शिवाजी विद्यापीठाच्या ५७व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करताना नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले. |
शिवाजी विद्यापीठाच्या ५७व्या वर्धापन दिन समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या प्रतिकृतीचे अनावरण प्रसंगी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व कुलगुरू डॉ. उद्धव भोसले. |
शिवाजी विद्यापीठाच्या नूतन फोल्डरचे अनावरण करताना कुलगुरू डॉ. उद्धव भोसले. व्यासपीठावर कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर. |
शिवाजी विद्यापीठाच्या बॅजचे अनावरण करताना कुलगुरू डॉ. उद्धव भोसले. व्यासपीठावर कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर |
शिवाजी विद्यापीठातील उत्कृष्ट अधिविभागासाठीचा पुरस्कार स्वीकारताना अधिविभाग प्रमुख डॉ. पी.एस. पाटील. |
विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना मनोहर कुलकर्णी. |
विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना लक्ष्मण परीट. |
महाविद्यालयीन गुणवंत प्राचार्य पुरस्कार स्वीकारताना प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे. |
बॅ. पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारताना प्रा.डॉ. भरत नाईक. |
कोल्हापूर, दि. १८
नोव्हेंबर: पश्चिम महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, शेक्षणिक आणि
सांस्कृतिक अशा सर्वांगीण विकासामध्ये शिवाजी विद्यापीठाने मौलिक स्वरुपाचे योगदान
दिलेले आहे, असे गौरवोद्गार नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी आज येथे काढले. शिवाजी विद्यापीठाच्या
५७ व्या वर्धापन दिन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या
राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते, तर प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के प्रमुख उपस्थित
होते.
कुलगुरू डॉ. भोसले म्हणाले,
शिवाजी विद्यापीठाने स्थापनेपासूनच अद्यावत अभ्यासक्रम सुरू करण्यास प्राधान्य
दिले असले, तरी पारंपरिक शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष पुरविले आहे. या क्षेत्राचे
भौगोलिक स्थान व महत्त्व लक्षात घेऊन त्याला पूरक व पोषक असे अभ्यासक्रम
राबविण्यावर या विद्यापीठाचा भर असल्याचे दिसून येते. आज सर्वत्र इनोव्हेशनचा
बोलबाला आहे; तथापि, इनोव्हेशनचे खरे काम
शिवाजी विद्यापीठामध्येच होत आहे. राज्यातील अन्य विद्यापीठे कुलगुरू डॉ. शिंदे
यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी विद्यापीठाने राबविलेल्या उपक्रमांचे अनुसरण करीत
आहेत. कुलगुरू डॉ. शिंदे यांच्यामुळे राज्यभरातील विद्यापीठांमध्ये अशा प्रकारची
सकारात्मक देवाणघेवाण सुरू झाली आहे. राज्यातील ज्या विद्यापीठांचे प्रभारी
कुलगुरूपद त्यांनी भूषविले, तेथे त्यांनी त्यांचा अमीट ठसा उमटविला, अशा शब्दांत
त्यांनी गौरव केला.
Dr. Uddhav Bhosale |
भारतीय शिक्षण
व्यवस्थेसमोरील आव्हानांचा वेध घेताना कुलगुरू डॉ. भोसले म्हणाले, शैक्षणिक क्षेत्रात
राष्ट्रीय स्तरावर आपण व्यापक प्रगती चालविली असली, तरी आजही आंतरराष्ट्रीय
स्तरावरील आघाडीच्या ३०० विद्यापीठांच्या यादीत भारतातील एकही विद्यापीठ नाही, हे
वास्तव आहे. काळानुरूप बदलासाठीची तयारी नसणे हे त्यामागील एक महत्त्वाचे कारण
आहे. त्यामुळे कालसुसंगत बदलांसाठी भारतीय विद्यापीठांनी प्रयत्न करण्याची मोठी
गरज आहे. विशेषतः परदेशी विद्यापीठांचे, महाविद्यालयांचे आमगन नव्या शैक्षणिक
धोरणांतर्गत अधोरेखित केलेले असतानाच्या काळात तर ते अत्यंत गरजेचे आहे. बेरोजगारी
हे आपल्या व्यवस्थेसमोरील सर्वाधिक मोठे आव्हान आहे. नोकऱ्या देणे हे
विद्यापीठांचे पहिले काम नसले तरी विद्यापीठांच्या प्राधान्यक्रमावरील हा प्रमुख
विषय असायला हवा. बेरोजगारीची तीव्रता कमी करण्यात अपयशी ठरल्यास त्याचे
दुष्परिणाम अखिल भारतीय समाजाला भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला. आपल्या
देशातील सुमारे ३५ टक्के विद्यार्थी पदवी शिक्षणाला प्रवेश घेतात, पण ते पूर्ण
करीत नाहीत, ही वस्तुस्थिती त्यांनी अधोरेखित केली.
