शिवाजी विद्यापीठात आयोजित बैठकीत अधिविबागप्रमुखांसमवेत संवाद साधताना युजीसीचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन. शेजारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. |
शिवाजी विद्यापीठाच्या कुलपती उद्यानाच्या नामफलकाचे अनावरण करताना डॉ. भूषण पटवर्धन, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह मान्यवर. |
शिवाजी विद्यापीठाच्या कुलपती उद्यानात नारळाचे रोप लावल्यानंतर त्यास पाणी वाहताना डॉ. भूषण पटवर्धन. |
कोल्हापूर, दि. ९ मार्च: जे ज्येष्ठ नागरिक
केवळ ज्ञानार्जनाच्या आनंदासाठी पीएच.डी.चे संशोधन करू इच्छितात, त्यांना वय,
शिक्षण आदी कोणतीही अट न लावता त्यांना संशोधनाची मुभा देण्याबाबत विद्यापीठ
अनुदान आयोग (युजीसी) सकारात्मक आहे. या संदर्भातील सविस्तर नियमावली ठरविण्यासाठी
आयोगाने स्वतंत्र समिती नियुक्त केली आहे, अशी माहिती नवी दिल्ली येथील विद्यापीठ
अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी आज येथे दिली.
डॉ. पटवर्धन यांनी आज सकाळी शिवाजी विद्यापीठातील
अधिष्ठाता, अधिविभागप्रमुख आणि संचालक यांच्याशी शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने
सविस्तर चर्चा केली आणि त्यांच्या विविध शंकांचे समाधानही केले. या बैठकीमध्ये ते
बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते तर प्र-कुलगुरू डॉ.
डी.टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते.
डॉ. पटवर्धन म्हणाले, सध्याचे पीएच.डी.चे निकष हे
पात्रता ठरविण्यासाठीचे असल्यामुळे कठोर आहेत. तथापि, अनेक विद्यापीठांकडे ज्येष्ठ
नागरिक किंवा विविध क्षेत्रांत भरीव योगदान देत असलेले कलाकार अगर मान्यवर येत
असतात, ज्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात पीएच.डी. करावयाची असते. या संशोधन
कामाचा त्यांना नोकरीसाठी अगर अन्य कारणांसाठी कोणताही लाभ मिळवावयाचा नसतो. केवळ
ज्ञानार्जनाची आस त्यामागे असते. अशा ज्येष्ठांना प्रचलित पीएच.डी.चे निकष, नियम
शिथील करून संशोधनाची परवानगी देण्याची बाब युजीसीच्या विचाराधीन होती. त्यानुसार,
आयोगाने एक स्वतंत्र समिती नेमून यासाठीचे धोरण निश्चित करण्यासाठी पावले उचलली
आहेत. याचा समाजातल्या अनेक लोकांना लाभ होईल. त्याचप्रमाणे त्यांच्या अनुभवाचेही
संशोधनाच्या रुपाने संचित निर्माण होईल.
युजीसीने शैक्षणिक संस्थांसाठीचा दर्जा सुधारणा कार्यक्रम
प्रभावीपणे राबविण्याचे ठरविले असल्याचे सांगून डॉ. पटवर्धन म्हणाले, शैक्षणिक
संस्थांचे क्षमता संवर्धन, संशोधनाची दर्जावृद्धी, मानव्यविद्या व भाषा विषयांमधील
संशोधनास प्रोत्साहन, विद्यार्थीकेंद्री अध्ययन पद्धती, शिक्षकांसाठी क्षमता
संवर्धन कार्यक्रम या पंचसूत्रीच्या आधारे युजीसीने भविष्यातील वाटचाल करण्याचे
ठरविले आहे. त्यासाठी भरीव निधीचीही तरतूद करण्यात येणार आहे. विद्यापीठे आणि
शैक्षणिक संस्थांकडून सादर होणाऱ्या समाजोपयोगी प्रकल्पांना त्यांच्या
महत्त्वानुसार भरीव आर्थिक निधी देण्याची तरतूद करण्यात येणार आहे. राष्ट्रीय
महत्त्वाचे उपक्रमही हाती घेण्यास विद्यापीठांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. विशेषतः
मानव्यविद्या, भाषा, भाषाविज्ञान यांसारख्या दुर्लक्षित किंवा कमी निधी दिल्या जात
असलेल्या विद्याशाखांसाठीही भरघोस तरतूद करून त्यासंदर्भातील संशोधनाला चालना
देण्याचे धोरण युजीसीने स्वीकारले आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मूळ प्रवेशित
शिक्षण संस्थेबरोबरच सुटीच्या कालावधीत अन्य ठिकाणाहून जरी एखादा अभ्यासक्रम केला,
तर त्याचे क्रेडिट गुण त्याला मिळावेत, यासाठी ‘नॅशनल एकॅडेमिक
क्रेडिट बँक’ हा एक अभिनव उपक्रम युजीसीच्या विचाराधीन
असल्याचेही त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, शिवाजी
विद्यापीठाने आजपर्यंत युजीसीच्या विविध उपक्रमांत, प्रकल्पांत सक्रिय सहभाग
दर्शविला आहे. येथून पुढील काळातही युजीसीच्या सर्व नूतन उपक्रमांतही विद्यापीठ
हिरीरीने सहभागी होईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांनी यावेळी स्वागत व
परिचय करून दिला. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. यावेळी शैक्षणिक
सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील यांच्यासह अधिष्ठाता
डॉ. पी.डी. राऊत, डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीनंतर डॉ. पटवर्धन यांच्या हस्ते कुलपती
उद्यानाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. त्याचप्रमाणे हा उद्यानात त्यांच्या
हस्ते नारळाचे रोप लावण्यात आले. यावेळी उद्यान विभागाचे उपकुलसचिव डॉ. व्ही.एन.
शिंदे, अधीक्षक श्री. जाधव उपस्थित होते.
No comments:
Post a Comment