शिवाजी
विद्यापीठात परीक्षा नियंत्रकांसह १४ जणांना निरोप
कोल्हापूर, दि. ३१ मे: शिवाजी विद्यापीठाचा परीक्षा
विभाग आधुनि्क व सक्षम करण्याच्या कामी डॉ. बी.एम. हिर्डेकर यांनी मोलाचे योगदान दिले.
विद्यापीठ प्रशासनाचा विश्वास त्यांनी सार्थ ठरविला, असे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. एन.जे.
पवार यांनी आज येथे काढले. परीक्षा नियंत्रक डॉ. हिर्डेकर यांच्यासह प्राध्यापक, अधिकारी
आणि कर्मचारी असे विद्यापीठातील एकूण १४ जण सेवानिवृत्त झाले. या निमित्त विद्यापीठाच्या
शाहू सभागृहात निरोप समारंभाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत
होते.
डॉ. पवार म्हणाले, विद्यार्थ्यांशी सर्वाधिक
निगडित अशा परीक्षा विभागाच्या सक्षमतेवरुन विद्यापीठाच्या सक्षमतेची खात्री पटविली
जात असते. डॉ. हिर्डेकरांमुळे शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कामगिरीची
शासन स्तरावरही नोंद घेण्यात आली. उत्तम प्रशासक असलेल्या डॉ. हिर्डेकर यांच्या व्यापक
सामाजिक संपर्काचाही विद्यापीठाला लाभ झाला. त्यांची वाचनाची आवड म्हणजे त्यांच्यातील
शिक्षकही जागृत असल्याचे लक्षण आहे, असेही कुलगुरू म्हणाले. सेवानिवृत्त होणाऱ्या सर्वांनाच
कुलगुरू डॉ. पवार यांनी भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
प्र-कुलगुरू डॉ. ए.एस. भोईटे म्हणाले, डॉ. हिर्डेकर
यांच्या सहभागामुळे विद्यापीठ अधिकाऱ्यांची एक परिपूर्ण टीम तयार झालेली होती. त्यामध्ये
आता पोकळी निर्माण झाली आहे. डॉ. हिर्डेकर यांचे विद्यार्थीकेंद्री प्रशासन, त्यांचे
अद्ययावत ज्ञान आणि व्यक्तिमत्त्व विकास कौशल्य आणि मैत्रीपूर्ण कौटुंबिक जिव्हाळा
या गोष्टी नेहमीच स्मरणात राहतील, असे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना डॉ. हिर्डेकर यांनीही
कामाप्रती निष्ठा हेच आपल्या कामकाजाचे ब्रीद असल्याचे सांगितले. ते म्हणाले, विद्यापीठ
प्रशासनामधील माझे येणे हा निव्वळ एक अपघात होता. इथे पूर्णकाळ राहणे मनातही नव्हते.
तथापि, तत्कालीन परिस्थितीमध्ये तणाव निवळण्यासाठी आपल्यासारख्या सहकाऱ्याची मला नितांत
आवश्यकता आहे, असे कुलगुरूंनी सांगितल्यामुळे आणि मी त्यांना तसा शब्द दिल्यामुळे मी
येथे थांबलो. माझ्यावर व्यक्तिनिष्ठेचा आरोप केला गेला, पण मी नेहमीच माझ्या कामाशी
आणि संस्थेशी प्रामाणिक राहिलो. माझ्या सहकाऱ्यांवर प्रसंगी रागावलो, पण तेही प्रेमापोटीच,
असेही त्यांनी सांगितले. भविष्यात खाजगी विद्यापीठांच्या स्पर्धेमध्ये सार्वजनिक विद्यापीठे
जगविण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर असल्याची जाणीव ठेवून काम करावे, असा सल्लाही
त्यांनी प्रशासकीय सहकाऱ्यांना दिला.
यावेळी विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी व्ही.टी.
पाटील, डॉ. डी. के. गायकवाड, न्यू कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. नाईक, प्रा. आबासाहेब
वैराट, उपकुलसचिव कॅप्टन नितीन सोनजे, जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर, सहाय्यक कुलसचिव
डॉ. यु.के. सकट, विष्णू खाडे, सुरेश बंडगर, रमेश गवळी, सुरेश पाटील, अभाविपचे शंकरराव
कुलकर्णी आदींनी मनोगते व्यक्त केली. सत्कारमूर्तींपैकी डॉ. सी.एच. भोसले, डॉ. (श्रीमती)
एस.ए. वायंगणकर, बी.पी. माने, ए.एन. साबळे आणि डी.बी. पाटील यांनी सत्काराला उत्तर
दिले.
कार्यक्रमात सर्व सेवानिवृत्तांचा शाल, श्रीफळ,
विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रभारी कुलसचिव
डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी प्रास्ताविक व आभार मानले. नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन
केले.
चौकट-
विद्यापीठातून
सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तींची नावे:-
१)
डॉ. बी.एम.
हिर्डेकर, परीक्षा नियंत्रक
२)
डॉ. सी.एच.
भोसले, प्राध्यापक, पदार्थविज्ञान अधिविभाग
३)
डॉ. श्रीमती
एस.ए. वायंगणकर, सहयोगी प्राध्यापक, संगीत व नाट्यशास्त्र विभाग
४)
बी.पी.
माने, सहाय्यक कुलसचिव
५)
एम.आर.
कडियाळ, सहाय्यक कुलसचिव
६)
बी.एस.
चव्हाण, अधीक्षक
७)
पी.बी.
येडेकर, सहाय्यक अधीक्षक
८)
श्रीमती
एस.जी. कनोजे, सहाय्यक अधीक्षक
९)
ए.एन.
साबळे, संशोधन सहाय्यक
१०) डी.बी. पाटील, लघुलेखक
११) जी.आर. शिंदे, पंप ऑपरेटर
१२) आर.टी. कट्टी, प्रयोगशाळा परिचर
१३) श्रीमती ए.बी. वाडकर, हावलदार
१४) श्रीमती पी.डी. पाटील, शिपाई
--००--
No comments:
Post a Comment