Friday, 29 November 2019

‘तुकारामबावांच्या गाथेचे निरुपण’ ग्रंथाचे उत्साही प्रकाशन

मराठी भाषा घडविण्यात तुकारामांचे योगदान मोलाचे: डॉ. सदानंद मोरे



शिवाजी विद्यापीठात 'तुकारामबावांच्या गाथेचे निरुपण' या ग्रंथाचे प्रकाशन शुक्रवारी ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी (डावीकडून) डॉ. राजन गवस, डॉ. मोरे, निरुपणकार मारुती जाधव-तळाशीकर गुरूजी, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे. 

कोल्हापूर, दि. २९ नोव्हेंबर: मराठी भाषा घडविण्यामध्ये संत तुकाराम यांचे मोलाचे योगदान आहे. तुकारामांमुळेच मराठी भाषेचे सौंदर्य महाराष्ट्राच्या घराघरांत आणि मनामनांत वास करते आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक व ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाच्या वतीने प्रकाशित करण्यात येत असलेल्या तुकारामबावांच्या गाथेचे निरुपण या द्विखंडात्मक ग्रंथाचे प्रकाशन आज डॉ. मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. वारकरी भक्ती संप्रदायाच्या अनुयायांची लक्षणीय उपस्थिती हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्रा. राजन गवस, गाथेचे निरुपणकार मारुती भाऊसाहेब जाधव तथा तळाशीकर गुरूजी, मराठी विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे, संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे उपस्थित होते.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, संत तुकाराम महाराजांच्या अभंगांमधील भाषेचे सौंदर्य अमर्याद आहे. त्यांनी मराठी भाषेला कितीतरी नवनवीन शब्दांची देणगी दिलेली आहे. मराठी भाषा समृद्ध करण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांची भाषा इतकी सामर्थ्यशाली आहे की, तुकाराम गाथेचा समावेश मराठी भाषेच्या बीजग्रंथांमध्ये करण्यात आलेला आहे. मराठी भाषेत वेदांताचा अर्त सर्वप्रथम तुकारामांनीच सांगितला. हे अभंग एकीकडे समजायला जितके सोपे, तितकेच आशयात्मकदृष्ट्या गहनही आहेत. संत बहिणाबाईंनी त्यांच्या अभंगांना तुकाराम वेद असे नाव दिले, इतकी ताकद त्या अभंगांमध्ये आहे. तुकारामांचे हे अभंग सर्वसामान्य बहुजननांपर्यंत, वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी न्या. रानडे, प्रा. भांडारकर यांच्यापासून अनेकांनी प्रयत्न व कार्य केले. त्यांच्या पंक्तीमध्ये तळाशीकर गुरूजी जाऊन बसले आहेत. गुरूजींनी आशयसूत्रे लक्षात घेऊन या अभंगांचे अत्यंत चिकित्सकपणे आणि सर्वसामान्य माणूस डोळ्यांसमोर ठेवून वर्गीकरण केले आहे, हे या गाथा निरुपण ग्रंथाचे मोठे आणि महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
संत तुकाराम आणि कोल्हापूर यांचा जवळचा संबंध असल्याचे सांगताना डॉ. सदानंद मोरे म्हणाले, औरंगाबादजवळच्या सिऊर या गावामध्ये बहिणाबाई नावाची मुलगी जन्मली. भावकीमध्ये काही कारणाने वाद होऊन तिच्या कुटुंबियांनी घर, गाव सोडले. फिरत फिरत ते कोल्हापुरी येऊन दाखल झाले. काही वर्षे ते येथे होते. त्यावेळी येथे साताऱ्याच्या जयरामस्वामी वडगावकर यांची कीर्तने सुरू होती. ते आपल्या कीर्तनांत तुकारामांचे अभंग सादर करीत. बहिणाबाईंना जणू त्या अभंगांचे वेड लागले. त्यांनी तुकारामांना गुरू करायचे ठरविले. सुरवातीला नाराज असणाऱ्या पतीचेही मन त्यांनी वळविले आणि अखेरीस देहू येथे तुकारामांच्या दर्शनाला पोहोचल्या. तेथे त्यांना तुकारामांचा गुरुपदेश आणि सहवास लाभला. त्या पुढे संत बहिणाबाई झाल्या. कोल्हापूरमध्ये त्या काळी तुकारामांचे अभंग बहिणाबाईंच्या कानी आले नसते, तर हा इतिहास होऊ शकला नसता. त्यामुळे तुकारामांच्या एक महत्त्वाच्या शिष्या कोल्हापूरमध्ये घडल्या, हे लक्षात घ्यावे लागेल.
विद्यापीठांनी स्थानिक परंपरा, कला, संस्कृती जोपासना व संवर्धनाच्या कामी योगदान देणे ही बाब महत्त्वाची आहेच; पण विद्यापीठांत त्यासाठी कार्यरत असणाऱ्या अध्यासनांना लोकाश्रय प्रदान करणे ही स्थानिक जनतेचीही जबाबदारी आहे, असे मतही डॉ. मोरे यांनी व्यक्त केले.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस.. असे आदराने म्हटले जात असल्याचे सांगून अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, ज्ञानदेवांनी मराठी भाषेच्या विस्ताराचा अत्यंत व्यापक स्वरुपाचा पाया रचला, हे जितके खरे; तितकेच तुकारामांनी या भाषेला अधिक बहुप्रसवी बनविताना सहजसोपेपणाचे, बोली भाषेचे, संवादाच्या प्रवाहीपणाचे आयामही दिले. त्यांच्या साडेचार हजारांहून अधिक असणाऱ्या या गाथेमधील आशयसूत्रे आणि विषयसूत्रांचा साकल्याने विचार केला असता, अभ्यास केला असता असे दिसून येते की, मानवी जीवनाला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक विषयाला तुकारामांनी आपला परीसस्पर्श केला आहे. मानवी मूल्यांना शब्दरुप प्रदान करताना तुकाराम मानवी जीवनमूल्ये इतक्या स्पष्ट आणि निःसंदिग्धपणाने प्रकट करतात की, त्यामधून खऱ्या अर्थाने विश्वरुपदर्शन घडावे. जीवन जगण्याच्या तत्त्वज्ञानाची शिदोरी तुकारामांनी आपल्या अभंगांमधून खुली केली आहे. हे ज्ञान माणसाचे जगणे सहजसोपे आणि नितांतसुंदर बनविणारे आहे, असेही त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. शिंदे पुढे म्हणाले, तुकारामांच्या गाथेतील अभंगांची भाषा व्यवहाराची, साधीसोपी असली तरी, ती सतराव्या शतकातील आहे. आज या भाषेतील अनेक शब्द व्यवहारातून गेले आहेत. त्यामुळे या अभंगांची उकल करून घेताना भाषेच्या पातळीवर काही प्रश्न संभवतात. शिवाय, तुकारामांचे सारेच अभंग बहुअर्थप्रसवी असल्याने अर्थाची उकल ही जीवनानुभवाच्या क्षमतेवर अवलंबून असते. वाचक जीवनाचा किती सखोल विचार करीत असतो, त्याच्या चिंतनाला जीवनाकलनाचे किती आयाम आहेत, यावर अभंगांचे अर्थनिर्णयन होत असते. त्यामुळे संपूर्ण गाथेत येणारे अनेकविध विषय आणि विचारांची व्यापकता अभ्यासकांना नेहमीच आव्हानात्मक वाटत आली असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, भक्तीमार्ग आणि संत परंपरेत तुकारामांचे कार्य पथदर्शक स्वरुपाचे आहे. आपल्या काव्यातून त्यांनी मानवी जीवनाविषयी व्यक्त केलेली अपार आस्था आणि भाकलेली करूणा त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे दर्शन घडविते. सुमारे साडेतीनशेहून अधिक वर्षे तुकारामांच्या अभंगांचा सर्व स्तरांतील मराठी जीवनावर व्यापक प्रभाव आहे. प्रत्येक काळात तो अधोरेखित करणे हे विद्यापीठांसारख्या संस्थांचे कर्तव्य आहे. म्हणूनच शिवाजी विद्यापीठाच्या वतीने या गाथेचे प्रकाशन करणे हा आनंदाचा व अभिमानाचा क्षण आहे.
यावेळी मारुती जाधव गुरूजी म्हणाले, संत तुकाराम अध्यासनाच्या रुपाने शिवाजी विद्यापीठाने तुकारामांचे एक लोकाभिमुख प्रभावी स्मारक उभे केले आहे. त्यातही एखाद्या संताच्या अभंगांचा ग्रंथ प्रकाशित करणारेही हे एकमेव विद्यापीठ आहे. ही गाथा प्रकाशित करून विद्यापीठाने माझा व्यक्तीगत सन्मान तर वाढविलाच, पण वारकरी समाजासाठीही भरीव योगदान दिले आहे. येथून पुडेही संतांचे कार्य जगासमोर आणण्याचे काम विद्यापीठाने सुरू ठेवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला संत तुकाराम यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्प वाहून अभिवादन केले. डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते तुकारामबावांच्या गाथेचे निरुपण या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. तळाशी ग्रामस्थांच्या वतीने मारुती जाधव गुरूजींसह मान्यवरांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला.  डॉ. नंदकुमार मोरे यांनी स्वागत तर प्रा. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.

