शिवाजी विद्यापीठाचा 'प्राचार्य आर.के. कणबरकर
पुरस्कार' प्रदान
कोल्हापूर, दि. १२
एप्रिल: वय सृजनशीलतेच्या कधीही आड येत नाही. त्यामुळे संशोधकांनी संशोधकीय
सृजनशीलतेमधील आनंद घ्यावा आणि देशाच्या उन्नतीला हातभार लावावा, असे आवाहन
ज्येष्ठ वैज्ञानिक भारतरत्न प्रा. सी.एन.आर. राव यांनी आज येथे केले.
शिवाजी
विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा पहिला 'प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार' प्रा. राव यांना आज कुलगुरू
डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते आणि श्रीमती शालिनी कणबरकर यांच्या प्रमुख
उपस्थितीत प्रदान करण्यात आला. या समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू
डॉ. शिंदे होते.
शिवाजी विद्यापीठात
येण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे याठिकाणी वैज्ञानिक क्षेत्रात अतिशय उत्तम काम
सुरू असल्याचे सुरवातीलाच सांगून प्रा. राव म्हणाले, सुमारे ६५ वर्षांपूर्वी
म्हणजे वयाच्या १७व्या वर्षी मी संशोधनाला सुरवात केली. तेव्हापासून संशोधनात
व्यस्त आहे. आश्चर्याची आणि महत्त्वाची बाब म्हणजे वयाच्या साठाव्या वर्षापासून
माझ्या संशोधनाचे सायटेशन्स वाढू लागले, एच इन्डेक्स वाढू लागला. याचा अर्थ असा
की, वयाचा आणि संशोधन किंवा सृजनशीलतेचा काहीही संबंध नाही. आजही माझे वर्षाकाठी
किमान २५ शोधनिबंध प्रसिद्ध होतात. वयाची कोणतीही मर्यादा न बाळगता मला संशोधन
कार्य करता आले, याचे मोठे समाधान आहे. संशोधनाबरोबरच निःस्वार्थ अध्यापनातला
आनंदही अतिशय निर्मळ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
देशात काहीच चांगले
होत नाही, अशा मानसिकतेतून युवकांनी बाहेर पडावे, असा सल्ला देताना प्रा. राव
म्हणाले, माझे शोधनिबंध विविध देशांतल्या संशोधन पत्रिकांतून प्रसिद्ध झाले असले
तरी, माझे सर्व संशोधन कार्य मी भारतात राहूनच केले आहे. देशात राहून केलेल्या
कामामुळे आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करता आल्याचेही मोठे समाधान लाभले. त्यामुळे
युवकांनी देशात राहून काम करण्याचा निर्धार केल्यास त्याचे फळ निश्चितपणे त्यांना
मिळेल.
नजीकच्या काळात चार
कोटी विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या प्रवाहात सामील करून घेण्याचे आव्हान
आपल्यासमोर उभे असल्याचे सांगून डॉ. राव यांनी जल व्यवस्थापन, ऊर्जा
व्यवस्थापनाच्या क्षेत्रात मोठे काम होण्याची गरज व्यक्त केली. आपल्या देशाला
कोणत्या क्षेत्रात आघाडीवर न्यायचे, याची दिशा युवकांनी ठरवायची आहे. त्यासाठी
विज्ञानाचा आधार घ्यायचा आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
कुलगुरू डॉ. शिंदे
आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, प्रा. राव आणि प्राचार्य कणबरकर या दोघांच्या
जीवनात कष्टाच्या तत्त्वज्ञानाचे साम्य आढळते. आयुष्यात आपल्याला काय मिळेल,
यापेक्षा आपण या देशाला, समाजाला काय देऊ शकतो, याचा ध्यास या दोघांच्या
प्रकृतीमधला समान धागा आहे. त्यामुळे पहिल्या प्राचार्य कणबरकर पुरस्कारासाठी निवड
समितीने भारतरत्न प्रा. राव यांची एकमताने निवड केली, याचा अतिशय आनंद वाटतो.
संशोधन करीत राहिलो तर आपण निश्चितपणे तरुण राहू शकतो, असा सल्लाही त्यांनी
नवसंशोधकांना दिला. प्राचार्य कणबरकर यांच्या कुटुंबियांनी २५ लाख रुपयांचा निधी
या पुरस्कारासाठी विद्यापीठाकडे सुपूर्द करून सरांच्या दातृत्वाचा वारसा पुढे
चालविला असल्याबद्दल त्यांनी सर्व कुटुंबियांचे अभिनंदन केले व आभार मानले.
यावेळी प्रा. राव
यांना कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार प्रदान
करण्यात आला. विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह, मानपत्र व १ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश असे
पुरस्काराचे स्वरुप आहे. कणबरकर कुटुंबियांतर्फे डॉ. अरुण कणबरकर यांनी महालक्ष्मीची
मूर्ती व शाल, श्रीफळ देऊन प्रा. राव यांचा सत्कार केला. सौ. अनिता शिंदे यांनी
श्रीमती इंदुमती राव यांचा सत्कार केला. यावेळी प्रशांत गिरी यांनी तयार केलेल्या प्राचार्य
कणबरकर यांच्या जीवन व कार्याचे दर्शन घडविणाऱ्या चित्रफीतीचे प्रदर्शन करण्यात
आले.
प्राचार्य डॉ. बी.ए.
खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांनी
मानपत्राचे वाचन केले. डॉ. अरुंधती पोवार यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी कुलसचिव
डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment