Wednesday, 13 March 2019

लोकशाही प्रगल्भ करण्यासाठी सोशल मिडीयाचा योग्य वापर होणे आवश्यक - जिल्हाधिकारी दौलतराव देसाई


कोल्हापूर, दि.13 मार्च - भयमुक्त वातावरणामध्ये निवडणुका पार पाडण्यासाठी आणि भारतीय लोकशाही प्रगल्भ करण्यासाठी सोशल मिडीयाचा योग्य वापर होणे आवश्यक आहे.तसेच, कोणत्याही प्रलोभनाला बळी पडता सद्सदविवेकबुध्दीने प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दौलतराव देसाई यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता जनसंवाद अधिविभाग, कोल्हापूर प्रेस क्लब आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'निवडणूका आणि सोशल मीडिया' या विषयावर सुवर्णमहोत्सवी एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.  त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी दौलतराव देसाई बोलत होते. मानव्यशास्त्र सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे होते.
जिल्हाधिकारी दौलतराव देसाई पुढे बोलताना म्हणाले, देशामध्ये साधारण नऊशे दशलक्ष मतदार 2019 च्या निवडणुकांमध्ये मतदान करणार आहेत.कोल्हापूर जिल्हयामध्ये साधारण बत्तीस लाख पंचाहत्त हजार मतदार आहेत. यामध्ये आठरा ते एेकोणतीस या तरूण वयोगटामध्ये सहा लाख मतदार आहेत.सोशल मिडीयाचा वापर या तरूण नागरिकांमध्ये जास्त प्रमाणात आहे.ग्रामीण आणि शहरी भागातील तरूणांमध्ये सोशल मिडीयाच्या वापरामध्ये फारसा फरक नाही.सोशल मिडीया ही दुधारी तलवार आहे. नागरिक आणि राजकीय पक्षांकडून निवडणुकांमध्ये सोशल मिडीयाचा वापर योग्य प्रकारे झाल्यास देशाची लोकशाही मजबूत होण्यास मदत होईल.सोशल मिडीया हे अदृश्य हातांनी हाताळले जाते.  यामध्ये प्रत्येक नागरिक हा पत्रकार म्हणून काम करीत असतो.समाजाच्या भल्यासाठी या अदृश्य हातांचा वापर झाला पाहिजे.आज, देशामध्ये सहाशे दशलक्ष मोबाईल इंटरनेट वापरकर्ते आहेत ते दिवसातील दोनशे मिनिटे सोशल मिडीयावर खर्च करीत असतात. या माध्यमांद्वारे कमी वेळेत फार मोठया समुहापर्यंत संदेश पोहचू शकतो.सोशल मिडीयाच्या वापरामध्ये राजकीय पक्षांमध्ये सुसंगती असली पाहिजे. आभासी प्रतिमा निर्माण करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होवू शकतो.अशा वेळी सोशल मिडीयाचा निवडणूकांमध्ये वापर करताना कोड ऑफ कंडक्टचा योग्य वापर प्रत्येकाने केला पाहिजे.फेक न्युजवर कार्यवाही करण्यासाठी देशपातळीवर आयटी ॲक्टमध्ये दुरूस्ती करण्याचे काम सुरू आहे.सोशल मिडीयावर उमेदवाराची प्रसिध्दी अथवा तिरस्कार करणे अयोग्य ठरेल.मिडीया मॉनिटरींग कक्षाकडून प्रमाणिकरण करून घेतल्याशिवाय राजकीय पक्षांना, उमेदवारांना सोशल मिडीयावर प्रचार करता येणार नाही.सोशल मिडीयाचा वापर समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी होणे आवश्यक आहे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे म्हणाले,वापरापेक्षा गैरवापराकडे सोशल मिडीयाचा जास्त प्रमाणात वापर होताना दिसत आहे.सोशल मिडीयाच्या वापराबाबत आचारसंहिता आलेली आहे. अशावेळी समाजामध्ये जनजागृती आणि प्रबोधन करणे हे माध्यमांची कामे आहेत.सोशल मिडीयाच्या वापराबाबत तरूण पिढी आणि सर्वच स्तरांमध्ये संस्कार करण्याची गरज निर्माण झालेली आहे.समाजामध्ये, देशामध्ये तेढ निर्माण होणार नाही यासाठी मेसेज फॉर्वर्ड करीत असताना नेहमी जागृक असले पाहिजे.इंटरनेट हे सध्या जीवन जगण्यासाठीचे अनिवार्य साधन झालेले आहे.इंटरनेट हे रक्तविरहीत क्रांती आहे, या क्रांतीने माहितीचे स्वातंत्र्य दिले.इंटरनेट, सोशल मिडीया या सारख्या महासागरामध्ये वावरताना संस्कार हेच योग्य होकायंत्र होवू शकते.विवेक, संवाद, सुसंवाद या त्रिसुत्रीचा उपयोग सोशल मिडयाचा वापर करताना प्रत्येकान केला पाहिजे.
याप्रसंगी, पद्मश्री सुधाकर ओलवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.विद्यापीठाच्या पत्रकारिता अधिविभागप्रमुख डॉ.निशा पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सहायक प्राध्यापकडॉ.शिवाजी जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
यावेळी विभागीय माहिती संचालक सतीश लळीत, आयटी तज्ज्ञ राजेंद्र पारिजात, सोलापूर विद्यापीठाचे डॉ.रविंद्र चिंचोळकर, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील यांचेसह विविध अधिविभागातील शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठया प्रमाणात उपस्थित होते.
                                                                                  ------


प्रसिध्द छायाचित्रकार पद्मश्री सुधाकर ओलवे यांनी मानव्यशास्त्र इमारत समोरील बागेमध्ये छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले होते.यावेळी विविध छायाचित्रांची अतिशय सुबक पध्दतीने झाडांखाली मांडणी करण्यात आली होती.समाजातील विदारकता आणि कटुसत्याचे चित्रण पाहण्यासाठी विद्यापीठातील विद्यार्थी, विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती.यावेळी कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे आणि जिल्हाधिकारी दौलतराव देसाई यांनी पद्मश्री ओलवे यांच्या छायाचित्रांची आवर्जुन पाहणी केली.




No comments:

Post a Comment