कोल्हापूर, दि.१९ नोव्हेंबर: शिवाजी
विद्यापीठात आजपासून अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुलगुरू चषक स्पर्धेला सुरवात
झाली. आज पहिल्या दिवशी झालेल्या बाद फेरीच्या सामन्यांत नवी दिल्लीचे जामिया
मिलिया इस्लामिया विद्यापीठ, जम्मू विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,
महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहटक, पंजाब विद्यापीठ, चंदीगढ आणि दीनदयाल उपाध्याय
विद्यापीठ, गोरखपूर या विद्यापीठांच्या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले.
आज दिवसभरातला सर्वाधिक प्रेक्षणीय सामना नवी दिल्लीच्या जामिया
मिलिया इस्लामिया विद्यापीठ आणि पंजाब कृषी विद्यापीठ, लुधियाना यांच्यात झाला.
काल उद्घाटनाच्या सत्रात झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात तुफान फटकेबाजी करणाऱ्या
जामिया मिलियाच्या संघाने आज पंजाब कृषी विद्यापीठ, लुधियाना संघाविरुद्ध खेळताना
२० षटकांत ५ बाद २३२ धावांचा डोंगर रचला. त्यानंतर लुधियानाच्या संघाला सर्व बाद १३६
धावांत गुंडाळले. मात्र त्यामध्ये जामिया मिलियाच्या गोलंदाजांनी दिलेल्या ४८
अवांतर धावांचा समावेश होता. जामिया मिलियाच्या संघाच्या वाहीद मोहम्मदने
स्पर्धेतील सर्वाधिक गतीमान अर्शतक आज नोंदविले. त्याने अवघ्या १६ चेंडूंत ६० धावा
केल्या. तोच सामनावीर ठरला. त्याला आदिल अहमद आणि अखलाख मोहम्मह यांनी प्रत्येकी
५८ धावा करून उत्तम साथ दिली. या धावांमुळे लुधियाना संघावर त्यांनी ९६ धावांनी
मात केली.
दुपारच्या सत्रातील अन्य सामन्यांमध्ये जम्मू विद्यापीठाने मुंबई
विद्यापीठावर ४ गडी राखून मात केली. मुंबई विद्यापीठाने प्रथम फलंदाजी करताना २०
षटकांत ८ गडी बाद १२४ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल जम्मू विद्यापीठाने ६ गड्यांच्या
मोबदल्यात १८.३ षटकांत हे आव्हान गाठले. जम्मूच्या दीपक कुमारने ५८ धावा केल्या.
या संघाकडून नाबाद ४३ धावा करणारा व २ बळी घेणारा राजेश मल्होत्रा सामनावीर ठरला.
याच सत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि जळगावच्या कवयित्री
बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यातील सामना पुणे विद्यापीठाने ३७
धावांनी जिंकला. पुणे विद्यापीठाचा संघ प्रथम फलंदाजी करताना जळगावच्या शशिकांत
शिरसाटच्या हॅटट्रीकमुळे १५.५ षटकांत ८५ धावांवर आटोपला. तेव्हा हा सामना
जळगावच्या बाजूने झुकला होता. तथापि, पुणे विद्यापीठाच्या सचिन सुर्वे विनोद नरके
मोनिष गायकवाड या गोलंदाजांनी अनुक्रमे २६-३, ६-२ आणि १२-२ असे बळी घेतल्यामुळे
जळगावचा संघ अवघ्या ४८ धावांतच तंबूत परतला. पुणे संघाकडून सर्वाधिक २२ धावा
काढणारा दिनेश वाल्मिकी सामनावीर ठरला.
तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात रोहटकच्या महर्षी दयानंद विद्यापीठाने
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठावर ६९ धावांनी विजय मिळविला. रोहटक संघाच्या
११८ धावांचा पाठलाग करताना राहुरीचा संघ अवघ्या ४९ धावांत गारद झाला. या सामन्यात
११ धावांसह ३ धावांत ५ बळी घेणारा रोहटकचा नरेंद्र कुमार सामनावीर ठरला.
चंदीगढच्या पंजाब विद्यापीठाने नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
विद्यापीठाचा ७ गडी राखून पराभव केला. नागपूरचे १०६ धावांचे आव्हान पंजाब
विद्यापीठाने १४.४ षटकांत पूर्ण करताना ११० धावा केल्या. पंजाब विद्यापीठाच्या
सूर्यकांत यांनी २.३ षटकांत १४ धावा देत ४ बळी घेताना स्पर्धेतील पहिली हॅटट्रीक
नोंदविली, हे या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. सूर्यकांतच सामनावीर ठरला.
गोरखपूरच्या दीनदयाळ उपाध्याय विद्यापीठाने जम्मू केंद्रीय
विद्यापीठावर ४ गडी राखून मात केली. अखेरच्या चेंडूपर्यंत अत्यंत चुरशीने खेळल्या
गेलेल्या या सामन्यात जम्मू विद्यापीठाच्या १४७ धावांचे आव्हान गोरखपूर संघाने ६
गड्यांच्या मोबदल्यात पार केले. गोरखपूरकडून ३६ धावा करून विजयात महत्त्वाची
कामगिरी बजावणारा सुरेंद्र यादव सामनावीर ठरला.
उद्याचे सामने:
सकाळचे सत्र (सकाळी ८.३० वा.)
१) पंजाब विद्यापीठ,
चंदिगढ वि. महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहटक
२) शिवाजी विद्यापीठ,
कोल्हापूर वि. केंद्रीय विद्यापीठ, जम्मू
३) दीन दयाल उपाध्याय
गोरखपूर विद्यापीठ, गोरखपूर वि. लाला लजपतराय पशुविज्ञान विद्यापीठ, हिस्सार
दुपारचे सत्र (दुपारी १ वा.)
१)
जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठ, दिल्ली वि.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
२)
जम्मू विद्यापीठ, जम्मू वि. महर्षी दयानंद
सरस्वती विद्यापीठ, अजमेर
३)
हिमाचल प्रदेश विद्यापीठ, सिमला वि. महात्मा फुले
कृषी विद्यापीठ, राहुरी
No comments:
Post a Comment