Thursday, 14 April 2016

राज्यघटनेबाबत समाजाला साक्षर करण्याची जबाबदारी विद्यापीठांनी घ्यावी: ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे






 शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

कोल्हापूर, दि. १४ एप्रिल: राज्यघटनेच्या संदर्भात समाजाला साक्षर करण्याची जबाबदारी विद्यापीठांनी घ्यावी, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार उत्तम कांबळे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठातर्फे आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीच्या निमित्ताने विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या १२५ व्याख्यानांचा समावेश असणाऱ्या गौरव ग्रंथाचे प्रकाशन आणि व्याख्यान अशा संयुक्त समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाची उद्देशिका' या विषयावर बोलताना उत्तम कांबळे म्हणाले, गेल्या सात-आठ वर्षांपासून आपण घटनेच्या उद्देशिकेचे वाचन करायला शिकलो. अगदी महोत्सवही साजरे करू लागलो. पण समजून घेण्यात मात्र कमी पडत आहोत. राज्यघटनेच्या बाबतीत आपण अडाणी आहोत, ही खूप मोठी राष्ट्रीय सामाजिक चूक आहे. असे अडाणी लोक विकास घडवू शकत नाहीत. त्यासाठी विद्यापीठांनीच आता पुढे यावे. दैनंदिन कामकाजाची सुरवात उद्देशिकेच्या वाचनाने करावी. उद्देशिका शिकविणे बंधनकारक करावे, असे आवाहन त्यांनी केले.
विभूतीपूजेचा सिद्धांत राज्यघटना अगर बाबासाहेबांना लावू नका, असे सांगून श्री. कांबळे म्हणाले, राज्यघटनेची निर्मिती ही केवळ राजकीय घटना नव्हती, तर त्या काळाचे अपत्य आहे. तत्कालीन परिस्थितीचे संदर्भ त्यासाठी समजून घ्यावे लागतील. दुष्काळ, महापुरामुळे झालेली जीवितहानी, निरक्षरता, हिंदू-मुस्लीम दंगे, जातिव्यवस्थेच्या झळा, फाळणी, महात्मा गांधी यांच्या हत्या असे अनेक संदर्भ त्यासाठी विचारात घ्यावे लागतील. हे पर्यावरण संपवून नवे पर्यावरण निर्माण करण्याची जबाबदारी बाबासाहेबांवर होती. या देशाला इतिहास नव्हता. होता तो केवळ राजांचा आणि जातींचा. भारताची राज्यघटना लिहीणे ही सोपी गोष्ट नव्हती कारण इथे माणसं नव्हे, जाती राहात होत्या. त्यामुळे या देशाचा खरा इतिहास हा राज्यघटनेपासूनच सुरू होतो. कारण बाकी सर्व माहात्म्य नाकारून व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून तिची निर्मिती करण्यात आली. अशी व्यक्तीला अर्पण करण्यात आलेली ही जगातली एकमेव राज्यघटना आहे.
श्री. कांबळे म्हणाले, उद्देशिका हे राज्यघटना समजून घेण्याचे महत्त्वाचे साधन आहे. राज्यघटनेचा आत्मा, आरसा आहे. राज्यघटनेचा सारांश अवघ्या साठ शब्दांत सांगण्याचे काम उद्देशिका करते. राज्यघटनेतील 'आम्ही भारताचे लोक' हे संबोधन अनेकार्थाने महत्त्वाचे आहे. कारण तत्पूर्वी, या देशातील रहिवाशांत 'आम्ही' ही एकत्वाची भावनाच नव्हती. इथे भावना होती ती केवळ 'मी'पणाची. या देशात तत्पूर्वीस ब्राह्मण होते, क्षत्रिय होते, वैश्य होते, शूद्र होते, पण भारतीय मात्र कोणीच नव्हते. ही भारतीयत्वाची ओळख ही उद्देशिका ठळक करते. या देशावर आधी देवा-धर्माचे अनैसर्गिक (अँटी-नेचर) राज्य होते; तथापि, राज्यघटनेमुळे प्रथमच नैसर्गिक वाटचाल होण्यास प्रारंभ झाला.
सामाजिक न्यायाच्या बाबतीत बाबासाहेब प्रचंड आग्रही होते. न्यायाची मर्यादा जिथे संपते, तिथपासून पुढे सामाजिक न्यायाची सुरवात होते, असे सांगून श्री. कांबळे यांनी उद्देशिकेमधील समता, स्वातंत्र्य, बंधुता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, सार्वभौमत्व या लोकशाही व मानवी मूल्यांचे कालातीत महत्त्व विविध उदाहरणांसह स्पष्ट केले. ज्याला देश म्हणून जगायचे आहे, त्याची राज्यघटनेशी बांधिलकी अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले.
चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टीम (सीबीसीएस) अभ्यासक्रांतर्गत या वर्षापासून संविधान हा विषय विद्यापीठाने बंधनकारक केला असल्याचे सांगून अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, बाबासाहेबांच्या अनेक पैलूंचा वेध घेण्यात आला आहे. तथापि, त्यांच्या विज्ञानवादी दृष्टीकोनाच्या अनुषंगाने अधिक सविस्तर मांडणी होणे आवश्यक आहे. विज्ञान, शहाणपण आणि व्यक्तीमत्त्व या तिहेरी संगमातून बाबासाहेबांचे महान, प्रज्ञासूर्य व्यक्तीमत्त्व आकाराला आले, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, या आवाहनाचा अर्थ शहाणपणा विकसित करणारे शिक्षण घ्या, स्वार्थासाठी नव्हे, तर समाजाच्या भल्यासाठी एकत्र या आणि केवळ आंदोलनादी बाह्य संघर्ष नव्हे, तर मिळविलेल्या ज्ञानासंदर्भात अंतर्गत संघर्ष, विचारमंथन करून व्यक्तीमत्त्व घडवावे, असा घेतला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. बाबासाहेबांच्या विचारांची मांडणी भावनेच्या नव्हे, तर अभ्यासाच्या आधारावर करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
यावेळी उत्तम कांबळे यांच्या हस्ते 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती गौरव ग्रंथा'चे प्रकाशन करण्यात आले. तसेच, डॉ. आंबेडकर यांच्याविषयी १२५ भाषणे आयोजित करणाऱ्या महाविद्यालयांची प्रशंसा करताना प्रातनिधिक स्वरुपात आजरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. होनगेकर यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवनच्या विद्यार्थ्यांनी तेथील ग्रंथालयासाठी सुमारे १२५ पुस्तके व ई-बुक्सच्या सीडी कुलगुरू डॉ. शिंदे यांच्याकडे सोपविल्या. अधीक्षक डॉ. पी.व्ही. अनभुले व सहा. अधीक्षक डॉ. शिंदे यांच्याकडे त्या सुपूर्द करण्यात आल्या.
सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. कृष्णा किरवले यांनी स्वागत व परिचय करून दिला. बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांनी प्रास्ताविक केले. राजेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक, मान्यवर मोेठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमापूर्वी, शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि श्री. उत्तम कांबळे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

'सारी लेकरं आईसाठी श्रीमंतच'
ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी आजच्या कार्यक्रमापूर्वी सकाळी कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या मातोश्री नागरबाई शिंदे यांची निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. आईचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण आवर्जून आलो असल्याचे त्यांनी सांगितले. आईंची भेट घेतल्यानंतर श्री. कांबळे यांनी त्यांना आपले 'आई समजून घेताना...' हे पुस्तक भेट दिले. आणि ते म्हणाले, आई, बाकी काही नाही; पण हे लेकरू गरीब असल्यामुळं तुझ्यासाठी पुस्तक घेऊन आलंय.' यावर आई म्हणाल्या की, आईसाठी तिची लेकरं गरीब कधीच नसतात. तिच्यासाठी सारीच लेकरं श्रीमंत असतात.' आणि त्यानंतर सुमारे अर्धा तास या मायलेकरांत चांगलाच संवाद रंगला.

No comments:

Post a Comment