कोल्हापूर, दि. १७
नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या ५७व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने बॅ. बाळासाहेब
खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या ‘शिव-ज्ञानसागर: इन्स्टिट्यूशनल रिपॉझिटरी ऑफ शिवाजी युनिव्हर्सिटी’
आणि ‘इंडियन रिसर्च इन्फॉर्मेशन नेटवर्क सिस्टीम’ (आय.आर.आय.एन.एस.) या दोन अत्यंत महत्त्वाच्या उपक्रमांचे उद्घाटन नांदेड
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
शिव-ज्ञानसागर: इन्स्टिटयूशनल रिपॉझिटरी ऑफ शिवाजी युनिव्हर्सिटी-
शिव-ज्ञानसागर |
बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता
खोत यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाच्या सर्व अधिविभागांतील विषयतज्ज्ञ व संशोधक विदयार्थी यांनी डिजिटल स्वरूपात निर्माण केलेल्या बौद्धिक संपदेचे संघटन, व्यवस्थापन, संप्रेषण आणि जतन करणे यालाच 'इन्स्टिटयुशनल रिपॉझिटरी' म्हणतात. या रिपॉझिटरीमध्ये विद्यापीठाच्या विविध कार्यक्रमांची छायाचित्रे, वार्षिक अहवाल, विद्यापीठाची अन्य प्रकाशने, दीक्षान्त संबोधने, अन्य विविध प्रमुख कार्यक्रमांतील भाषणे, विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिका, अधिविभागातील संशोधकांचे शोधनिबंध व प्रकाशने इत्यादी सर्व नवी-जुनी माहिती साठवून ठेवता येईल आणि ती जगाच्या पाठीवरुन कोठूनही मिळविणे शक्य होईल. ही माहिती विद्यापीठाच्या http://ir.unishivaji.ac.in:8080/jspui/ या लिंकवर पाहता येईल.
‘शिव-ज्ञानसागर’ रिपॉझिटरीमध्ये तज्ज्ञ प्राध्यापक, संशोधक आणि पदाधिकारी यांनी संशोधन लेख, संशोधन अहवाल यांच्या स्वरूपात निर्माण केलेली माहिती, तांत्रिक अहवाल, संशोधनविषयक डेटा, प्रबंध, प्रबंधिका, महत्त्वाचे छापील संग्रह, अध्ययन व अध्यापन वाचन साहित्य, वार्षिक अहवाल, सांख्यिकीय अहवाल, परिषदांचे इतिवृत्त इत्यादींचा समावेश आहे. यांसह प्रश्नपत्रिका संच, अभ्यासक्रम, विविध कार्यक्रमांची छायाचित्रे, विद्यापीठाची प्रकाशने इ. विषयी माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध करण्यात येणार आहे.
विद्यापीठातील बौध्दिक संशोधनास जागतिक व्यासपीठ पुरविणे, एकाच मध्यवर्ती ठिकाणी सर्व कंटेन्ट डिजिटल स्वरूपात एकत्रित करणे, सर्व माहिती मुक्तपणे वापरास उपलब्ध करून देणे इ. उद्दिष्ट्ये रिपॉझिटरीद्वारे साध्य होणार आहेत. विद्यापीठांतर्गत माहितीचा सामुहिक उपयोग, प्राध्यापक व संशोधकांच्या संशोधनाचे परीक्षण व मूल्यांकन त्यांच्या डिजिटल स्वरूपाच्या साहित्याच्या वापरावरून ठरविता येणार आहे. माहितीची परिणामकारक देवघेव, प्रगत दृष्टिकोन, सार्वजनिक मूल्य इ. अनुषंगिक फायदे या रिपॉझिटरीचे आहेत.
इंडियन रिसर्च इन्फॉर्मेशन
नेटवर्क सिस्टीम (आय.आर.आय.एन.एस.):
I.R.I.N.S. |
केंद्रीय मनुष्यबळ विकास
मंत्रालयाच्या गांधीनगर स्थित ‘इन्फ्लिबनेट’ सेंटरतर्फे नुकताच इंडियन रिसर्च
इन्फॉर्मेशन नेटवर्क सिस्टीम (आय.आर.आय.एन.एस.) या प्रकल्प कार्यान्वित करण्यात
आला आहे. शैक्षणिक, संशोधन संस्था यांच्यासाठी वेबआधारित संशोधन माहिती व्यवस्थापन सेवा असे याचे स्वरुप आहे. हा प्रकल्प http://unishivaji.irins.org या लिंकच्या स्वरुपात बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रातर्फे शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवर उद्या लाँच करण्यात येणार आहे.
या प्रकल्पाच्या नोडल
अधिकारी व संचालक डॉ. नमिता खोत यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठातील सुमारे १६९ शिक्षकांची रिसर्च प्रोफाईल्स या माध्यमातून जगाला
एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. ‘नॅक’च्या दृष्टीनेही बाब फार महत्त्वाची आहे. या प्रणालीद्वारे प्राध्यापक, शास्त्रज्ञ व संशोधक विद्यार्थी यांचे संशोधनामधील विद्वत्-संवादाचे कार्य दर्शविता येणार असून विद्वत-नेटवर्क तयार करण्याची संधी मिळणार आहे. केलेल्या संशोधनाची माहिती मुद्रित व आलेख स्वरुपात उपलब्ध होते. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला केंद्रीय मंत्रालयाने ‘नॅशनल मिशन ऑन
एज्युकेशन थ्रू आयसीटी’ (NMEICT)
अंतर्गत मान्यता दिली आहे.
या प्रणालीद्वारे शिवाजी विद्यापीठातील ३२ अधिविभागांतील १६७ शिक्षकांची सुमारे २६१३ प्रकाशित
शोधनिबंध, ५ इतिवृत्ते, एक पुस्तकातील प्रकरण, नऊ ग्रंथ, २८३८ तज्ज्ञ स्रोत, ६६३७८
सायटेशन्स तसेच २१० अन्य संशोधकीय माहिती उपलब्ध आहे, अशी माहिती डॉ. खोत यांनी दिली. सहाय्यक ग्रंथपाल डॉ. शिवराज थोरात, डॉ. सुनिल बिर्जे, वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक यांच्यासह ज्ञानस्रोत केंद्राच्या सर्व सहकाऱ्यांनी या प्रकल्पांच्या
निर्मिती प्रक्रियेमध्ये मोलाचे योगदान दिल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये:
- · भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्व शैक्षणिक व संशोधन संस्थांना सामायिक व्यासपीठ म्हणून याचा वापर करता येईल.
- स्वतंत्र व्यक्ती/ विभाग/ शाळा/ संस्था यांचे ‘संशोधन केंद्र साधन’ म्हणून कामगिरी बजावेल.
- विद्यमान संशोधन व्यवस्थापन प्रणाली उदा. मनुष्यबळ व्यवस्थापन, अभ्यासक्रम व अनुदान पद्धती, खुल्या किंवा व्यावसायिक सायटेशन्सचा डाटाबेस, तसेच ऑर्सिड, स्कोपस, गुगल स्कॉलर, रिसर्चर यावरील संशोधकांचा डाटा घेऊन ही प्रणाली अधिकाधिक सक्षम व विश्वासार्ह बनली आहे.
- उपलब्ध तंत्रज्ञान, संशोधनांची क्षेत्रे, संशोधनातील अंतर ओळखणे व त्या अनुषंगाने संशोधन निधीवर त्यांचे धोरण परिभाषित करण्यासाठी धोरण निर्माते व सरकारचा महत्त्वाचा साधनस्रोत म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो.
‘शिव-ज्ञानसागरा’तील माहिती साठा सर्वांसाठीच उपयुक्त:
कुलगुरू डॉ. शिंदे
रिसर्च इन्फॉर्मेशन नेटवर्क
सिस्टीम आणि ‘शिव-ज्ञानसागर’ या दोन्ही उपक्रमांतील माहितीचा साठा
हा संशोधकांसह प्रत्येक घटकासाठी अत्यंत उपयुक्त स्वरुपाचा असून विद्यापीठातील
संशोधनासह येथील घडामोडींची ऐतिहासिक तसेच अद्यावत आणि विश्वासार्ह माहिती जगाच्या
पाठीवरुन कोठूनही पाहता येणे शक्य होणार आहे. शिवाजी विद्यापीठातील बौद्धिक मालमत्तेचे व्यवस्थापन, साठवणूक, जपणूक व जगभरात तिचे वितरण करण्याकरिता 'शिव-ज्ञानसागर'चा वापर उपयुक्त ठरणार आहे. यासाठी परिश्रम घेणाऱ्या
ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे काम
स्तुत्य स्वरुपाचे आहे, असे कौतुकोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी याविषयी
प्रतिक्रिया देताना काढले.
No comments:
Post a Comment