विद्यापीठाने अनुभवली वारकऱ्यांची प्रचंड उपस्थिती
या प्रकाशन सोहळ्यासाठी दुपारपासूनच वारकरी संप्रदायातील नागरिकांची मोठी रीघ विद्यापीठाकडे लागली होती. गाड्या भरभरून लोकांचे आगमन होत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहाने वारकऱ्यांची अभूतपूर्व गर्दी आज पाहिली. सभागृहात पाऊल ठेवण्यासही जागा नव्हती. विद्यापीठाच्या वतीने सभागृहाबाहेरील लॉन परिसरात एलईडी स्क्रीन उभारून कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था केली होती. त्यामुळे सर्वच उपस्थितांना या कार्यक्रमाचा आनंद घेता आला.

ग्रंथ खरेदीलाही मोठा प्रतिसाद
तुकारामबावांच्या गाथेचे निरुपण हा द्विखंडात्मक ग्रंथ सुमारे १८००हून अधिक पृष्ठांचा आहे. बाजारभावानुसार त्यांची किंमत तीन हजारांहून अधिक होते. तथापि, सर्वसामान्य वाचकांना डोळ्यासमोर ठेवून विद्यापीठाने ८७० रुपये इतक्या सवलतीच्या दरात हा ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध केला. त्यामुळे उपस्थितांचा त्याच्या खरेदीलाही मोठा उत्साही प्रतिसाद लाभला.  

No comments:

Post a Comment