ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे.एफ. पाटील
यांच्या 'चलननीती' पुस्तकाचे विद्यापीठात प्रकाशन
कोल्हापूर, दि. १ एप्रिल: देशाच्या आर्थिक विकासातील चढउतार व तत्कालीन
बदल सर्वसामान्यांना समजण्यासाठी 'चलननीती' ग्रंथ उपयुक्त ठरेल, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ
अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. जे. एफ. पाटील लिखित 'चलननीती' या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. पाटील यांच्या
हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद
शिंदे होते.
शिवाजी विद्यापीठाचा अर्थशास्त्र अधिविभाग व समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी डॉ. जे. एफ. पाटील, त्यांच्या पत्नी कमल पाटील, समाजवादी प्रबोधिनीचे प्रसाद कुलकर्णी, अर्थशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. व्ही.बी. ककडे, ज्येष्ठ विचारवंत प्रा. ज.रा. दाभोळे, ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले आदी उपस्थित होते.
डॉ. एन. डी. पाटील म्हणाले,
देशाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून विविध धोरणे व योजना यांची निर्मिती केली
जाते. या धोरणांचा परिमाण देशाच्या विकासाबरोबरच सर्वसामान्य माणसांच्या
राहणीमानावर होत असतो. त्यामुळे शासकीय धोरणांचा अर्थशास्त्रीय दृष्टीकोनातून
सर्वसामान्य जनतेला समजेल, अशा
प्रकारे लेखन करण्याचे कार्य डॉ. जे. एफ. पाटील यांच्याकडून अखंडपणे सुरू आहे.
त्यांनी 'चलननीती' पुस्तकाच्या माध्यमातून तत्कालीन परिस्थितीतील शासकीय धोरणे, त्यांचे सर्वसामान्य जनतेवर घडून येणारे दूरगामी परिणाम व त्यामुळे
समाजात होणाऱ्या आर्थिक घडामोडी यांचे सखोल विवेचन केले आहे. त्यांचे लेखन कार्य
हे समाजशास्त्रीय अर्थशास्त्राचे आकलन व शिक्षण देणारे असल्याचे डॉ पाटील म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले,
सर्वसामान्य जनतेला जोपर्यंत अर्थशास्त्र कळणार नाही, तोपर्यंत त्यांना आर्थिक
धोरणांचा फायदा घेता येणार नाही. तसेच त्यांचा अशा योजनेत सहभाग वाढणार नाही.
त्यामुळे सर्वसामान्य जनतेला कळेल, समजेल,
उमजेल अशा भाषेत अर्थशास्त्राचे विवेचन करण्याचे मोठे कार्य डॉ. पाटील यांनी केले
आहे.
यावेळी डॉ. जे. एफ. पाटील यांनी आपल्या लेखन कार्याचा प्रवास खास
शैलीत उलगडला. प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.
अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ककडे यांनी पुस्तक परिचय करून दिला. डॉ. एम. एस. देशमुख
यांनी सूत्रसंचालन केले. शशिकांत पंचगल्ले यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment