अभिनव संशोधन प्रकल्पांना लाभणार प्रोत्साहन
कोल्हापूर, दि. २० मे: विज्ञान व तंत्रज्ञान
क्षेत्रातील अभिनव व नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी
महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाशी शिवाजी
विद्यापीठाने नुकताच सामंजस्य करार केला. या अंतर्गत सन २०१३-१४ साठीचा सुमारे ५०
लाख रुपयांचा निधी लवकरच विद्यापीठाला प्राप्त होईल, अशी माहिती शिवाजी
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळे यांनी दिली.
मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ
सायन्स येथे १३ मे रोजी आयोगाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांची
चर्चा झाली. त्यावेळी आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या उपस्थितीत हा
सामंजस्य करार करण्यात आला. सामंजस्य करारावर आयोगाच्या वतीने सदस्य सचिव डॉ. ए.व्ही.
सप्रे यांनी तर शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळे यांनी
स्वाक्षरी केली.
यासंदर्भात अधिक माहिती
देताना डॉ. मुळे यांनी सांगितले की, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनाला
प्रोत्साहन देण्याच्या हेतूने राजीव गांधी आयोगातर्फे विद्यापीठाला ठराविक निधी
देण्यात येणार आहे. सरधोपट संशोधन प्रकल्पांपेक्षा अभिनव व नाविन्यपूर्ण संशोधन
प्रकल्पांनाच विशेषत्वाने प्राधान्य देण्याचे आयोगाचे धोरण आहे. विज्ञान व
अभियांत्रिकी महाविद्यालये, वैद्यकीय संस्था, तंत्रशिक्षण संस्था यांच्या
माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांना विद्यापीठाच्या माध्यमातून विकेंद्रित
पद्धतीने निधीचे वितरण करण्यात येणार आहे. सदर सामंजस्य करारात विहीत नमुन्यात
प्रस्ताव सादर करणे, त्यांचे परीक्षण करण्यासाठी विद्यापीठ स्तरावर समिती गठित
करणे आदींसंदर्भात सविस्तर मार्गदर्शक मुद्द्यांचा समावेश आहे. या सामंजस्य
करारामुळे विद्यापीठ कार्यक्षेत्रात वेगळ्या व दर्जेदार संशोधनाला निश्चितपणे
चालना मिळेल, असा विश्वास डॉ. मुळे यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment