आहेच, शिवाय अन्य विज्ञान तसेच समाजविज्ञान शाखांच्या संशोधनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे सध्या कोविड-१९सारख्या साथींमुळे समाजाच्या आरोग्यविषयक जाणीवा तीव्र झाल्या आहेत. दर्जेदार आरोग्य सुविधा सवलतीच्या दरात विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना उपलब्ध झाल्या, तर उत्तमच आहे. त्या दृष्टीने त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी हा करार महत्त्वाचा ठरणार आहे.


No comments:

Post a Comment