वस्त्रोद्योग सहसचिव सुधीर कुरसंगे यांचे मत
कोल्हापूर, दि. ७ मे: महाराष्ट्रात
रेशीमउद्योगाच्या विकासाला अतिशय व्यापक संधी उपलब्ध असून त्यादृष्टीने या
क्षेत्रातील कुशल व प्रशिक्षित विद्यार्थी घडविण्याचे शिवाजी विद्यापीठात सुरू
असलेले काम कौतुकास्पद असल्याचे मत राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाचे सहसचिव सुधीर
कुरसंगे यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर जिल्हा
भेटीवर आलेल्या श्री. कुरसंगे यांनी आज सकाळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.जे.
पवार आणि प्र-कुलगुरू डॉ. ए.एस. भोईटे यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, उपकुलसचिव बी.बी. पाटील, रेशीमशास्त्र
विभागाचे डॉ. ए.डी. जाधव उपस्थित होते.
श्री. कुरसंगे
म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रात उसाच्या खूप मोठ्या लागवडीमुळे आणि उत्पादनामुळे
अन्य शेतीकडे तुलनेत कमी लक्ष दिले जाते आहे. तथापि, राज्य शासनाने अल्प खर्चातला
आणि दीर्घकालीन उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देणाऱ्या रेशीम उद्योगाला प्रोत्साहन
देण्याचे धोरण स्वीकारले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातल्या मुद्याळ
आणि यळगूड या ठिकाणी सुरू असलेल्या रेशीम प्रकल्पांना भेट देऊन तेथील स्थानिकांशी
चर्चा करण्यात येणार आहे. तसेच, त्यांना विविध योजनांच्या साह्याने अधिक काय मदत
करता येईल, या दृष्टीने विचार करण्यात येणार आहे. रेशीम क्षेत्राशी संबंधित
अभ्यासक्रम शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागात शिकविला जातो, ही खूप
उत्साहवर्धक बाब आहे. या विद्यार्थ्यांना राज्यात निश्चितपणे चांगले भवितव्य असेल,
असेही त्यांनी सांगितले.
यावेळी कुलगुरू डॉ.
पवार यांनी विद्यापीठ स्तरावर रेशीम उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी काय करता
येईल आणि त्यांना शासन कसे सहकार्य करू शकेल, याविषयी गांभीर्याने विचार करण्याची
गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले, विद्यापीठामध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या
यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास स्कूलच्या माध्यमातून एखादा अभ्यासक्रम किंवा
पथदर्शी प्रकल्प राबविता येईल का, यादृष्टीने विचार करता येईल. विशेषतः विद्यार्थी
आणि शेतकरी यांचे साहचर्य या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून वृद्धिंगत होण्यासाठी
शेतकऱ्यांचे टार्गेट ग्रुप तयार करून त्यांना रेशीम उद्योगाबाबत प्रशिक्षित करता
येऊ शकेल. विशेषतः दुष्काळी भागातील शेतकऱ्यांपर्यंत याचे लाभ पोहोचविण्याच्या
दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. विद्यापीठाच्या महाविद्यालयांचे जाळे त्यासाठी
खूप उपयुक्त सिद्ध होऊ शकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment