Friday, 1 April 2016

शिवाजी विद्यापीठाचा 'सी-डॅक'शी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार



दोन्ही संस्थांच्या सहकार्यवृद्धीच्या दृष्टीने मोलाचा करार: प्रा. रजत मोना

कोल्हापूर, दि. १ एप्रिल: शिवाजी विद्यापीठ आणि प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डॅक) या दोन महत्त्वपूर्ण संस्थांमध्ये करण्यात आलेला सामंजस्य करार दोन्ही संस्थांच्या भावी शैक्षणिक व माहिती तंत्रज्ञानविषयक सहकार्य वृद्धीमध्ये मोलाची कामगिरी बजावेल, असा विश्वास सी-डॅकचे महासंचालक प्रा. रजत मोना यांनी आज येथे व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठाचा संगणकशास्त्र अधिविभाग आणि सी-डॅक यांच्यात आज प्रा. मोना व कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सामंजस्य करारावर शिवाजी विद्यापीठाच्या वतीने प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी तर सी-डॅकच्या वतीने सचिव कर्नल अनुपकुमार खरे यांनी स्वाक्षरी केल्या.
शिवाजी विद्यापीठात माहिती संवाद तंत्रज्ञानाच्या
(आयसीटी) अनुषंगाने सुरू असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करून प्रा. मोना म्हणाले, आयसीटीचा वापर केवळ भौतिक संपन्नतेसाठी न करता समाजाच्या भल्यासाठी करण्याचे ब्रीद घेऊन 'सी-डॅक' गेली २८ वर्षे कार्यरत आहे. माहिती तंत्रज्ञानाचा देश अशी भारताची जगभर ओळख प्रस्थापित करण्यात 'सी-डॅक'ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. शिवाजी विद्यापीठानेही मुडलसारख्या आधुनिक शिक्षण पद्धतीचा अंगिकार केला आहे. त्याबरोबरच केवळ विज्ञान विभागच नव्हे, तर हिंदीसारख्या भाषा अधिविभागातही आयसीटीविषयक अतिशय उत्तम काम सुरू आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठासोबत सहकार्य संबंध प्रस्थापित करत असल्याचा आनंद वेगळा आहे. हे सहकार्य अधिक वृद्धिंगत करीत राहण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या दृष्टीने हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगितले. ते म्हणाले, विद्यापीठ स्तरावरील कॉम्प्युटिंगला काही प्रमाणात मर्यादा येतात. त्यामुळे या क्षेत्रातील 'सी-डॅक' या दिग्गज कंपनीसोबत सामंजस्य करार करण्याची भूमिका विद्यापीठाने घेतली. दोन्ही संस्थांमध्ये ज्ञान व माहितीचे होणारे आदान-प्रदान विद्यार्थी, शिक्षक, संशोधक या सर्वांच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. त्याचप्रमाणे संगणक क्षेत्रातील संशोधन विकासालाही विद्यापीठात चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी 'सी-डॅक'चे सह-संचालक महेश कुलकर्णी यांनी 'सी-डॅक'च्या वाटचालीचा आढावा घेतला. शिवाजी विद्यापीठाच्या सहकार्याने अनेकविध उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सुरवातीला संगणकशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. आर. के. कामत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ध्वनीचित्रफीतीच्या माध्यमातून त्यांनी विभागाच्या वाटचालीचा आढावा घेतला. कुलगुरू डॉ. शिंदे व बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कुलसचिव डॉ. शिंदे यांनी आभार मानले. या प्रसंगी सी-डॅकचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत दरबारी, डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. ए.एम. गुरव, डॉ. पद्मा पाटील, डॉ. के.एस. ओझा, डॉ. यु.आर. पोळ, डॉ. व्ही.एस. कुंभार यांच्यासह संगणकशास्त्र अधिविभागातील शिक्षक, संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षक तसेच कोल्हापूर आयटी असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
सामंजस्य कराराची उपयुक्तता
 शिवाजी विद्यापीठ व सी-डॅक यांच्या दरम्यान आज करण्यात आलेल्या सामंजस्य करारामुळे संगणकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना मूलभूत ज्ञानाबरोबरच पूरक ज्ञान उपलब्ध होणार आहे. बीग डाटा ॲनालिसीस, फ्री ॲन्ड ओपन सोर्स डाटा यनिंग एम्बेडेड सिस्टीम, वायरलेस सेन्सर नेटवर्क, व्ही.एल.एस.आय. डिझाईन, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, मल्टिलिंग्युअल टेक्नॉलॉजी यांसारख्या अत्यावश्यक संशोधन क्षेत्रांसंदर्भातील देवाण घेवाण होणार आहे.
औद्योगिक क्षेत्रास आवश्यक कुशल मनुष्यबळ तयार होण्यास या सामंजस्य करारामुळे बळ मिळणार आहे. नवतंत्रज्ञान, संशोधन यांबाबतीत या दोन शिखर संस्थांमध्ये चर्चासत्रे, परिसंवाद, प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. याचा लाभ संशोधक, विद्यार्थी व शिक्षकांना अद्यावत ज्ञान व तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी होईल. विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांतील बदल, संशोधनाच्या बाबतीत समन्वय व विचार विनिमय करता येणे शक्य होणार आहे. सी-डॅकमधील तज्ज्ञांची अभ्यागत व सहयोगी व्याख्याते म्हणून नियुक्त करता येऊ शकेल.
त्याचप्रमाणे संगणकशास्त्र अधिविभागातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना शेवटच्या सत्रात माहिती तंत्रज्ञान कंपनीत प्रकल्प करणे अनिवार्य असते. त्यांना पुणे येथे सी-डॅक प्रकल्प तयार करण्याचे प्रशिक्षण देणार आहे. तसेच, अन्य कौशल्येही शिकविणार आहे. त्याचा भविष्यात व्यवसाय- रोजगार संधी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

No comments:

Post a Comment