Saturday, 21 December 2019

शिव पावन परिक्रमा पर्यटनासाठी नव्हे; तर प्रेरणेसाठी: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे

विद्यापीठाच्या पन्हाळा-पावनखिंड शिव पावन प्रेरणा परिक्रमेस प्रारंभ




शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा-पावनखिंड शिव पावन प्रेरणा परिक्रमेत सहभागींसमवेत संवाद साधताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत प्राचार्य डॉ. एस.आर. पाटील, डॉ. पी.टी. गायकवाड, डॉ. डी.के. गायकवाड आदी.

कोल्हापूर, दि. २१ डिसेंबर: शिव पावन परिक्रमा ही पर्यटनासाठी नसून प्रेरणेसाठी आहे. सहभागींनी या परिक्रमेतून आयुष्यभरासाठीचा प्रेरणेचा स्रोत स्वतःसोबत घेऊन जावे, हाच यामागील उद्देश आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय पन्हाळा ते पावनखिंड शिव पावन प्रेरणा परिक्रमेच्या प्रारंभ प्रसंगी पन्हाळा येथे ते बोलत होते. आज सकाळी ७.३० वाजता पन्हाळा येथील बाजीप्रभू देशपांडे व वीर शिवा काशीद यांच्या पुतळ्यांचे दर्शन घेऊन सुरू झालेल्या या मोहिमेची सांगता उद्या सायंकाळी ६.३० वाजता पावनखिंड येथे होणार आहे.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, तत्कालीन परिस्थितीमध्ये कोणत्याही दळणवळणाच्या साधनांअभावी, विजेच्या सुविधेअभावी निव्वळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यावरील निष्ठेपोटी बाजीप्रभू देशपांडे आणि वीर शिवा काशीद यांनी आपली प्राणाहुती दिली. त्यांची निष्ठा आणि त्यांचे कार्य इतिहासात अमर झाले. महाराजांनीही पुढे स्वराज्याचे तोरण बांधले. आदिलशाही नजरकैदेतून, कडेकोट पहाऱ्यांमधून मोठ्या दिलेरपणाने आपली सुटका करवून घेत महाराजांनी पन्हाळ्यावरुन विशाळगडाकडे कूच केले. जनतेचा हा पोशिंदा सुखरूप विशाळगडी पोहोचावा, म्हणून या दोन नरवीरांनी आपल्या जीवाची बाजी लावली आणि स्वराज्यासाठी प्राण त्यागले. हा सारा इतिहास या दोन दिवसांच्या परिक्रमेमध्ये प्रत्येक सहभागीच्या मनामनांत जागला पाहिजे. ही परिक्रमा म्हणजे पर्यटन नव्हे, तर याच प्रेरणेचा झरा आणि ऊर्जेचा स्रोत आपल्यामध्ये जागृत करण्याची संधी म्हणून विद्यार्थ्यांनी, स्वयंसेवकांनी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पाहिले पाहिजे. त्यासाठीच या मोहिमेचे आयोजन केले आहे, असेही त्यांनी सांगितले.
या परिक्रमेत राष्ट्रीय सेवा योजन समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, प्राचार्य डॉ. एस.आर. पाटील, प्रा. पोपट माळी यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांमधून राष्ट्रीय सेवा योजनेचे सुमारे दीडशे स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या परिक्रमेअंतर्गत ऐतिहासिक माहिती घेण्याबरोबरच परिक्रमा मार्गावर स्वच्छता मोहिम तसेच शाहीरी पोवाडा आदी प्रबोधन कार्यक्रमही घेण्यात येणार आहेत.  


No comments:

Post a Comment