कोल्हापूर, दि.10 डिसेंबर - राजकीय लोकशाही ही आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीवर अवलंबून असते.समाजामधील गरीबांनाही लोकशाही प्रणालीमध्ये भाग घेण्यासाठी सध्याच्या प्रणालीमध्ये योग्य ते बदल करणे आवश्यक आहे. परदेशांमध्ये असे बदल अवलंबीले जात आहेत, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोग व भारतीय सामाजिक शास्त्रे संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ.सुखदेव थोरात यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागामार्फत अधिविभागाच्या सुवर्णमहोत्सव वर्षाचे औचित्य साधून रशियन सोशिओलॉजिकल सोसायटी, साऊथ अफ्रीकन सोशिओलॉजिकल सोसायटी, एशिया क्लायमेंट चेंज एज्युकेशन सेंटर, साऊथ कोरिया, इंटरनॅशनल सोशिऑलॉजीकल सोसायटी आणि इंडियन सोशिऑलॉजीकल सोसायटी यांच्या सहकार्याने विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सिनेट सभागृहामध्ये 'समाज : पुनर्रचना, प्रतिक्रिया आणि जबाबदारी' या विषयावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना डॉ.थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के होते. यावेळी, भारतीय समाजशास्त्र परिषदेचे सचिव डी.आर.साहू, कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर, सामाजिकशास्त्र शाखेच्या अधिष्ठाता डॉ.भारती पाटील, विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ.पी.एस.पाटील, ज्येष्ठ विचारवंत डॉ.भारत पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. थोरात पुढे म्हणाले, समाजामध्ये समानता मिळविण्याच्या प्रयत्नांमध्ये प्रत्येकास समान संधी आहे. त्यासाठी समान अधिकार मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाणे आवश्यक आहे. राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये समानता आणि स्वातंंत्र्य याबाबत अगदी स्पष्टपणे लिहिलेले आहे. त्यामुळे समान नागरी हक्क, समान राजकीय अधिकार, समान मूलभूत अधिकर लोकांना देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. समाजामध्ये निर्माण झालेली आर्थिक दरी कमी करण्यासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजेत, यासाठी गांभीर्यपूर्वक विचार केला पाहिजे. राज्यकर्त्यांच्या आणि शासनाच्या माध्यमातून समाजाची आर्थिक उन्नती होण्यासाठी निश्चित धोरण तयार करण्याची मोठी जबाबदारी ही समाजशास्त्रज्ञांची आहे.
अध्यक्षीय मनोगतामध्ये विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्क म्हणाले, समाजाच्या प्रगतीमध्ये भरीव योगदान देण्यासाठी शैक्षणिक संस्थांना, अध्यापन आणि संशोधनाच्या माध्यमातून प्रयत्न करणे गरजेचे आहे.
याप्रसंगी
ज्येष्ठ संशोधक व मानवी हक्क कार्यकर्त्या डॉ.गेल ऑम्वेट, भारतीय समाजशास्त्र परिषदेच्या अध्यक्षा डॉ.आर.इंदिरा आणि भारती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.उत्तमराव भोईटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तत्पूर्वी, परिषदेचे उद्धाटन ज्येष्ठ संशोधक प्रा.गेल ऑम्वेट यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले.
परिषदेचे संचालक व समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ.जगन कराडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ.प्रल्हाद माने यांनी आभार मानले. प्रतिक्षा मांगलेकर यांनी सुत्रसंचलन केले. या परिषदेमध्ये माजी कुलगुरू डॉ.विद्युत जोशी, डॉ.हरी बाबू, हेमिक्सा राव, के.एल.शर्मा, डॉ.परमजित सिंग, डॉ.विजय खरे, डॉ.बी.के.नागला यांचेसह इंडोनेशियायेथील डॉ.अहमद दिरवण, युफी ॲडरॅनी, स्विर्झलैंडमधील जॅडे ग्रेस आणि चार्ले टर्नर, फिलीपाईन्समधील अर्जेल मसंदा, साऊथ कोरियामधील जॉग, दक्षिण अफ्रिका येथील जयंथन गावेंडर, किरण ओढाव आणि सायमन मॅपडार्इंग यांसह देशभरातून आलेले ज्येष्ठ सामाजिक विचारवंत उपस्थित होते. तसेच, यावेळी माजी विभागप्रमुख डॉ.एस.एन.पवार, डॉ.जे.बी.आंबेकर, डॉ.आर.बी.पाटील यांचेसह सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थींनी अणि संशोधक विद्यार्थी मोठयाप्रमाणावर उपस्थित होते.
-----
No comments:
Post a Comment