Showing posts with label UGC. Show all posts
Showing posts with label UGC. Show all posts

Saturday, 9 March 2019

ज्येष्ठ नागरिकांना पीएच.डी. संशोधनाची संधी देण्याबाबत ‘युजीसी’ सकारात्मक

- उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांची माहिती

शिवाजी विद्यापीठात आयोजित बैठकीत अधिविबागप्रमुखांसमवेत संवाद साधताना युजीसीचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन. शेजारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.


शिवाजी विद्यापीठाच्या कुलपती उद्यानाच्या नामफलकाचे अनावरण करताना डॉ. भूषण पटवर्धन, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह मान्यवर.

शिवाजी विद्यापीठाच्या कुलपती उद्यानात नारळाचे रोप लावल्यानंतर त्यास पाणी वाहताना डॉ. भूषण पटवर्धन.

कोल्हापूर, दि. ९ मार्च: जे ज्येष्ठ नागरिक केवळ ज्ञानार्जनाच्या आनंदासाठी पीएच.डी.चे संशोधन करू इच्छितात, त्यांना वय, शिक्षण आदी कोणतीही अट न लावता त्यांना संशोधनाची मुभा देण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) सकारात्मक आहे. या संदर्भातील सविस्तर नियमावली ठरविण्यासाठी आयोगाने स्वतंत्र समिती नियुक्त केली आहे, अशी माहिती नवी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी आज येथे दिली.
डॉ. पटवर्धन यांनी आज सकाळी शिवाजी विद्यापीठातील अधिष्ठाता, अधिविभागप्रमुख आणि संचालक यांच्याशी शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा केली आणि त्यांच्या विविध शंकांचे समाधानही केले. या बैठकीमध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते तर प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते.
डॉ. पटवर्धन म्हणाले, सध्याचे पीएच.डी.चे निकष हे पात्रता ठरविण्यासाठीचे असल्यामुळे कठोर आहेत. तथापि, अनेक विद्यापीठांकडे ज्येष्ठ नागरिक किंवा विविध क्षेत्रांत भरीव योगदान देत असलेले कलाकार अगर मान्यवर येत असतात, ज्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात पीएच.डी. करावयाची असते. या संशोधन कामाचा त्यांना नोकरीसाठी अगर अन्य कारणांसाठी कोणताही लाभ मिळवावयाचा नसतो. केवळ ज्ञानार्जनाची आस त्यामागे असते. अशा ज्येष्ठांना प्रचलित पीएच.डी.चे निकष, नियम शिथील करून संशोधनाची परवानगी देण्याची बाब युजीसीच्या विचाराधीन होती. त्यानुसार, आयोगाने एक स्वतंत्र समिती नेमून यासाठीचे धोरण निश्चित करण्यासाठी पावले उचलली आहेत. याचा समाजातल्या अनेक लोकांना लाभ होईल. त्याचप्रमाणे त्यांच्या अनुभवाचेही संशोधनाच्या रुपाने संचित निर्माण होईल.
युजीसीने शैक्षणिक संस्थांसाठीचा दर्जा सुधारणा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे ठरविले असल्याचे सांगून डॉ. पटवर्धन म्हणाले, शैक्षणिक संस्थांचे क्षमता संवर्धन, संशोधनाची दर्जावृद्धी, मानव्यविद्या व भाषा विषयांमधील संशोधनास प्रोत्साहन, विद्यार्थीकेंद्री अध्ययन पद्धती, शिक्षकांसाठी क्षमता संवर्धन कार्यक्रम या पंचसूत्रीच्या आधारे युजीसीने भविष्यातील वाटचाल करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी भरीव निधीचीही तरतूद करण्यात येणार आहे. विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांकडून सादर होणाऱ्या समाजोपयोगी प्रकल्पांना त्यांच्या महत्त्वानुसार भरीव आर्थिक निधी देण्याची तरतूद करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महत्त्वाचे उपक्रमही हाती घेण्यास विद्यापीठांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. विशेषतः मानव्यविद्या, भाषा, भाषाविज्ञान यांसारख्या दुर्लक्षित किंवा कमी निधी दिल्या जात असलेल्या विद्याशाखांसाठीही भरघोस तरतूद करून त्यासंदर्भातील संशोधनाला चालना देण्याचे धोरण युजीसीने स्वीकारले आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मूळ प्रवेशित शिक्षण संस्थेबरोबरच सुटीच्या कालावधीत अन्य ठिकाणाहून जरी एखादा अभ्यासक्रम केला, तर त्याचे क्रेडिट गुण त्याला मिळावेत, यासाठी ‘नॅशनल एकॅडेमिक क्रेडिट बँक’ हा एक अभिनव उपक्रम युजीसीच्या विचाराधीन असल्याचेही त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने आजपर्यंत युजीसीच्या विविध उपक्रमांत, प्रकल्पांत सक्रिय सहभाग दर्शविला आहे. येथून पुढील काळातही युजीसीच्या सर्व नूतन उपक्रमांतही विद्यापीठ हिरीरीने सहभागी होईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांनी यावेळी स्वागत व परिचय करून दिला. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. यावेळी शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील यांच्यासह अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीनंतर डॉ. पटवर्धन यांच्या हस्ते कुलपती उद्यानाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. त्याचप्रमाणे हा उद्यानात त्यांच्या हस्ते नारळाचे रोप लावण्यात आले. यावेळी उद्यान विभागाचे उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, अधीक्षक श्री. जाधव उपस्थित होते.

Friday, 22 April 2016

'नेचर' ई-जर्नल वापरामध्ये शिवाजी विद्यापीठ देशात दुसरे




द्वितिय 'एनपीजी ई-जर्नल युसेज ॲवॉर्ड-२०१५' विद्यापीठास घोषित
कोल्हापूर, दि. २२ एप्रिल: जागतिक स्तरावरील नामांकित पालग्रेव्ह मॅकमिलन समूहाच्या 'नेचर पब्लिशिंग ग्रुप'तर्फे 'एनपीजी ई-जर्नल्स युसेज ॲवॉर्ड-२०१५'मधील द्वितिय क्रमांकाचा पुरस्कार शिवाजी विद्यापीठाला घोषित करण्यात आला आहे. ही माहिती विद्यापीठाच्या ग्रंथपाल डॉ. नमिता खोत यांनी दिली. 'युनेस्को'च्या जागतिक पुस्तक व कॉपीराइट दिनाच्या पूर्वसंध्येला हा पुरस्कार घोषित झाल्याने याचा आनंद अधिक आहे, असेही त्या म्हणाल्या.
युजीसी-इन्फ्लिबनेट सुविधेच्या माध्यमातून नेचर समूहाचे जर्नल संदर्भासाठी सर्वाधिक वापरल्याबद्दल नेचर पब्लिशिंग ग्रुपतर्फे हा वैशिष्ट्यपूर्ण पुरस्कार घोषित झाला आहे. नेचर प्रकाशन समूहाचे भारतातील सहाय्यक सरव्यवस्थापक राजेंद्र कुमार यांनी ई-मेलद्वारे ही माहिती दिली आहे. शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी संदर्भासाठी ऑनलाइन ई-जर्नल सुविधांचा अत्यंत चिकित्सकपणे वापर करीत आहेत, हे यातून स्पष्ट झाले आहे.
प्रथम क्रमांकाचा 'एनपीजी ई-जर्नल्स युसेज ॲवॉर्ड-२०१५' कोचीन येथील कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजीला; तर, तृतीय क्रमांकाचा पुरस्कार नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला जाहीर झाला आहे.
विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) यांच्यातर्फे विद्यापीठांसाठी इन्फ्लिबनेट अर्थात इन्फोनेट डिजीटल लायब्ररी कॉन्सॉर्शियम हा अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम राबविलेला आहे. याअंतर्गत विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे जगभरातील विविध विषयांचे जर्नल (संशोधन पत्रिका) व अधिकृत डाटाबेस उपलब्ध करून देण्यात येतात. जेणे करून संबंधित संशोधक विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयातील जगभरातील अद्ययावत ज्ञान उपलब्ध व्हावे आणि त्यांचे संशोधन अधिक परिपूर्ण व्हावे. आजघडीला शिवाजी विद्यापीठात सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून ५१ आणि इन्फ्लिबनेटच्या माध्यमातून ८५९२ अशी एकूण ८६४३ ई-जर्नल व १० डाटाबेस संशोधक विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. यामधील नेचर संशोधनपत्रिकेच्या व्यक्तीगत वापरामध्ये सन २०१४च्या तुलनेत सन २०१५मध्ये भरीव वाढ नोंद झाली. इन्फ्लिबनेटच्या ई-जर्नल वापराच्या आकडेवारीनुसार, हा आकडा ३४वरुन १८४४ इतका वाढला. त्यामुळेच नेचर पब्लिशिंग ग्रुपच्या द्वितिय पुरस्कारास शिवाजी विद्यापीठ पात्र ठरले, अशी माहिती डॉ. नमिता खोत यांनी दिली.
केवळ नेचर संशोधन पत्रिकाच नव्हे, तर अन्य संशोधन पत्रिकांच्या एकूण वापरातही सन २०१५मध्ये भरीव वाढ दिसून आली आहे. विद्यापीठातील इन्फ्लिबनेट संशोधक वापरकर्त्यांची संख्या सन २०१४मध्ये २ लाख ८९ हजार ९२३ इतकी होती; ती सन २०१५मध्ये ३ लाख ४ हजार ५५२ इतकी झाली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

