Monday, 26 May 2014

विद्यापीठाच्या तीन विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय निबंध लेखन स्पर्धेत यश



कोल्हापूर, दि. २३ मे: केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑन द स्पॉट निबंध लेखन स्पर्धे शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागाच्या तीन विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांकाची पारितोषिके पटकावली आहेत. आदर्श नागरे, महेश देशपांडे आणि राजश्री सलामवाडे अशी त्यांची नावे आहेत. गतवर्षीही या अधिविभागाच्या विद्यार्थ्याने या स्पर्धेत द्वितिय क्रमांक प्राप्त केला होता, अशी माहिती अधिविभाग प्रमुख डॉ. डी.टी. शिर्के यांनी दिली.
या तिन्ही विजेत्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळणार असून नवी दिल्ली येथे विशेष समारंभात ही पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. नवी दिल्ली येथील निवास व्यवस्था आणि रेल्वेच्या एसी-थ्री टिअरने जाण्या-येण्याचा प्रवास खर्चही दिला जाणार आहे.
केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या मध्यवर्ती सांख्यिकी कार्यालयातर्फे सांख्यिकी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑन द स्पॉट निबंध लेखन स्पर्धा-२०१४ चे आयोजन करण्यात आले होते. गेल्या १९ जानेवारी रोजी ही स्पर्धा संपूर्ण देशभरात एकाच वेळी घेण्यात आली. ऐनवेळी देण्यात आलेल्या विषयावर तीन तासांच्या अवधीत सुमारे ५००० शब्दांचा निबंध लिहीण्याची आव्हानात्मक अशी ही स्पर्धा होती. स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी रु. १५,०००/- चे एक, द्वितिय क्रमांकासाठी प्रत्येकी रु. १२,०००/- ची दोन, तृतीय क्रमांकासाठी प्रत्येकी रु. १०,०००/- ची तीन आणि प्रत्येकी रु. ५,०००/- ची उत्तेजनार्थ पाच अशी पारितोषिके होती. तृतीय क्रमांकाची तीनही पारितोषिके शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पटकावली आहेत. या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील पुणे विद्यापीठाच्या किरण निहलानी या विद्यार्थ्याला उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले आहे.

No comments:

Post a Comment