डॉ. राजेंद्रसिंह राणा |
शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. राजेंद्रसिंह राणा. शेजारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आदी. |
कोल्हापूर, दि. २७ मार्च: पाण्यावरुन
होणारे तिसरे जागतिक महायुद्ध रोखायचे झाल्यास जलसाक्षरतेला पर्याय नाही. जलसाक्षरता
रुजविण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ
जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठ आणि असोसिएशन
ऑफ आर्किटेक्ट्स एन्ड इंजिनिअर्स, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागे व्हा, पंचगंगेसाठी’ या मोहिमेअंतर्गत व जागतिक जलदिनाच्या
निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विशेष व्याख्यानात ते बोलत होते.
विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
जलसाक्षरतेचे काम महाराष्ट्रात अत्यंत उत्तम पद्धतीने झाल्याचे
कौतुकोद्गार काढून डॉ. राणा म्हणाले, या मोहिमेमुळे महाराष्ट्र अधिकाधिक पाणीदार
होण्यास मदत झाली. जलयोद्धा आणि जलनायक नियुक्त करण्याची कल्पनाही अत्यंत
महत्त्वाची ठरली. तथापि, शिवाजी विद्यापीठासह राज्यातील प्रत्येक विद्यापीठाने राष्ट्रीय
सेवा योजना, भूगर्भशास्त्र तसेच अन्य संबंधित विषयांशी निगडित विद्यार्थ्यांचे चमू
करून आपापल्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये जलसाक्षरताविषयक जगजागृती
मोहिमा राबविण्याची गरज आहे. आजघडीला सर्वाधिक धरणे महाराष्ट्रात आहेत, मात्र
शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्याही महाराष्ट्रातच होत आहेत. या पार्श्वभूमीवर,
येथून पुढच्या काळात मध्यवर्ती सिंचन व्यवस्था ही आता कालबाह्य होऊ लागली आहे.
एकविसाव्या शतकात आता जमिनीचे जल-पुनर्भरण हाच पाण्यासाठीचा संवर्धनशील उपाय
असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. राजेंद्र सिंह राणा म्हणाले, जगात नागरिकांचे ऐच्छिक स्थलांतर हितकारक
आहे. मात्र परिस्थितीजन्य सक्तीचे स्थलांतर हे कधीही हितकारक ठरत नाही.
सद्यस्थितीत देशातील स्थलांतर गावांकडून मोठ्या शहरांपुरते मर्यादित आहे. मात्र,
त्यामुळेही शहरांवरील एकूणच भार वाढतो आहे. यापुढील काळात मध्य आशिया आणि
आफ्रिकेतील नागरिकांप्रमाणे आपल्यावर देश सोडण्याची वेळ येणार नाही, याची दक्षता
आपण वेळीच घ्यायला हवी. गावे उजाड होणे आणि शहरांवरील लोकसंख्येच्या बोजा वाढणे या
दोन्ही बाबी धोकादायक आहेत. त्या दृष्टीने नैसर्गिक स्रोतांचे पुनर्भरण व
पुनरुज्जीवन अत्यंत गरजेचे आहे.
कोल्हापूरची सुमारे चार तासांची भ्रमंती अत्यंत समाधानकारक व आनंददायी
ठरल्याचे सांगून डॉ. राणा म्हणाले, जयंती आणि गोमती या नद्यांचे प्रदूषण बऱ्याच
अंशी नियंत्रणात राखले असल्याचा हा आनंद आहे. कोल्हापूरची एसटीपी यंत्रणा (सांडपाणी
प्रक्रिया प्रकल्प) कार्यरत आहेत, ही फार महत्त्वाची बाब आहे. पाण्याचा दर्जा
सुधारण्याचे काम येथे सातत्याने सुरू राहील, याची दक्षता घ्या. त्याचप्रमाणे शासनाच्या
नोंदींमध्ये गोमती व जयंती या मूळच्या नद्यांची नाले म्हणून नोंद झालेली आहे. ती
बदलून पुन्हा त्यांना नद्या म्हणून नोंद करण्याची प्रक्रिया आयुक्त डॉ. कलशेट्टी
यांनी त्यांच्या कारकीर्दीत राबवावी, असे आवाहन त्यांनी केले.