'एन.आय.आर.एफ.' क्रमवारीनंतर आणखी एक उत्साहवर्धक बहुमान: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
शिवाजी विद्यापीठातील संशोधक मूलभूत संशोधनामध्ये अत्यंत उत्तम कामगिरी बजावत आहेत, हे 'स्कोपस'च्या आकडेवारीवरुन वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. 'नेचर'सारख्या जागतिक दर्जाच्या अत्यंत प्रतिष्ठित संशोधन पत्रिकेचा संदर्भ म्हणून विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी अत्यंत गांभिर्याने वापर करीत आहेत, ही अतिशय समाधानाची बाब आहे. युजीसी-इन्फ्लिबनेटच्या माध्यमातून जगभरातील आठ हजारांहून अधिक जर्नल आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहेत आणि त्यांचा योग्य प्रकारे ते लाभ घेत आहेत, हे महत्त्वाचे आहे. विद्यापीठ कॅम्पसवरील तीन हजार संगणक जोडण्यांच्या माध्यमातून ही सेवा संशोधक विद्यार्थ्यांना २४ तास उपलब्ध करून दिली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे नुकत्याच घोषित झालेल्या 'एन.आय.आर.एफ.' रँकिंगमध्ये देशात २८वे आणि राज्यात पहिले स्थान मिळविल्यानंतर 'नेचर'च्या वापरातही विद्यापीठाने देशात दुसरा क्रमांक प्राप्त केला, हा एक अनपेक्षित तरीही उत्साहवर्धक बहुमान आहे. त्याबद्दल विद्यापीठातील शिक्षक, संशोधक, विद्यार्थी आणि ग्रंथालयातील सर्व सहकाऱ्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

Monday, 5 May 2014

शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात बी.व्होक. अभ्यासक्रमास मान्यता



कोल्हापूर, दि. ५ मे: शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दोन महाविद्यालयांमध्ये बी.व्होक. हा ३ वर्षांचा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम राबविण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (युजीसी) मान्यता मिळाल्याची माहिती विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक प्राचार्य डॉ. ए.बी. राजगे यांनी आज दिली.
यासंदर्भात माहिती देताना डॉ. राजगे म्हणाले की, केंद्र सरकारच्या नॅशनल स्कील क्वालिफिकेशन फ्रेमवर्क (एनएसक्यूएफ) या नूतन उपक्रमांतर्गत युजीसीने देशातल्या विविध विद्यापीठांकडून बॅचलर ऑफ व्होकेशन (बी.व्होक.) हा ३ वर्षांचा पदवी व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत १५ एप्रिलपर्यंत प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाने दहा महाविद्यालयांचे प्रस्ताव सादर केले होते. महाराष्ट्रातील एकूण २८ महाविद्यालयांत हा अभ्यासक्रम सुरू करण्यास युजीसीकडून नुकतीच मान्यता प्राप्त झाली असून त्यांमध्ये कोल्हापूर येथील कमला महाविद्यालय आणि विवेकानंद महाविद्यालय या दोन महाविद्यालयांचा समावेश आहे. कमला महाविद्यालयात रिटेल मॅनेजमेंट ॲन्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि फूड प्रोसेसिंग ॲन्ड मॅनेजमेंट हे दोन अभ्यासक्रम, तर विवेकानंद महाविद्यालयात ग्राफिक डिझाईन आणि फौंड्री टेक्नॉलॉजी हे दोन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यासाठी युजीसीकडून या महाविद्यालयांना प्रत्येकी १ कोटी ८५ लाख रुपयांचे अनुदानही देण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
बी.व्होक अभ्यासक्रमाची उपयुक्तता सांगताना डॉ. राजगे म्हणाले, आजघडीला विद्यापीठीय शिक्षणातून देशातील व्यवसाय-उद्योगांना आवश्यक असणारे कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होण्याचे प्रमाण अल्प आहे. योग्य प्रशिक्षण व कौशल्याअभावी विद्यार्थ्यांना रोजगार संधीही मिळत नाहीत. यावर उपाय म्हणून सर्वसाधारण शिक्षणामधूनच व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रम राबवून उद्योग-व्यवसायांची गरज भागवून, बेरोजगारी दूर करण्यासाठी युजीसीने बी.व्होक. अभ्यासक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. बारावीपर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढचे पदवी शिक्षण पुरविण्याच्या दृष्टीनेही बी.व्होक अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे. यातून उद्योगांची मागणी आणि कुशल, प्रशिक्षित मनुष्यबळ यातील दरी कमी होऊन रोजगारक्षम युवक निर्माण होतील. यातून उद्योगांची गरज भागून बेरोजगारीची समस्याही कमी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.