- अणुसंशोधन क्षेत्रातील संशोधनाचे नवे
दालन खुले
- सुविधा प्रस्थापित करणारे राज्यातील
पहिलेच विद्यापीठ
कोल्हापूर, दि. २३ जुलै: भाभा अणू संशोधन केंद्राच्या 'आयर्मोन'
(IERMON) या सुविधेची प्रस्थापना हा शिवाजी
विद्यापीठाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा असून त्यामुळे येथील संशोधक शिक्षक व
विद्यार्थ्यांना संशोधनाचे एक नवे दालन खुले झाले आहे. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा,
असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या
पदार्थविज्ञान अधिविभागामध्ये भाभा अणू संशोधन केंद्राच्या (बीएआरसी) सहकार्याने
इंडियन एनव्हायर्नमेंटल रेडिएशन मॉनिटरिंग नेटवर्क (IERMON) ही सुविधा प्रस्थापित करण्यात आली
आहे. तिचे औपचारिक उद्घाटन प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते आज करण्यात आले.
त्यावेळी ते बोलत होते.
'आयर्मोन' सुविधेच्या प्रस्थापनेत महत्त्वाची
भूमिका बजावणारे डॉ. आर.जी. सोनकवडे यावेळी माहिती देताना म्हणाले, अणुऊर्जेमुळे
केवळ विध्वंसक अणुबॉम्ब तयार होतो, असे नाही; तर त्यापासून विधायक अशा अनेक बाबी साध्य केल्या जातात. वीजनिर्मिती हा
त्याचा महत्त्वाचा पैलू आहेच, पण त्यापुढे जाऊन उद्योग, कृषी, आरोग्य उपचार अशा
अनेक बाबींसाठी अणुऊर्जा ही वरदान ठरली आहे. या क्षेत्रात अद्यापही संशोधनाच्या
बऱ्याच संधी आहेत. त्याचप्रमाणे खनिज इंधनांच्या अतिरेकी वापरामुळे ग्लोबल
वॉर्मिंगसारख्या परिणामांना सामोरे जावे लागत असताना अणुऊर्जेकडे पर्यायी स्रोत
म्हणूनही पाहिले जाते आहे. किरणोत्सार नियंत्रित स्वरुपात असेल तर तो मानवासाठी
वरदान ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर, निसर्गामध्ये सुद्धा भूजन्य आणि अवकाशजन्य अशा
दोन प्रकारचे किरणोत्सार सुरू असतात. जमिनीमधील युरेनियम, थोरियम आणि पोटॅशियम हे
पदार्थ सातत्याने किरणोत्सार करीत असतात. युरेनियमचे प्रमाण १ ते ५ पीपीएम आणि
थोरियमचे प्रमाण २ ते १० पीपीएम इतके असते. जमिनीत मुळातच अवघे १ ते २ टक्के
पॉटॅशियम असते. त्यातीलही केवळ ०.०१२ टक्के इतकेच पोटॅशियम किरणोत्सारी असते.
याखेरीज अवकाशात, पर्यावरणात, हवेतही काही विशिष्ट प्रकारचे किरणोत्सार उपलब्ध
असतात. काही विशिष्ट मर्यादेपर्यंत त्यांचा मानवावर काही अनिष्ट परिणाम होत नाही.
मात्र, पातळी ओलांडल्यास ती मानवी आरोग्यास धोकादायक ठरू शकते. म्हणून त्यांचे
सातत्याने मापन करीत राहणे आवश्यक असते. अशा सर्व प्रकारच्या किरणोत्साराचे मापन
करणे 'आयर्मोन' सुविधेमुळे शक्य होते. नैसर्गिक किरणोत्साराची पातळी ओलांडली जात असल्याचे
यामुळे वेळीच लक्षात येऊ शकते आणि त्यावर गरजेनुसार लघु, मध्यम आणि दूरगामी
स्वरुपाच्या योग्य उपाययोजना करणेही संशोधकांना शक्य होते. त्या दृष्टीने नैसर्गिक
पर्यावरणीय किरणोत्साराच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे दालन शिवाजी विद्यापीठात खुले
होत आहे, ही अभिमानाची बाब आहे.
या उद्घाटन प्रसंगी
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, पदार्थविज्ञान अधिविभाग प्रमुख तथा
अधिष्ठाता डॉ.पी.एस.पाटील, डॉ.व्ही.जे.फुलारी,
डॉ.एन.व्ही.मोहळकर, डॉ.आर.एस.व्हटकर,
डॉ.एम.व्ही.टाकळे, डॉ.एन.एल.तरवार यांचेसह संशोधक विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
------