शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता
शिष्यवृत्ती पुरस्कारांचे जत येथे वितरण
कोल्हापूर, दि. ३०
एप्रिल: अपयशाचे विश्लेषण करणे हे ठीकच आहे, पण यशाचेही विश्लेषण करण्याची सवय
लावल्यास खऱ्या अर्थाने प्रगतीकडे वाटचाल करता येते, असे प्रतिपादन शिवाजी
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी काल जत (जि. सांगली) येथे केले. जत
येथील राजे रामराव महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती पुरस्कार
वितरण समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद
शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अभयकुमार साळुंखे होते.
विद्यापीठाच्या गुणवत्ता
शिष्यवृत्ती मिळविण्यात बाजी मारल्याबद्दल विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांचे
अभिनंदन करून कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, आपण यशस्वी झाला आहात, त्या यशाचे
विश्लेषण करणे अधिक महत्त्वाचे आहे. यश हे सावलीसारखे आहे. आपण काम करीत राहा, यश
आपोआप तुमच्या मागे येत राहील. तुम्ही यशाच्या मागे धावू लागलात, तर मात्र ते केवळ
तुमची दमछाक करते. या यशरुपी सावलीला नित्य आपल्या पाठीशी राखण्यासाठी नेहमी प्रकाशाच्या
दिशेने चालत राहा; प्रकाशयात्री व्हा. यश आणि विवेक यांचा थेट संबंध असल्याने
विवेक कधीही सोडू नका, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात
डॉ. अभयकुमार साळुंखे म्हणाले, समाज सुसंस्कृत व सुजाण करण्याच्या सकारात्मक भावनेतून
कार्यरत राहणे खूप महत्त्वाचे आहे. सामाजिक दायित्वाची भावना त्यातूनच प्रबळ होत
असते. शिवाजी विद्यापीठाचा चारा व धान्य वाटपाचा उपक्रम हे त्याचेच द्योतक आहे.
अशी बांधिलकी विद्यार्थ्यांत विकसित करण्याची जबाबदारी शिक्षकांसह प्रत्येक
जबाबदार घटकावर आहे.
या प्रसंगी बीसीयुडी
संचालक प्राचार्य डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी मनोगत
व्यक्त केले. पुरस्कारप्राप्त महाविद्यालयांच्या वतीने प्राचार्य डॉ. हिंदुराव
पाटील, प्राचार्य डॉ. विक्रम पाटील, प्राचार्य डॉ. प्रकाश हेरेकर यांनी
प्रातिनिधिक मनोगते व्यक्त केली.
यावेळी राजे रामराव
महाविद्यालयाच्या 'राम-विजय' या वार्षिकांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात
आले. प्राचार्य डॉ. एस.वाय. होनगेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
दरम्यान, कुलगुरू
डॉ. शिंदे यांच्या हस्ते सन २०१५-१६च्या शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता
शिष्यवृत्तीसाठी शहरी, निमशहरी व ग्रामीण महाविद्यालये या गटांतून विद्याशाखानिहाय
गुणानुक्रमे प्रथम आलेल्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पुरस्कार वितरण
करण्यात आले. हे पुरस्कार विजेते विद्याशाखानिहाय आणि अनुक्रमे शहरी, निमशहरी व
ग्रामीण या क्रमाने (कंसात प्राचार्य) पुढीलप्रमाणे-
कला विद्याशाखा- द न्यू कॉलेज, कोल्हापूर (प्राचार्य
डॉ.एन.व्ही. नलवडे), शिवराज कॉलेज ऑफ आर्ट्स ॲन्ड कॉमर्स ॲन्ड डी.एस. कदम सायन्स
कॉलेज, गडहिंग्लज (प्राचार्य डॉ. एस.आर. कोतमिरे), श्रीपतराव चौगुले आर्ट्स ॲन्ड
कॉमर्स कॉलेज, माळवाडी-कोतोली, ता. पन्हाळा (प्राचार्य डॉ. महाजन).
वाणिज्य विद्याशाखा- विवेकानंद महाविद्यालय,
कोल्हापूर (प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील), श्री व्यंकटेश महाविद्यालय, इचलकरंजी (डॉ.
बी.ए. खोत), देवचंद कॉलेज, अर्जुननगर, ता. कागल (प्राचार्य डॉ. प्रकाश हेरेकर).
विज्ञान विद्याशाखा- यशवंतराव चव्हाण
इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा (प्राचार्य डॉ. के.जी. कानडे), डॉ. घाळी कॉलेज,
गडहिंग्लज (प्राचार्य डॉ. एम.आर. पाटील), राजे रामराव महाविद्यालय, जत (प्राचार्य
डॉ. एस.वाय. होनगेकर).
अभियांत्रिकी विद्याशाखा- कर्मवीर भाऊराव पाटील
कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सातारा (प्राचार्य डॉ. विक्रम पाटील), डीकेटीईज् टेक्स्टाईल
ॲन्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट, सांगली (प्राचार्य डॉ. पी.व्ही. कडोले), कोल्हापूर
इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कोल्हापूर (प्राचार्य डॉ. व्ही.व्ही. कार्जिनी).
शिक्षणशास्त्र विद्याशाखा- महावीर महाविद्यालय,
कोल्हापूर (प्राचार्य डॉ. आर.पी. लोखंडे), कर्मवीर हिरे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स
ॲन्ड एज्युकेशन महाविद्यालय, गारगोटी (प्राचार्य डॉ. आर.एस. कांबळे).
विधी विद्याशाखा- शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर
(प्राचार्य डॉ. आर. नारायणा).
No comments:
Post a Comment