शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातर्फे चप्पल लाईन येथे आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी उपस्थित मान्यवरांना अवगत करताना केंद्राचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव. |
कोल्हापूर, दि. २० नोव्हेंबर: कोल्हापूरचे
महत्त्वाचे वैशिष्ट्य आणि वैभव असणाऱ्या कोल्हापुरी चप्पलचे निर्माते आणि विशेषतः
विक्रेते यांना बाजारामधील नवप्रवाहांची जाणीव करून देणे आणि त्यांच्या विपणन
पद्धतीमध्ये कालसुसंगत बदल घडवून आणण्यासाठी शिवाजी विद्यापीठ प्रतिबद्ध आहे. त्या
दृष्टीनेच विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्या माध्यमातून थेट
कोल्हापूरच्या चप्पल लाईनमध्येच एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
एका अर्थाने या चप्पल विक्रेत्यांच्या कौशल्य विकासासाठी ‘विद्यापीठ आपल्या
दारी’ आले आहे, अशी भावना कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आज येथे
व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास
केंद्राच्या वतीने आणि कोल्हापुरी चप्पल क्लस्टरच्या सहकार्याने चप्पल लाईन येथे आयोजित
करण्यात आलेल्या एकदिवसीय ऑन-फिल्ड प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आज
सकाळी ते बोलत होते.
यावेळी केंद्राचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव यांनी
सांगितले की, केंद्राच्या दहा प्रशिक्षित प्रशिक्षकांच्या मार्फत चप्पल लाईन येथील
व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाला पूरक अशा बाबींचे प्रशिक्षण देण्याबरोबरच
सध्या बाजारातील विविध प्रवाहांची माहिती देऊन त्यासाठी आवश्यक बाबींविषयी त्यांना
अवगत करणे असा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे. यामध्ये विविध विपणन कौशल्यांबरोबरच
प्रदर्शन कौशल्य, जाहिरात कौशल्य, प्रसिद्धी कौशल्य, ग्राहक सुसंवाद कौशल्य,
विक्री मूल्य निर्धारण कौशल्य, साठा कौशल्य, ब्रँडिंग व पॅकिंग कौशल्य, वर्तन
कौशल्य, स्थानिक व बाह्य ग्राहकांशी संवाद कौशल्य आदी अनेक बाबींचे प्रशिक्षण चप्पल
लाइनमधील व्यावसायिकांना देण्यात येणार आहे.
या प्रसंगी कोल्हापूर क्लस्टरचे भूपाल शेट्ये म्हणाले,
शिवाजी विद्यापीठाने कोल्हापुरी चप्पल व्यावसायिकांसाठी सातत्याने सकारात्मक
भूमिका घेऊन काम चालविले आहे. त्याचा परिणाम म्हणून चप्पल निर्माते आणि
व्यावसायिकांमध्येही एक प्रकारची जागृती होऊ लागली आहे. जागतिक प्रवाहांचा वेध घेत
त्यामध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी विद्यापीठ चप्पल व्यावसायिकांना करीत
असलेली मदत स्वागतार्ह आहे. त्या दृष्टीने आजचे चप्पल लाईनमधील प्रशिक्षण हा आणखी
एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी महेश चव्हाण यांनी आभार मानले. डॉ. केदार
मारुलकर, क्लस्टरचे अध्यक्ष अरुण सातपुते यांच्यासह सर्व प्रशिक्षक उपस्थित होते.
दरम्यान, आज दिवसभरात डॉ. गुरव, डॉ. मारुलकर,
श्री. चव्हाण यांच्यासह डॉ. व्ही.एस. खंडागळे, डॉ. गजानन राशिनकर, डॉ. के.बी.
पाटील, डॉ. पी.एम. देवळी, शिवप्रसाद शेटे, प्रियांका नायक-तिवरे आणि श्री. लिटॉन
या प्रशिक्षकांनी कोल्हापुरी चप्पल विक्रेत्यांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण
दिले.
No comments:
Post a Comment