
(Image for representation purpose only.)
कोल्हापूर, दि. ६ मे: शिवाजी
विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विभागात विद्यार्थ्यांना
बी.एस्सी. - नॅनो सायन्स व तंत्रज्ञान या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्याची मोठी संधी
उपलब्ध असून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या आधुनिक शिक्षण संधीचा लाभ घ्यावा,
असे आवाहन संचालक डॉ. किरणकुमार शर्मा यांनी केले आहे.
डॉ. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या विद्यार्थ्यांना आपल्या बुद्धीला चालना देऊन शास्त्र व तंत्रज्ञान (सायन्स अँड टेक्नॉलॉजी) यामध्ये आव्हानात्मक करिअर करायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ‘नॅनो सायन्स व नॅनो टेक्नॉलॉजी’च्या माध्यमातून एक सुवर्णसंधी उपलब्ध आहे. संशोधन,
उद्योजकता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयय स्तरावरील कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी मिळवण्यासाठी हे एक उत्तम क्षेत्र आहे.
या नाविन्यपूर्ण व प्रगतशील क्षेत्रांमध्ये करिअर घडवण्यासाठीचे आवश्यक शिक्षण हे विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर करता येऊ शकते. त्यामध्ये बॅचलर ऑफ सायन्स (B.Sc.), मास्टर्स ऑफ सायन्स (M.Sc.), B.Sc.-M.Sc. इंटिग्रेटेड, आणि बॅचलर ऑफ टेकनॉलॉजी (B.Tech), यासारखे अभ्यासक्रम आपल्या देशातील निवडक विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहेत. या पुढील Ph.D. पर्यंतचे शिक्षण आणि पोस्टडॉक्टरल फेलोशिप व संशोधनासाठी भारत व भारताबाहेर अमर्यादित संधी उपलब्ध आहेत.
याच्याशी संबंधित अभ्यासक्रम शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे उपलब्ध असून स्कूल ऑफ नॅनोसायन्स व नॅनोटेक्नोलॉजी या अधिविभागमध्ये बी.एस्सी. –एम.एस्सी. नॅनोसायन्स व नॅनोटेक्नोलॉजी (इंटिग्रेटेड) या प्रोग्रॅम साठी प्रवेश प्रक्रिया चालू झाली आहे. तरी विज्ञान शाखेतून १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी, हे एक उत्तम संधी असून त्याचा इच्छुक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अधिविभागाचे संचालक डॉ. किरणकुमार शर्मा यांनी केले आहे. त्याचप्रमाणे बी.एस्सी रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र उत्तीर्ण विद्यार्थी एम-एस्सी नॅनोसायन्स व नॅनोटेक्नोलॉजीसाठी प्रवेश घेऊ शकतात. आजपर्यंत या अधिविभागातून अनेक विद्यार्थ्यांनी पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून ते संशोधन, उद्योजकता तसेच शासकीय व खाजगी कंपन्यांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत.
विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनोसायन्स व टेक्नॉलॉजीविषयी
थोडक्यात...
या अधिविभागाची सुरुवात २०१२ मध्ये झाली,
पहिल्या बॅच ने २०१७ मध्ये अभ्यासक्रम पूर्ण केला.
त्यानंतर गेल्या आठ वर्षाचा आढावा घेतला असता विदयार्थ्यांच्या
गुणवत्तेबरोबरच त्यांचा विविध क्षेत्रातील
भरारीचा वाढता आलेख आपल्याला पाहावयास
मिळतो. अंतिम वर्ष उत्तीर्ण झाल्यानंतर येथील विद्यार्थी जगभरात तसेच देशातर्गत नोकरी साठी व पुढील
शिक्षणासाठी जातात. जवळपास १५० पेक्षा जास्त
विद्यार्थी यूरोपीय, अमेरिकन, आशियायी व इतर
देशांमध्ये फेलोशिप सहीत पीएचडी करण्यासाठी गेले आहेत व ५० पेक्षा जास्त
विद्यार्थी हे भारतातील नामांकित विद्यापीठांमध्ये पीएचडी साठी गेले आहेत . परदेशामध्ये पीएचडी
केल्यांनतर विद्यार्थी सेमीकंडक्टर व इलेक्ट्रॉनिक जसे सॅमसंग, मायक्रॉन आदी
आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. त्याचबरोबर भारतातील सेराफ्लक्स,गोल्डन नेक्सस, इटर्नल एनर्जी, केम-साय, हाय-टेक, युनीकेम व बजाज फिन्सर इत्यादी औदयोगिक कंपनी मध्ये
कार्यरत आहेत. येथील काही विद्यार्थ्यांची निवड महाराष्ट्र व केंद्रीय लोकसेवा
अंतर्गत विविध पदांवर तसेच नेव्ही मध्ये
झाली आहे. काहीविद्यार्थी सायंटिफिक इडिटर, पेटंट एजण्ट
तसेच विविध विद्यापीठ व कॉलेजमध्ये सहायक
प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. काही विदयार्थानी स्टार्ट-अप व व्यवसायाची सुरुवात सुद्धा केली आहे.
