Wednesday, 6 April 2016

राष्ट्राच्या जडणघडणीत अभियंत्यांच्या मोलाचा वाटा: डॉ. व्ही.के. रैना



कोल्हापूर, दि. ६ मार्च: राष्ट्राच्या जडणघडणीत अभियंत्यांचा मोलाचा वाटा असून आजचे विद्यार्थी उद्याचा भारत घडवतील, असे प्रतिपादन जगप्रसिद्ध अभियंते डॉ. व्ही.के. रैना यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात 'ब्रिज इंजिनियरिंग: रिपेअर ॲन्ड रेट्रोफिटींग ऑफ ब्रिजेस इन नेपाल अर्थक्वेक्स' या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागाच्या टेक्विप कक्षातर्फे आयोजित व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे होते.
डॉ. रैना यांनी २०१५ साली नेपाळमधील विनाशकारी भूकंपात झालेल्या जीवित व वित्तहानीची पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून माहिती दिली. ते म्हणाले, बांधकाम भक्कम करण्याची जबाबदारी उत्तम अभियंता जितक्या नेटक्या पद्धतीने पार पाडतो, तितक्याच उत्तम प्रकारे आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा आखण्याची जबाबदारीही तो स्वीकारतो. नेपाळच्या भूकंपामध्ये याची प्रचिती मोठ्या प्रमाणावर आली. वाळू माफियांकडून पुरविण्यात आलेल्या दर्जाहीन वाळू, सिमेंटच्या साह्याने उभारण्यात आलेली मोठमोठी बांधकामे क्षणभरात जमीनदोस्त झाल्याचे दिसून आले. यातून केवळ नेपाळनेच नव्हे, तर साऱ्या जगानेच धडा घेणे अपेक्षित आहे. तसा तो घेतला गेल्याचे दिसतेही. आता नेपाळसह चीन, भारत, बांगलादेश यांनी बांधकामांच्या आपत्ती व्यवस्थापनविषयक आराखड्याची अधिक दक्षता घेतल्याचे दिसते. जगभरातल्या दर्जेदार आणि दर्जाहीन बांधकामांचा अनेक उदाहरणांसह त्यांनी आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी दोन्ही बाजू समजून घेऊन अधिकाधिक चांगली सृजनशील कामगिरी आपल्या हातून होईल, यासाठी सदैव प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. जगभरातील पूलबांधणीच्या क्षेत्रातील वाटचालीचा व प्रगतीचा त्यांनी यावेळी तपशीलवार आढावा घेतला. यावेळी त्यांनी नेपाळमधील शिवगंगा, रातू व झराई आदी क्षतिग्रस्त पुलांच्या पुनर्स्थापनेच्या कामामधील तांत्रिक बाजूंची अभ्यासपूर्ण माहिती दिली.
बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांनी, डॉ. रैना यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा विद्यापीठातील प्राध्यापक व विद्यार्थी यांना निश्चितपणे फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला.
तं६ज्ञान अधिविभागाचे कार्यकारी संचालक डॉ. ए.के. साहू यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी परीक्षा नियंत्रक महेश काकडे, दूर शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. नितीन सोनजे, पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ यशवंत कोळेकर, प्रशासकीय मंडळाचे सदस्य विकास पाटील, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते. सिव्हील इंजिनीअरिंग समन्वयक महेश साळुंखे, टेक्विप समन्वयक श्रीकांत भोसले, महेश कांबळे, व्ही के कांबळे, बी बी पाटील, पुनश्री फडणीस, नीलेश सुतार, इंडस्ट्री सेलचे समन्वयक हर्षवर्धन पंडित, अमोल कुलकर्णी, सिव्हील इंजिनीअरिंगचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे डॉ. रैना यांनी समाधान केले. तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी आभार मानले. पूजा पवार यांनी सूत्रसंचालन केले.

2 comments:

  1. नेपाळमधील भूकंपाने झालेली जीवित व वित्तहानी, क्षतिग्रस्त पूल मानवी प्रयत्नांनी किती कमी वेळात पुनर्स्थापित केले गेले याचे विवचन डॉ रैना यांनी केले. स्थापत्य अभियांत्रिकीच्या दृष्टीने खूपच उपयोगी व्याख्यान.

    ReplyDelete
    Replies
    1. नक्कीच सर. मनुष्याचा अनुभव किती महान असू शकतो, याचे हे व्याख्यान मूर्तीमंत उदाहरण ठरले.

      Delete