Tuesday 5 March 2019

शिवाजी विद्यापीठाचे सर्व शोधप्रबंध ‘शोधगंगा’वर उपलब्ध



बॅ. खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राची कामगिरी; ६ मार्चला होणार औपचारिक लोकार्पण

कोल्हापूर, दि. ५ मार्च: शिवाजी विद्यापीठाला सादर करण्यात आलेले सन २०१८अखेरपर्यंतचे एकूण ३४९६ शोधप्रबंध इन्फ्लिबनेटच्या शोधगंगा या राष्ट्रीय संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले आहेत. बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या माध्यमातून उद्या (दि. ६ मार्च) आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय परिषदेत या प्रबंधांचे औपचारिक लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत यांनी आज दिली.

डॉ. नमिता खोत यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिजिटल ग्रंथालयाच्या निर्मितीतील एक महत्वाचा टप्पा म्हणजे ग्रंथालयातील उपलब्ध अत्यावश्यक छापील/ मुद्रित पीएच.डी. प्रबंधांचे डिजिटल माध्यमात परिवर्तन होय. डिजिटायझेशन प्रक्रियेत पारंपरिक परिवर्तन करुन ते संगणकीकृत करणे व संगणकाच्या आधारे त्यावर प्रक्रिया करुन संकेतस्थळाच्या माध्यमातून ते संशोधकांना उपलब्ध करुन देणे यांचा समावेश होतो.

शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राकडे उपलब्ध असणाऱ्या सन १९६४पासून २०१८पर्यंतच्या ३४९६ पीएच.डी प्रबंधांचे डिजियटायझेशन करुन ते इनफ्लिबनेटच्या शोधगंगा’ (shodhganga.inflibnet.ac.in) या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहेत. शिवाजी विद्यापीठात झालेले संशोधन संशोधक, अभ्यासकांना उपयोगी पडावेत, या हेतूने विद्यापीठाने अहमदाबादच्या इन्फ्लिबनेट सेंटरशी २१ सप्टेंबर २०११ रोजी सामंजस्य करार केला. या कराराच्या अनुषंगाने विद्यापीठ अनुदान आयोग (नवी दिल्ली) यांच्याकडून सन २०१२मध्ये विद्यापीठाच्या डिजियटायझेशन प्रकल्यासाठी रू. १९ लाख २६ हजार ६५० एवढे अनुदान देण्यात आले. शोधगंगा या संकेतस्थळावर प्रबंध विषयनिहाय पाहणे, वाचणे, डाऊनलोड करून घेणे आदी सुविधा ज्ञानस्रोत केंद्राच्या संदर्भ विभागाद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

या डिजिटायझेशनचे काम गुरगावच्या प्रो-क्वेस्ट या शिखर संस्थेकडे सोपविण्यात आले होते. त्यांच्यामार्फत ज्ञानस्रोत केंद्राकडे उपलब्ध विविध विषयांच्या ३४९६ पीएच.डी प्रबंधांचे संपूर्ण स्कॅनिंग व इतर अनुषंगिक तांत्रिक कामे करून हे सर्व प्रबंध शोधगंगाया राष्ट्रीय रिपॉझिटरी पोर्टलवर उपलब्ध केले आहेत.

या डिजिटायझेशनच्या कामात उपग्रंथपाल डॉ. डी.बी सुतार, सहाय्यक ग्रंथपाल डॉ. पी. बी. बिलावर यांच्यासह वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक व संदर्भ विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र खामकर व ग्रंथालय मदतनीस रविंद्र बचाटे यांनी मोलाचे योगदान दिल्याचेही डॉ. खोत यांनी सांगितले.

दरम्यान, उद्या, बुधवार दि. ६ मार्च रोजी ज्ञानस्रोत केंद्रातर्फे आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेत शोधगंगावर  अपलोड करण्यात आलेल्या प्रबंधांचे औपचारिक लोकार्पण करण्यात येणार असून यावेळी प्रो-क्वेस्ट कंपनीचे प्रताप दास, आनंदिता सेनगुप्ता व सचिन मोरे उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीही डॉ. खोत यांनी दिली.

संशोधकांच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प: कुलगुरू डॉ. शिंदे

शिवाजी विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्राने इन्फ्लिबनेटच्या शोधगंगा पोर्टलवर सन १९६४ ते २०१८ पर्यंतचे सुमारे ३४९६ पीएच.डी.चे शोधप्रबंध अपलोड करून एक महत्त्वाचे राष्ट्रीय कर्तव्यच पार पाडले आहे. या उपक्रमामुळे विद्यापीठाकडील संशोधकीय ज्ञान जगभरातील संशोधकांना आता खुले झाले आहे. विद्यापीठात गेल्या ५५ वर्षांत विविध विषयांवर मौलिक संशोधन झाले आहे. त्याचा नवसंशोधकांना संदर्भसाहित्य म्हणून मोलाचा लाभ होणार आहे. विशेष म्हणजे राज्यात अशा प्रकारे सर्व शोधप्रबंध अपलोड करणारे शिवाजी विद्यापीठ हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या खालोखाल तिसरे आहे, ही यातील महत्त्वाची बाब आहे. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी योगदान देणारे ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत आणि त्यांचे सर्व सहकारी अभिनंदनास पात्र आहेत, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment