Monday 1 April 2019

विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्रासाठी

‘सोक्टास’कडून दोन लाख रुपयांचा निधी



कोल्हापूर, दि. १ एप्रिल: शिवाजी विद्यापीठाने कौशल्य विकासाच्या अनुषंगाने चालविलेले कार्य महत्त्वाचे असून त्याला अधिक चालना देण्यासाठी सोक्टासकंपनीच्या व्यावसायिक सामाजिक दायित्वाच्या अंतर्गत दोन लाख रुपयांचा निधी विद्यापीठास प्रदान करताना अत्यानंद होतो आहे, अशी भावना कागल येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील सोक्टास इंडिया प्रा. लि. या कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सदानंद गुप्ता यांनी येथे व्यक्त केली.
सोक्टास कंपनीतर्फे व्यावसायिक सामाजिक दायित्वाच्या अंतर्गत विद्यापीठाच्या कौशल्य व औद्योगिक विकास केंद्रासाठी दोन लाख रुपयांच्या निधीचा धनादेश कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्याचा कार्यक्रम आज विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते.
श्री. गुप्ता म्हणाले, सामाजिक दायित्वाच्या भावनेतून उद्योगाकडून देण्यात येणारा निधी योग्य हातांत पडून त्याचा योग्य विनियोग व्हावा, अशी कंपनीची भावना आहे. त्यातूनच विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्रामार्फत युवकांसाठी राबविण्यात येणारे अनेक उपक्रम पाहण्यात आले. केंद्र सरकारच्या स्कील इंडिया या उपक्रमांतर्गत अनेक उपक्रम विद्यापीठाकडून राबविण्यात येतात. त्याला मदत म्हणून आम्ही ही मदत विद्यापीठाला देण्याचे ठरविले.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, सोक्टास कंपनीने अत्यंत विश्वासाने विद्यापीठाला हे अर्थसाह्य केले आहे. त्याचा विनियोग कौशल्य विकास केंद्रातर्फे योग्य कारणांसाठी केला जाईल. अशा प्रकारे व्यावसायिक सामाजिक दायित्वाच्या सहाय्याने स्कील ऑन व्हील्ससारख्या विविध उपक्रमांची व्याप्ती वाढविणे शक्य आहे. त्या दृष्टीनेही प्रयत्न करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
यावेळी अधिष्ठाता व कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. यावेळी वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. पी.एस. पाटील, डॉ. भारती पाटील, इनोव्हेशन व इनक्युबेशन केंद्राचे समन्वयक डॉ. आर.के. कामत, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांच्यासह कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment