शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती उत्साहात
कोल्हापूर, दि. १४ एप्रिल: डॉ.
बाबासाहेब आंबेडकर हा एक व्यापक विचार आहे. त्यांच्याविषयीचे आपले आकलन जिथे संपते,
तिथे खरे बाबासाहेब सुरू होतात. त्यामुळे त्यांच्याविषयीचे आकलन सातत्याने वृद्धिंगत करीत राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार-संपादक संजय आवटे
यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास
केंद्राच्या वतीने आंबेडकर जयंतीनिमित्त ‘डॉ.
बाबासाहेब आंबेडकर- आजच्या संदर्भात’ या
विषयावर श्री. आवटे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते
बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
Sunjay Awate |
श्री. आवटे म्हणाले, आजच्या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजून घेत
असताना त्यांनी भारताला भारत म्हणून, एक एकसंघ देश म्हणून ज्या पद्धतीने उभे केले,
तो वारसा समजून घेतला पाहिजे. हे बाबासाहेब ज्याला समजतात, तोच पुढे खरा भारतीय
होतो, सच्चा माणूस होतो, हे लक्षात घ्यायला हवे. जगभरातले राजकीय विचारवंत भारत हा
एक राष्ट्र म्हणून उभाच राहू शकत नाही, अशा स्वरुपाची मांडणी करीत असताना
बाबासाहेबांनी मात्र त्याला उभेही केले आणि त्याचे खणखणीत अस्तित्व निर्माणही
केले. त्यांनी या देशातल्या प्रत्येक नागरिकाला मताधिकार प्रदान केला. मात्र, हा
अधिकार अगदी सहजतेने मिळाल्यामुळे त्याचे मोल आपल्याला कळले नाही, कळत नाही.
त्यामागची बाबासाहेबांची भूमिका समजून घ्यायला हवी. या देशातल्या निरक्षर
माणसांमधील अंगभूत शहाणपणावरचा त्यांचा विश्वास अनाठायी नव्हता, हे पुढे दिसून आले
असले तरी आताच्या परिस्थितीत हे शहाणपण पुनःपुन्हा तपासून पाहण्याचीही गरज आहे.
श्री. आवटे पुढे म्हणाले, लोकशाही टिकण्यासाठी, सुदृढ होण्यासाठी
संविधान सभेतील ऐतिहासिक भाषणात बाबासाहेबांनी अत्यंत महत्त्वाची चतुःसूत्री
दिलेली आहे. यामध्ये समतेचा पुरस्कार, विरोधी पक्षांचे महत्त्व,
सारासारविवेकबुद्धी आणि संवैधानिक नैतिकता यांचा समावेश होतो. या चतुःसूत्रीचे
सध्याच्या भोवतालात किती आणि कसे स्थान आहे, याचे आकलन करून घेणे आवश्यक आहे. एक
वारसा म्हणून आपल्या नेतृत्वाचे आकलन करवून घेत असताना त्यांना सुटे सुटे करणे
चुकीचे आहे. गांधी, नेहरू, आंबेडकर या त्रयींना एकत्रित समजून घेणे, त्यांचा
अभ्यास करणे ही काळाची गरज आहे. राजकीय प्रक्रियेपासून केवळ अस्मिता म्हणून
बाबासाहेब वेगळे काढण्याचा प्रयत्न केल्यास बाबासाहेबांचे अपहरण सातत्याने होतच
राहणार, असा इशाराही आवटे यांनी यावेळी दिला.
बाबासाहेब म्हणजे एकाच हयातीत एक राज्यघटना जाळून दुसरी निर्माण
करणारे पराक्रमी महापुरूष होते. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते फुले, शाहू,
आंबेडकरांचा सच्च्या राष्ट्रवादाचा आणि लोकशाहीचा वारसा आपण अभिमानाने मिरविला
पाहिजे, असे आवाहनही आवटे यांनी यावेळी केले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांचे जीवन हा ग्रंथप्रेमाचा अद्भुत नमुना आहे. ज्ञानाच्या क्षेत्रात वावरणाऱ्या
सुजाण नागरिकांनी तरी आपली ग्रंथालये समृद्ध करण्यावर तसेच वाचन संस्कृती
वृद्धिंगत करण्यावर भर देण्याची गरज आहे.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, शोषित, वंचित समाजात
आत्मोन्नतीचे स्फुल्लिंग चेतविणारे बाबासाहेब यांच्या विचार व कार्यातून माणूस
होण्याचेच धडे आपल्याला मिळतात. या देशातल्या प्रत्येक नागरिकाला भारतीय ही ओळख
मिळवून देण्याचे महान कार्य त्यांनी केले. त्यांचा हा वारसा अखंडित प्रवाहित
ठेवण्याची जबाबदारी आपण सर्वांनी पेलली पाहिजे. फुले, शाहू, आंबेडकर ही वेगवेगळी
व्यक्तीमत्त्वे नसून समतेच्या विचारांचा तो अखंड प्रवाह आहे. ज्या चिरंतन मूल्यांच्या
प्रस्थापनेसाठी त्यांनी हयात वेचली, त्यांची प्रस्थापना करण्यासाठी प्रतिबद्ध
होणे, हीच आजची खरी गरज आहे.
कार्यक्रमाच्या सुरवातीला शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय
इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ. शिंदे, प्र-कुलगुरू
डॉ. शिर्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. विलास
नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक
डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, इनोव्हेशन व
इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. आर.के. कामत, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ.
जे.एस. बागी, आंबेडकर सेंटरचे संचालक डॉ. एस.एस. महाजन, शाहीर आझाद नायकवडी
यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी,
विद्यार्थी-विद्यार्थिनी, शहरातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. एस.एस. महाजन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. अविनाश भाले यांनी
सूत्रसंचालन केले, तर डॉ. आर.व्ही. गुरव यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment