Friday, 29 March 2019

शिवाजी विद्यापीठात ‘कलर्स-२०१७’ समारंभ उत्साहात

विद्यापीठाच्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सिद्ध व्हावे: गिरीजा पाटील-देसाई






कोल्हापूर, दि. २९ मार्च: विद्यापीठाच्याकलर्सविजेत्या क्रीडापटूंनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात यश मिळवून आपले कौशल्य सिद्ध केले आहे. त्यांनी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचे कौशल्य दर्शविण्यासाठी सिद्ध व्हावे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय नेमबाज व ठाण्याच्या वनाधिकारी गिरीजा संदीप पाटील-देसाई यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागातर्फे सन २०१७-१८ मध्ये अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा गुणगौरव समारंभ (कलर्स-२०१७) आज मानव्यशास्त्र सभागृहात झाला. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
यावेळी अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळवून सर्वाधिक गुण संपादन केल्याबद्दल दि न्यू कॉलेज, कोल्हापूर यांना सन २०१७-१८चे खेळांमधील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. न्यू कॉलेजने सलग तिसऱ्यांदा हा बहुमान पटकाविला आहे. कॉलेजच्या वतीने प्राचार्य डॉ. व्ही.एम. पाटील यांच्यासह खेळाडूंनी हा गौरव स्वीकारला.
श्रीमती गिरीजा पाटील-देसाई म्हणाल्या, आंतरविद्यापीठ स्पर्धांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर चमक दाखविल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकण्याची जिद्द खेळाडूंच्या मनात जागली पाहिजे. त्यासाठी जागतिक स्तरावरील क्रीडा क्षेत्रातील प्रवाह काय आहेत, याची माहिती खेळाडूंनी करून घ्यायला हवी. त्यासाठी तंत्रज्ञानाचा सदुपयोग करून घ्यावा. आपल्या स्थानिक मार्गदर्शकांबरोबरच जागतिक स्तरावर उपलब्ध कोचिंगचीही मदत घेणे आवश्यक आहे. त्यासठी येणाऱ्या कालखंडात आपल्या कारकीर्दीचे योग्य नियोजन करा आणि किती उंच भरारी घ्यायची, हे ठरवून त्या दिशेने झेप घ्या, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
क्रीडापटूंसाठी राज्य तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पाच टक्के राखीव जागा असतात, त्याचाही लाभ घ्यायला हवा. त्यासाठी स्पर्धा परीक्षांचा सराव करणे आवश्यक असल्याचे सांगून पाटील यांनी तेजस्विनी सावंत, वीरधवल खाडे, राही सरनोबत असे आम्ही सारेच शासकीय सेवेत आपापल्या कामाचा ठसा उमटविण्यात यशस्वी झालो आहोत, असे अभिमानपूर्वक नमूद केले.

कुलगुरू डॉ. शिंदे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचा लौकिक देशभरात उंचावण्यात क्रीडापटूंचे योगदान मोलाचे आहे. केवळ पारंपरिक खेळांतच नव्हे, तर रग्बी, ग्रीको-रोमन कुस्ती, फेन्सिंग अशा या विभागाला अपारंपरिक असणाऱ्या क्रीडा प्रकारांतही त्यांनी यश मिळविले आहे, ही बाब अभिनंदनीय आहे. या खेळाडूंना सराव व स्पर्धेदरम्यान विमा संरक्षण योजना, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी जाणाऱ्या खेळाडूंना दोन लाख रुपयांचा मदतनिधी अशा अनेक योजना विद्यापीठ राबविते आहे. त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम शारीरिक शिक्षण संचालकांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले. सर्व संचालकांसाठीही वेळोवेळी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात झालेल्या आंतरविद्यापीठ स्पर्धेत वैयक्तिक व सांघिक प्रकारांत पाच सुवर्ण, पाच रौप्य व तेरा कांस्य अशी एकूण २३ पदके मिळविणाऱ्या आणि २१व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव-२०१७मध्ये  सहा सुवर्ण, आठ रौप्य व सात कांस्य अशी एकूण २१ पदके प्राप्त करणाऱ्या क्रीडापटूंचा गिरीजा पाटील-देसाई यांच्या हस्ते ब्लेझर, स्मृतिचिन्ह, पुस्तक व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेता अक्षय मधुकर देशमुख (तलवारबाजी), खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक विजेती अश्विनी राजेंद्र मळगे (वेटलिफ्टिंग), सुवर्ण विजेता ओंकार मारुती हंचनाळे (खो-खो), कांस्य विजेती मयुरी रामचंद्र देवरे (वेटलिफ्टिंग) यांना गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे कोलंबो (श्रीलंका) येथे झालेल्या आयर्नमन स्पर्धेत (२ किमी जलतरण+ १० किमी सायकलिंग+ २१ किमी धावणे) महाराष्ट्राकडून सर्वाधिक जलद वेळ (६ तास १० मि.) नोंदवून फ्रान्स येथील स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या विवेकानंद महाविद्यालयाच्या सुप्रिया विराज निंबाळकर हिचाही गौरव करण्यात आला.
सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी वाहून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रशिक्षक जे.एच. इंगळे यांनी खेळाडूंना शपथ दिली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. पी.टी. गायकवाड यांनी केले. धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. बाबासाहेब उलपे यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, छत्रपती पुरस्कार विजेते संभाजी पाटील यांच्यासह शारीरिक शिक्षण संचालक, क्रीडापटू, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment