Friday, 12 April 2019

जागतिक पर्यावरणाच्या संवर्धनासाठी

खारफुटीचे संरक्षण अत्यावश्यक: डॉ. उंटावळे

शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागात आयोजित राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करताना डॉ. ए.जी. उंटावळे यांच्यासह कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, डॉ. श्रीमती व्ही. डी. जाधव, डॉ. एस.एस. कांबळे, डॉ. डी.के. गायकवाड व डॉ. श्रीमती एन.एस. चव्हाण. 

शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागात आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करताना डॉ. ए.जी. उंटावळे, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत (डावीकडून) डॉ. श्रीमती व्ही. डी. जाधव, डॉ. श्रीमती एन.एस. चव्हाण, डॉ. डी.के. गायकवाड व डॉ. एस.एस. कांबळे.


वनस्पतीशास्त्र विभागात राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

Dr. A.G. Untawale
कोल्हापूर, दि. १२ एप्रिल: जागतिक पर्यावरणाच्या संवर्धनासाठी खारफुटीचे संरक्षण व संवर्धन अत्यावश्यक बाब आहे. तसे न झाल्यास मानवी अस्तित्वासाठी ते मारक ठरणार आहे, असे प्रतिपादन मॅनग्रोह्व्ज सोसायटी ऑफ इंडियाचे कार्यकारी सचिव डॉ. ए.जी. उंटावळे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागातर्फे मॅनग्रोह्व्ज अॅन्ड कोस्टल रिसोर्सेस या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. नीलांबरी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
डॉ. उंटावळे यांनी आपल्या व्याख्यानात खारफुटीच्या संदर्भातील अनेक तथ्यांचा वेध घेतला आणि तिचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, पर्यावरणाच्या दृष्टीने खारफुटीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. केवळ सागरी जल पर्यावरणाबरोबरच इतर पर्यावरणाच्या दृष्टीनेही त्याचे मोठे महत्त्व आहे. निसर्गातील अतिरिक्त कार्बन शोषून घेण्याची अन्य वनस्पतींच्या तुलनेत खारफुटीची क्षमता अधिक असते. त्याचप्रमाणे सागराला जमिनीवर अतिक्रमणापासून रोखणारी ती नैसर्गिक भिंत आहे. पायाभूत सुविधा निर्माणाच्या नावाखाली खारफुटीचा होत असलेला ऱ्हास अंतिमतः मानवी अस्तित्वाच्याच मुळावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे खारफुटीचे संरक्षण व संवर्धन यासाठी शासकीय, शैक्षणिक, संशोधकीय तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या स्तरांवरही प्रयत्न व जनजागृतीची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, खारफुटीच्या प्रश्नासंदर्भात शिवाजी विद्यापीठाने केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावरही मोठे योगदान दिले आहे. विद्यापीठाच्या संशोधकांनी संशोधन व जनजागृती यासाठी काम केले आहे. भारताला सुमारे ७२०० किलोमीटरचा लाभलेल्या सागरी किनाऱ्याच्या नैसर्गिक संरक्षणासाठी खारफुटीचे महत्त्व खूप आहे. त्याच्या संरक्षण व संवर्धनासाठी मॅनग्रोह्व्ज सोसायटी ऑफ इंडियाच्या सहकार्याने शिवाजी विद्यापीठ सक्रिय योगदान देण्यासाठी सदैव तत्पर आहे. या खारफुटीच्या संदर्भात संस्थेने चालविलेल्या कार्याबद्दल कुलगुरूंनी डॉ. उंटावळे आणि संस्थेमधील सर्वच घटकांचेही अभिनंदन केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी घालून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. परिषदेची स्मरणिका व मंगलवन या विशेषांकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. श्रीमती एन.एस. चव्हाण यांना खारफुटीसंदर्भातील संशोधनाबद्दल ‘फेलोशीप ऑफ मॅनग्रोव्ह्ज सोसायटी ऑफ इंडिया हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अधिविभाग प्रमुख डॉ. डी.के. गायकवाड यांनी स्वागत, डॉ. (श्रीमती) एन.एस. चव्हाण यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. एस.एस. कांबळे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. एस.आर. यादव, डॉ. जी.बी. दीक्षित, डॉ. एन.बी. गायकवाड यांच्यासह शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment