Tuesday 12 April 2016

विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर जयंती समारंभाचे उत्तम कांबळे प्रमुख पाहुणे



कोल्हापूर, दि. १२ एप्रिल: शिवाजी विद्यापीठातर्फे येत्या गुरूवारी (दि. १४ एप्रिल) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती साजरी करण्यात येणार असून ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार उत्तम कांबळे या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दि. १४ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या पोर्चमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येईल. या कार्यक्रमानंतर लगेचच ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार उत्तम कांबळे यांचे 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाची उद्देशिका' या विषयावर व्याख्यान होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. ११ मार्च रोजी शिवाजी विद्यापीठाने १२५ संलग्नित महाविद्यालयांत एकाच वेळी १२५ व्याख्यानांचे आयोजन केले होते. या १२५ व्याख्यानांच्या संपादित ग्रंथाचे प्रकाशनही श्री. कांबळे यांच्या हस्ते यावेळी करण्यात येणार आहे. तरी, विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. कृष्णा किरवले यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment