नांदेडच्या संघाविरुद्ध एक जोरदार फटका मारताना शिवाजी विद्यापीठाचे कप्तान सागर पवार. |
शिवाजी विद्यापीठाचे हॅटट्रीकवीर अजय आयरेकर व विश्वनाथ वरुटे |
कोल्हापूर, दि. २१ नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठात
सुरू असलेल्या अखिल भारतीय कुलगुरू चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीत
यजमान शिवाजी विद्यापीठ संघाने आज तिसऱ्या दिवशीही आपली विजयी वाटचाल सुरू राखली.
शिवाजी विद्यापीठाच्या संघाने नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठाचा ९ गडी राखून पराभव केला. विद्यापीठाचे अजय आयरेकर आणि विश्वनाथ वरुटे
यांच्या एकाच सामन्यातील दोन हॅटट्रीकची चर्चा दिवसभर होत राहिली. अन्य सामन्यांत पुणे,
अकोला, राहुरीसह पटियाळा, रोहटक या विद्यापीठांनी विजय मिळविले.
आज सकाळच्या सत्रात शिवाजी विद्यापीठ आणि नांदेड
विद्यापीठ यांच्यातील सामना अक्षरशः एकतर्फी स्वरुपाचा झाला. आजचा दिवस
विद्यापीठाच्या गोलंदाजांनी गाजविला. नाणेफेक जिंकून शिवाजी विद्यापीठाने नांदेड
संघाला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. नांदेड संघाला अवघ्या १२.१ षटकांत ७० धावांत
गुंडाळण्यात शिवाजी विद्यापीठाच्या संघाला यश आले. यामध्ये अजय आयरेकर यांनी चार
षटकांत २७ धावांत हॅटट्रीकसह ४ बळी टिपण्याची कामगिरी बजावली. त्यानंतर विश्वनाथ
वरुटे यानेही हॅटट्रीक नोंदविली. योगेश दळवी यांनी २ तर रमेश ढोणुक्षे यांनी १ बळी
मिळविला. ७० धावांचे हे आव्हान कप्तान सागर पवार यांनी राजेश कोळी आणि विनायक
शिंदे यांच्या साथीने ८.१ षटकांतच गाठले. अजय आयरेकर यांना सामनावीर घोषित करण्यात
आले.
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला आणि महर्षी
दयानंद सरस्वती विद्यापीठ, अजमेर यांच्या दरम्यानचा सामना अत्यंत चुरशीचा झाला.
अकोला विद्यापीठाच्या १२३ धावांचा पाठलाग करताना सुरिंदर कुमावत यांनी ४८ धावांची
खेळी केली. कुमावत पायचीत झाल्यानंतर अजमेर संघाचा कोसळणारा डाव संदीप चक्रवर्ती
यांनी सावरण्याचा प्रयत्न करीत ३१ धावांची महत्त्वाची खेळी केली. मात्र अखेरीस तीन
धावांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. अकोल्याकडून ५५ धावांची नाबाद अर्धशतकी
खेळी करणाऱ्या अनुज राऊत याला सामनावीर घोषित करण्यात आले.
दुपारच्या सत्रातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ,
राहुरी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर यांच्यातील सामनाही असाच
चुरशीचा झाला. नागपूर विद्यापीठाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली आणि
राहुरीच्या संघाला १७.४ षटकांत ११८ धावांत तंबूत धाडले. नागपूरच्या दीपक घोडमारे
यांनी ३ तर रितेश पुरकम यांनी २ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना नागपूर
विद्यापीठाचा संघ २० षटकांत ७ बाद १११ धावाच करू शकला. अवघ्या ७ धावांनी त्यांना
पराभूत व्हावे लागले. आठव्या क्रमांकावर खेळण्यास येऊन ३९ धावांची उपयुक्त खेळी
उभारण्यासह ३ बळी टिपण्याची कामगिरी करणारा राहुरीचा सतपाल गायकवाड सामनावीर ठरला.
पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आज
आपल्या विजयाचे खाते उघडले. जम्मूच्या शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठाविरोधात
खेळताना पुण्याच्या संघाने २० षटकांत ७ बाद १४६ धावा केल्या. पुण्याच्या विनोद
नरके (५१) आणि मनिष गायकवाड (५४) यांनी अर्धशतकी खेळी करून संघाच्या धावसंख्येस
आकार दिला. प्रत्युत्तरादाखल शेर-ए-काश्मीर विद्यापीठाचा संघ २० षटकांत ८ बाद १३६
धावाच करू शकला. पुणे संघ ११ धावांनी विजयी झाला. धडाकेबाज ५१ धावांची खेळी आणि २४
धावांत ३ बळी अशी कामगिरी बजावणारा पुण्याचा विनोद नरके सामनावीर ठरला.
मुंबई विद्यापीठाला मात्र पटियाळाच्या बपंजाबी
विद्यापीठाकडून २७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी
करताना पंजाबी विद्यापीठाने मुंबईसमोर १६१ धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युतरादाखल
खेळताना मुंबई विद्यापीठाचा संघ २० षटकांत ८ बाद १३४ इतकीच धावसंख्या उभारू शकला.
मुंबईच्या सिद्धेश चव्हाण याने नाबाद ७४ धावा करीत विजयासाठी एकाकी झुंज दिली.
पंजाबी विद्यापीठाकडून ४७ धावा काढून १७ धावांत २ बळी घेणाऱ्या गुरुप्रीत सिंग
याला सामनावीर घोषित करण्यात आले.
दुपारच्या सत्रातला सिमला विद्यापीठ, सिमला आणि
महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहटक यांच्यातील सामनाही रोमहर्षक ठरला. सिमला
विद्यापीठाने प्रथम फलंदाजी करताना रोहटकसमोर ८ बाद १२८ धावांचे आव्हान ठेवले. नरेंद्र
कुमारच्या ३८ आणि गौरव कुमारच्या ४३ धावांच्या बळावर रोहटकच्या संघाने हे आव्हान
लीलया गाठले. ३८ धावांसह १ बळी घेणारा रोहटकचा नरेंद्र कुमार सामनावीर ठरला.
उद्याचे सामने:
सकाळचे सत्र (स. ८.३० वा.):
·
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर वि. लाला लजपतराय
पशुविज्ञान विद्यापीठ, हिस्सार
·
जम्मू विद्यापीठ, जम्मू वि. पंजाबी विद्यापीठ,
पतियाळा
·
मुंबई विद्यापीठ, मुंबई वि. महर्षी दयानंद
सरस्वती विद्यापीठ, अजमेर
दुपारचे सत्र (दु. १ वा.):
·
पंजाब कृषी विद्यापीठ, लुधियाना वि. सावित्रीबाई
फुले पुणे विद्यापीठ, पुणे
·
शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान व तंत्रज्ञान
विद्यापीठ, जम्मू वि. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
·
पंजाब विद्यापीठ, चंदिगढ वि. हिमाचल प्रदेश
विद्यापीठ, सिमला
No comments:
Post a Comment