स्वच्छ पाणी व सांडपाणी ही आपण स्वतंत्रच ठेवले पाहिजेत. सांडपाणी
स्वच्छ पाण्यात मिसळू देऊन त्यानंतर त्याचे शुद्धीकरण करणे खूपच महाग पडते.
शुद्धीकरणावरील खर्च अनाठायी वाढतो. जेथून सांडपाणी निर्माण होते, त्याच ठिकाणी
त्यावर प्रक्रिया केल्यास तर त्याच्या शुद्धीकरणाचा खर्च शंभर पटीने कमी होऊ शकतो,
असे मतही राणा यांनी व्यक्त केले.
पाण्याचे संवर्धन करावयाचे, तर आता जंगलांना आणि गवताला आगी लावणे
थांबविले पाहिजे. त्याचप्रमाणे जमिनीची धूप थांबवावयाची असेल, तर गवत वाचविण्याची
मोठी गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी |
यावेळी कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आपण
शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याचा अभिमान आहे, असे सांगितले. ते म्हणाले,
मी संगमेश्वर महाविद्यालयाचा विद्यार्थी. मात्र राष्ट्रीय सेवा योजनेच्या
माध्यमातून सामाजिक उपक्रमांत सहभागाची संधी मिळाली. पर्यावरण संवर्धनाचे धडे
तिथेच गिरवले. संपूर्ण शासकीय सेवेची प्रेरणा एन.एस.एस.च्या माध्यमातून मिळाली.
कोणताही उपक्रम यशस्वी होण्यासाठी त्यामध्ये लोकसहभाग अत्यंत गरजेचा असल्याचे
त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, शिवाजी विद्यापीठ केवळ आपल्या
कॅम्पसवरीलच नव्हे, तर कोल्हापूर शहरासह या जिल्ह्यातील नैसर्गिक स्रोतांच्या
संवर्धनासाठीही प्रयत्नशील आहे. या परिसरातील हे नैसर्गिक वरदान टिकवून
ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी शिवाजी विद्यापीठ
सातत्याने योगदान देत राहील, याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी विनोद बोधनकर यांनीही मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर कुलसचिव
डॉ. विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, तंत्रज्ञान अधिविभागाचे
संचालक डॉ. जे.एस. बागी, असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, अनिल कानडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत यांनी केले. श्री. कोराणे यांनी
प्रास्ताविक केले. गौरी चोरगे, आसावरी जाधव यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.
आरती परीट यांनी सूत्रसंचालन केले, तर वंदना कुसाळकर यांनी आभार मानले. यावेळी इंजिनिअरिंग असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक, पर्यावरणप्रेमी नागरिक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘बेपानी
से पानीदार बना शिवाजी विश्वविद्यालय’
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या कारकीर्दीत
आपण तीन दिवस शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पसवर मुक्काम केल्याची आठवण सांगताना डॉ.
राणा म्हणाले, त्यावेळी डॉ. साळुंखे यांच्याशी चर्चा करताना विद्यापीठाच्या
साडेआठशे एकराच्या परिसरामध्ये पाण्याच्या संदर्भात स्वयंपूर्ण होण्याची क्षमता
असून त्या दृष्टीने जलसंवर्धनाच्या योजना राबवाव्यात, असे त्यांना सांगितले होते.
त्यानंतर आज या विद्यापीठाला भेट दिल्यानंतर अवघ्या दहा वर्षांत विद्यापीठ ‘बेपानी से पानीदार’ व स्वयंपूर्ण
झाल्याचे पाहून अत्यंत आनंद झाला. जमिनीवरील पाण्याबरोबरच जमिनीखालील पाण्याचे
संवर्धन करण्यात विद्यापीठ यशस्वी ठरले आहे. त्याचप्रमाणे येथील आर.ओ.
प्रकल्पाच्या माध्यमातून इथल्या प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ पाणी उपलब्ध करण्याचा
प्रयोगही आवडल्याचे त्यांनी सांगितले.
व्याख्यानापूर्वी डॉ. राणा यांनी विद्यापीठ परिसरात फेरफटका मारून
विद्यापीठाच्या जलसंवर्धनाच्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
No comments:
Post a Comment