द्वितिय 'एनपीजी ई-जर्नल युसेज ॲवॉर्ड-२०१५' विद्यापीठास घोषित
कोल्हापूर, दि. २२ एप्रिल: जागतिक स्तरावरील नामांकित पालग्रेव्ह
मॅकमिलन समूहाच्या 'नेचर पब्लिशिंग ग्रुप'तर्फे 'एनपीजी ई-जर्नल्स युसेज ॲवॉर्ड-२०१५'मधील द्वितिय क्रमांकाचा पुरस्कार
शिवाजी विद्यापीठाला घोषित करण्यात आला आहे. ही माहिती विद्यापीठाच्या ग्रंथपाल
डॉ. नमिता खोत यांनी दिली. 'युनेस्को'च्या जागतिक पुस्तक व कॉपीराइट दिनाच्या पूर्वसंध्येला हा
पुरस्कार घोषित झाल्याने याचा आनंद अधिक आहे, असेही त्या म्हणाल्या.
प्रथम क्रमांकाचा 'एनपीजी ई-जर्नल्स युसेज
ॲवॉर्ड-२०१५' कोचीन येथील कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजीला; तर, तृतीय क्रमांकाचा पुरस्कार
नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला जाहीर झाला आहे.
विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी)
यांच्यातर्फे विद्यापीठांसाठी इन्फ्लिबनेट अर्थात इन्फोनेट डिजीटल लायब्ररी
कॉन्सॉर्शियम हा अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम राबविलेला आहे. याअंतर्गत
विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे जगभरातील विविध विषयांचे
जर्नल (संशोधन पत्रिका) व अधिकृत डाटाबेस उपलब्ध करून देण्यात येतात. जेणे करून
संबंधित संशोधक विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयातील जगभरातील अद्ययावत ज्ञान
उपलब्ध व्हावे आणि त्यांचे संशोधन अधिक परिपूर्ण व्हावे. आजघडीला शिवाजी
विद्यापीठात सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून ५१ आणि इन्फ्लिबनेटच्या माध्यमातून ८५९२
अशी एकूण ८६४३ ई-जर्नल व १० डाटाबेस संशोधक विद्यार्थ्यांना उपलब्ध
आहेत. यामधील नेचर संशोधनपत्रिकेच्या व्यक्तीगत वापरामध्ये सन २०१४च्या तुलनेत सन
२०१५मध्ये भरीव वाढ नोंद झाली. इन्फ्लिबनेटच्या ई-जर्नल वापराच्या आकडेवारीनुसार,
हा आकडा ३४वरुन १८४४ इतका वाढला. त्यामुळेच नेचर पब्लिशिंग ग्रुपच्या द्वितिय पुरस्कारास
शिवाजी विद्यापीठ पात्र ठरले, अशी माहिती डॉ. नमिता खोत यांनी दिली.
केवळ नेचर संशोधन पत्रिकाच
नव्हे, तर अन्य संशोधन पत्रिकांच्या एकूण वापरातही सन २०१५मध्ये भरीव वाढ दिसून
आली आहे. विद्यापीठातील इन्फ्लिबनेट संशोधक वापरकर्त्यांची संख्या सन २०१४मध्ये २
लाख ८९ हजार ९२३ इतकी होती; ती सन २०१५मध्ये ३ लाख ४ हजार ५५२ इतकी झाली आहे, अशी
माहितीही त्यांनी दिली.
'एन.आय.आर.एफ.' क्रमवारीनंतर आणखी एक उत्साहवर्धक बहुमान: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
शिवाजी विद्यापीठातील
संशोधक मूलभूत संशोधनामध्ये अत्यंत उत्तम कामगिरी बजावत आहेत, हे 'स्कोपस'च्या
आकडेवारीवरुन वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. 'नेचर'सारख्या जागतिक दर्जाच्या अत्यंत प्रतिष्ठित
संशोधन पत्रिकेचा संदर्भ म्हणून विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी अत्यंत
गांभिर्याने वापर करीत आहेत, ही अतिशय समाधानाची बाब आहे. युजीसी-इन्फ्लिबनेटच्या
माध्यमातून जगभरातील आठ हजारांहून अधिक जर्नल आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून
दिली आहेत आणि त्यांचा योग्य प्रकारे ते लाभ घेत आहेत, हे महत्त्वाचे आहे. विद्यापीठ
कॅम्पसवरील तीन हजार संगणक जोडण्यांच्या माध्यमातून ही सेवा संशोधक विद्यार्थ्यांना
२४ तास उपलब्ध करून दिली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे नुकत्याच
घोषित झालेल्या 'एन.आय.आर.एफ.' रँकिंगमध्ये देशात २८वे आणि राज्यात पहिले स्थान
मिळविल्यानंतर 'नेचर'च्या वापरातही विद्यापीठाने देशात दुसरा क्रमांक प्राप्त केला, हा एक
अनपेक्षित तरीही उत्साहवर्धक बहुमान आहे. त्याबद्दल विद्यापीठातील शिक्षक, संशोधक,
विद्यार्थी आणि ग्रंथालयातील सर्व सहकाऱ्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो, अशी
प्रतिक्रिया शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केली
आहे.
No comments:
Post a Comment