Saturday 16 November 2019

शिवाजी विद्यापीठ परिसर छायाचित्रांच्या प्रदर्शनाला प्रेक्षकांचा उत्साही प्रतिसाद


शिवाजी विद्यापीठ परिसर छायाचित्र स्पर्धेत सहभागी छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत (डावीकडून) वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, उद्यान अधीक्षक अभिजीत जाधव, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, अधिष्ठाता डॉ. ए.एम. गुरव, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, ज्ञानस्रोत केंद्र संचालक डॉ. नमिता खोत, परीक्षा संचालक गजानन पळसे. 

प्रदर्शनाची पाहणी करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर.

प्रदर्शनातील छायाचित्रे पाहताना विद्यार्थिनी


कोल्हापूर, दि. १६ नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठाने प्रथमच आयोजित केलेल्या परिसर छायाचित्रण स्पर्धेला सर्वच स्तरांतून मोठा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत सहभागी झालेले प्रत्येक छायाचित्र आणि त्याचा छायाचित्रकार हा एका अर्थाने विजेताच आहे. त्या सर्वांचेच अभिनंदन केल्यावाचून राहवत नाही, असे कौतुकोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे काढले.
शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित विद्यापीठ परिसर छायाचित्र स्पर्धेत सहभागी सर्वच छायाचित्रांचे प्रदर्शन राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात आज सकाळपासून सुरू झाले. या प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. शिंदे बोलत होते. दिवसभरात या प्रदर्शनाला विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्साही प्रतिसाद लाभला.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, शिवाजी विद्यापीठ परिसर छायाचित्रांचे हे प्रदर्शन पाहिल्यानंतर प्रत्येक सहभागी स्पर्धकाने अत्यंत मनापासून आणि प्रेमाने छायाचित्रे काढल्याचे जाणवते. त्यांची आस्था ही पाहणाऱ्याच्या नजरेतून थेट हृदयामध्ये प्रवेश करते. ही सर्जनशीलता प्रत्येकाने सदैव जोपासण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असा संदेशच हे प्रदर्शन देते. उद्यापर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाचा नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आस्वाद घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या उद्घाटन प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर, वित्त लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. गजानन पळसे, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. ए.एम. गुरव, ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, उद्यान अधीक्षक अभिजीत जाधव यांच्यासह अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या १२४ स्पर्धकांच्या सुमारे ६०० छायाचित्रांची आकर्षक मांडणी करण्यात आली होती. विद्यापीठातील विविध इमारती, जैवविविधता, जलसाठे, नैसर्गिक सौंदर्य आदी अनेक पैलूंचे दर्शन या प्रदर्शनाद्वारे घडते आहे. प्रदर्शन उद्या, रविवार (दि. १७ नोव्हेंबर)पर्यंत सुरू राहणार आहे.
दरम्यान, या स्पर्धेमध्ये श्री. शुभम रमेश हत्तरकी आणि श्री. संकेत उदय साळी या दोघांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला आहे. त्यांना प्रत्येकी रु. १२,५०० रोख व प्रमाणपत्र असे पारितोषिक प्रदान करण्यात येईल. स्पर्धेतील द्वितीय व तृतीय क्रमांकही विभागून देण्यात आले आहेत. श्री. सुंदरकुमार कांबळे व श्री. सुभाष पोपटराव वाणी यांना विभागून द्वितीय क्रमांक देण्यात आला. त्यांना रु. ७५०० रोख व प्रमाणपत्र असे पारितोषिक देण्यात येईल. श्री. उदयणादित्य एस. पाटील व युवराज जगन्नाथ जगताप यांना विभागून तृतीय क्रमांक देण्यात आला असून त्यांना प्रत्येकी रु. ५००० रोख व प्रमाणपत्र देण्यात येईल. उपरोक्त विजेत्यांना सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी विद्यापीठाच्या ५७व्या वर्धापन दिन समारंभात पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार असून अन्य स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र ई-मेलद्वारे पाठविण्यात येणार आहेत.



No comments:

Post a Comment