Friday 5 July 2019

समाजशास्त्र आंतरराष्ट्रीय परिषदेच्या संकेतस्थळाचे विद्यापीठात उद्घाटन



 
शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या संकेतस्थळाचे लाँचिंग करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.

या प्रसंगी बोलताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. व्यासपीठावर अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, डॉ. जगन कराडे
वेबसाईटचे होमपेज


डिसेंबरमध्ये परिषद; २५ देशांचे समाजशास्त्रज्ञ उपस्थित राहणार

कोल्हापूर, दि. जुलै: आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी स्वतंत्र वेबसाईट निर्माण करून त्याद्वारे नोंदणी करण्याचा समाजशास्त्र अधिविभागाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य स्वरुपाचा आहे. यातून विद्यापीठाबरोबरच अधिविभागाची जगभरातील समाजशास्त्रज्ञांमध्ये उत्तम प्रतिमानिर्मिती होईल, असा विश्वास प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागामार्फत दि. १० ते १२ डिसेंबर २०१९ या कालावधी 'सोसायटी: रिकन्स्ट्रक्शन, रिफ्लेक्शन अँड रिस्पॉन्सिबीलिटीज' या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या नोंदणीसाठी एसआरआरआर डॉट इन’ (srrr.in) या विशेष संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली असून या संकेतस्थळाचे द्घाटन प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते आज झाले. विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात या संकेतस्थळाच्या लाँचिंगचा औपचारिक कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मानव्यशास्त्र विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. भारती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्र-कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून समाजशास्त्र विषयातील जागतिक स्तरावरील विचारवंत, प्रज्ञावंत, शास्त्रज्ञ, अभ्यासक यांच्या विचारांचे आदान-प्रदान होणार आहे. विद्यापीठासाठी ही अत्यंत महत्त्वाची पर्वणी आहे. स्थानिक संशोधकांना या परिषदेचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे.
अधिष्ठाता डॉ.भारती पाटील यांनीही विशेष वेबसाईट निर्मितीच्या उपक्रमाचे स्वागत केले आणि इतर विभागांसाठी सुद्धा हा उपक्रम अनुकरणीय असल्याचे सांगितले.
कोल्हापूर येथील मीडियाटेकच्या वतीने या वेबसाईटची निर्मिती केली आहे. समाजशास्त्र आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी सुमारे २५ देशांतील समाजशास्त्रज्ञ व विचारवंत उपस्थित राहतील आणि त्यांच्या सहभागामुळे या परिषदेचा दर्जा हा अत्यंत वरचा राहील, असे समाजशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ.जगन कराडे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. डॉ. प्रतिमा पवार यांनी आभार मानले. यावेळी डॉ. आर. बी. पाटील, डॉ. एस. एस. महाजन, डॉ. के. व्ही. मारूलकर, डॉ. एच. एम. ठकार, डॉ. व्ही. बी. ककडे, डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. पी. एम. माने, राजेश शिंदे यांच्यासह शिक्षक, संशोधक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

No comments:

Post a Comment