नॅनो सायन्स व नॅनो टेक्नॉलॉजी ची ओळख
प्रामुख्याने नॅनोसायन्स व नॅनोटेक्नॉलॉजी हे आण्विक व अणूसारख्या सूक्ष्म व अतिसूक्ष्म गोष्टींवर आधारित असणारे तंत्रज्ञान आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक आणि अभियांत्रिकी यांचा एकत्रित मिलाफ करून केलेली रचना म्हणजे ‘नॅनोटेक्नॉलॉजी’. यालाच अतिसूक्ष्म तंत्रज्ञान किंवा अब्जांश तंत्रज्ञान असेही म्हटले जाऊ शकते. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध शाखांवर आधारित असलेले हे नॅनोतंत्रज्ञान एक अत्याधुनिक प्रगतशील तंत्रज्ञान म्ह्णून उदयास येत आहे. यामध्ये प्रामुख्याने नॅनोमीटर (nanometer) स्केलवर सामग्री आणि उपकरणांचे डिझाईन, संश्लेषण, वैशिष्ठिकरण व त्यांचा विविध क्षेत्रांमध्ये वापर यांचा समावेश होतो. नॅनो हा शब्द, 'नॅनोस' या ग्रीक शब्दाच्या उपसर्गातून आला असून त्याचा अर्थ ‘खूप छोटा’ असा होतो. नॅनोमीटर म्हणजे एक मीटर मापकाचा एक अब्जावा भाग (१ नॅनोमीटर = १०-९ मीटर).
नॅनोमटेरिअल्स हा नॅनोटेक्नॉलॉजीचा मुख्य घटक असून त्यांचा आकार हा नॅनोमीटर स्केलमध्ये असतो. त्यांच्या उपयोगांनुसार विविध प्रकारच्या आकार व रचनामध्ये नॅनोमटेरिअल्स तयार केले जाऊ शकतात. त्याचा आकार, आकारमान व मिती (डायमेन्शन) यानुसार त्याचे विविध भौतिक, रासायनिक, इलेक्ट्रॉनिक, ऑप्टिकल, थर्मल व मॅग्नेटिक यांसारखे गुणधर्म दर्शवतात. अलीकडच्या काही वर्षांमध्ये नॅनोमटेरिअल्स व नॅनोकण (नॅनोपार्टिकल्स- nanoparticles) यांना त्यांच्या अत्यंत लहान आकार, पृष्ठभागाचे उच्च प्रमाण या मोठया प्रमाणावर असलेल्या धातूच्या गुणधर्मामुळे भिन्न असलेले गुणधर्म यांमुळे त्याच्या वापरास चालना मिळत आहे. सोने (Gold), चांदी (Silver), प्लॅटिनम (Platinum), जस्त (Zinc), अल्युमिनिम (Aluminium), तांबे (Copper), आणि लोह (Iron) इत्यादी धातू व धातू ओक्साईड् नॅनोकणांच्या विस्तृत श्रेणीने संशोधकांचे व उद्योजकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या नॅनोकणांचे गुणधर्म त्यांच्या मोठया प्रमाणावर असलेल्या धातूंच्या गुणधर्मांपेक्षा भिन्न असून ते विविध प्रकारच्या भौतिक, रासायनिक व जैविक पद्धतीने तयार केले जातात. अशा प्रकारच्या नॅनोकणांचा वापर भौतिकशास्त्र, पदार्थ विज्ञानशास्त्र, जैव-वैद्यकीयशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, शेतीशास्त्र, अन्नशास्त्र, सौन्दर्य प्रसाधने, उत्प्रेरके आणि सेन्सिंग इत्यादींमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो.
नॅनोसायन्स व नॅनोटेक्नोलॉजी चा विविध क्षेत्रात उपयोग-
ऊर्जा साधने (ऊर्जा रूपांतरण आणि साठवण उपकरण)
आण्विक स्तरावर अभियांत्रिकी साहित्याद्वारे ऊर्जा आणि पर्यावरणीय अनुप्रयोगांसाठी नॅनोटेक्नॉलॉजी एक महत्वाचे तंत्रज्ञान म्हणून उदयास आलेले आहे . कार्बन नॅनोट्यूब, ग्राफीन आणि मेटल ऑकसाईड्स इत्यादी नॅनोमटेरियलच्या अद्वितीय ऑप्टिकल, इलेक्ट्रिकल आणि यांत्रिक गुणधर्मांमुळे अक्षय ऊर्जा उत्पादन, आणि ऊर्जा साठवणूक यासाठी त्यांचा वापर वाढला आहे . जागतिक लोकसंख्येच्या जलद वाढीमुळे ऊर्जा वापर आणि पर्यावरणावर दबाव लक्षणीयरीत्या वाढला आहे, यावर उपाय म्हणून पर्यायी संसाधने निर्माण करण्यासाठी नॅनोटेकनॉलॉजी हे एक अतिशय उपयुक्त तंत्रज्ञान आहे
शेती व अन्नपुरवठा उद्योग क्षेत्र:
शेती व अन्नपुरवठा उद्योगांमध्ये सुद्धा नॅनोटेक्नॉलॉजीचा खूप मोठा वाटा असून त्यांचा उपयोग अन्नउत्पादन,
अन्नसुरक्षा व वाहतूक इत्यादींमधील आवाहनांचा सामना करण्यासाठी केला जात आहे. प्रामुख्याने त्यांचा वापर गुणवत्तापूर्ण
बियाणांचे विकसन, पिकांचे सह-संवर्धन, विविध रोग व तणवाढ यापासून पिकांचे संरक्षण अशा अनेक बाबतींमध्ये केला जात आहे. कृषी क्षेत्रातील बहुविध उपयुक्ततेमुळे
अनेक देश त्या संबंधीच्या संशोधनावर भर देत आहेत. अन्नप्रक्रिया व अन्नवेष्टन (फूड पॅकेजिंग) या क्षेत्रांमध्ये
नॅनोटेक्नॉलॉजीचा वापर अन्नप्रक्रिया
करण्यासाठी, अन्नघटकांचा पोत सुधारण्यासाठी, नाशवंत फळे, फुले व भाजीपाला इत्यादींचा टिकाऊपणा व ताजेपणा टिकवण्यासाठी तसेच हलकी, मजबूत व टिकाऊवेष्टने बनवण्यासाठी केला जात आहे.
पर्यावरणशास्त्र क्षेत्र:
पर्यावरणशास्त्रामध्ये नॅनोटेक्नॉलॉजीचा
उपयोग पाणीशुद्धीकरण, घातक पदार्थांचे शोध घेणे व त्यांचे विघटन करणे, सेन्सिंग यासाठी केला जातो. पाणीशुद्धीकरण प्रक्रियेमध्ये
जड-धातू (जसे की शिसे, अल्युमिनिम, युरेनियम, क्रोमियम), रोग-जंतूंचे विलगीकरण यासाठी कार्बन नॅनोनलिका, सच्छिद्र सिरॅमिक, चुंबकीय नॅनोकण इत्यादीपासून बनविलेले पापुद्रीक गाळण्या (membrane filters)
यांचा वापर केला जातो.
नॅनो-जैवतंत्रज्ञान:
नॅनो-जैवतंत्रज्ञान (नॅनो-बायोटेक्नॉलॉजी) ही नॅनोटेक्नॉलॉजीची एक उदयोन्मुख उपशाखा असून ती नॅनोसायन्स व जैव-तंत्रज्ञान या दोन्ही विद्याशाखांच्या वर आधारित आहे. यामध्ये प्रामुख्याने जैविक संश्लेषणच्या पद्धती आणि तंत्रज्ञान वापरून नॅनोपार्टिकल्स तयार केले जातात व त्यांचा वापर प्रामुख्याने जीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये केला जातो. यामध्ये नॅनोटेक्नॉलॉजी व जैवतंत्रज्ञान या दोन आश्वासक उदयोन्मुख शाखांमधील ज्ञान एकत्र करून त्यांचा वापर जैविक प्रणालींचा अभ्यास करण्यासाठी केला जाऊ शकतो. नॅनो-बायोटेक्नॉलॉजीमध्ये प्रामुख्याने जैविक व नैसर्गिक स्रोत; जसे की वनस्पती व त्यांचे भाग, जिवाणू, विषाणू, बुरशी, शैवाल, त्यांची प्रथिने, विकरे आणि इतर जैव-रेणूंचा वापर करून नॅनोमटेरिअल्स तयार केली जातात. या जैविक व नैसर्गिक स्रोतांवर आधारित संश्लेषण पद्धतींचे अनेक फायदे आहेत. अशा पद्धतीने तयार केलेले नॅनोमटेरिअल्स व नॅनोकण जैव-वैद्यकीयशास्त्र, पर्यावरणशास्त्र, शेतीशास्त्र, अन्नशास्त्र, जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान इत्यादीसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत.
जैव-वैद्यकीय क्षेत्र:
जैव-वैद्यकीय व जैव-तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये
प्रामुख्याने त्यांचा उपयोग रोगनिदान, रोगजनुकांचा शोध, कर्करोग उपचार, जनुक थेरपी, जिवाणू रोधक व विषाणू रोधक पदार्थ, बायोसेन्सर्स, पर्यावरणास घातक व विषारी पदार्थ, प्रदूषके यांचा शोध घेणे व त्यांचे विघटन करणे इत्यादींसाठी केला जातो. कर्करोग उपचार पद्धतींमध्ये त्यांचा वापर कर्करोगाचे निदान करण्यासाठी,
कर्करोगाची औषधे शरीरामध्ये योग्य ठिकाणी वितरित करण्यासाठी तसेच कर्करोगग्रस्त
पेशी नष्ट करण्यासाठी केला जात असून नॅनोपार्टिकल्सवर
आधारित अनेक औषधांवर आज मोठ्या प्रमाणावर संशोधन चालू आहे.
माहितीस्रोत-
डॉ. मेघा प्रकाश देसाई (सहायक प्राध्यापक)
डॉ. किरणकुमार शर्मा (संचालक)
स्कुल ऑफ नॅनोसायन्स अँड नॅनोटेक्नोलॉजी,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
No comments:
Post a Comment