कुलगुरू डॉ. भोसले पुढे
म्हणाले, बेरोजगारीचे दुसरे प्रमुख कारण म्हणजे विद्यापीठीय व्यवस्थेमधून शिकून
बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांमधील रोजगारक्षमतेचा अभाव होय. आपल्याकडे खाजगीच
नव्हे, तर सार्वजनिक क्षेत्रांतही भरपूर रोजगार संधी आहेत. तथापि, त्यासाठी
शिक्षणाच्या बरोबरीनेच आवश्यक असणारी विविध कौशल्ये अवगत करणेही गरजेचे असते.
मात्र, त्यांच्याअभावी रोजगाराच्या संधींपासून युवा वर्ग वंचित राहतो. हे चित्र
बदलण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्या दृष्टीने शिवाजी
विद्यापीठाने चालविलेला आऊटकम बेस्ड स्कील एज्युकेशनचा उपक्रम अत्यंत स्तुत्य व
अनुकरणीय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
विद्यापीठीय परीक्षा
पद्धतीतही आमुलाग्र बदल करण्याची गरज अधोरेखित करताना कुलगुरू डॉ. भोसले म्हणाले,
आजच्या आपल्या परीक्षा या मेमरी टेस्ट आहेत. त्यामध्ये लॉजिकल, अॅनालिटीकल, अॅटिट्यूड अगर अॅप्टिट्यूड यांना
स्थान नाही. खरे तर विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेचा पूर्ण अंदाज येण्यासाठी तशा
प्रकारच्या चाचण्यांची आज गरज आहे. त्यांच्या आधारावरच विद्यार्थ्यांचे मूल्यमापन
होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांत संशोधनाविषयीचे आकर्षण व आत्मियता शालेय
शिक्षणापासूनच रुजविण्याची मोठी गरज आहे. त्या दृष्टीनेही शिवाजी विद्यापीठाने
संशोधनाला प्रोत्साहन देणाऱ्या ज्या योजना जाहीर केल्या आहेत, त्या अत्यंत
कालसुसंगत आहेत. विद्यार्थ्यांनी अध्ययन व नवनिर्मितीचे बीज विकसित करण्याच्या
दृष्टीने सत्य, ज्ञान आणि परिश्रम या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असा संदेशही
त्यांनी दिला.
कोल्हापूरमय झालो: कुलगुरू डॉ. शिंदे
यंदाचा वर्धापन दिन हा कुलगुरू
डॉ. देवानंद शिंदे यांच्या कारकीर्दीतील अखेरचा आहे. त्याचे भावनिक प्रतिबिंब त्यांच्या
आजच्या अध्यक्षीय भाषणात दिसून आले. साडेचार वर्षांपूर्वी शिवाजी विद्यापीठात रुजू
झालो, तेव्हा माझे, माझ्या कुटुंबियांचे येथे कोणीच नव्हते; मात्र या कालावधीत विद्यापीठ परिक्षेत्रात अनेकांशी माझे
जन्मभराचे ऋणानुबंध निर्माण झाले. ‘मी
पूर्णतः कोल्हापूरमय झालो,’
अशी हृद्य भावना कुलगुरू डॉ. शिंदे यांनी भाषणाच्या सुरवातीलाच व्यक्त केली.
Dr. Devanand Shinde |
कुलगुरू डॉ. शिंदे
म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून पुण्याचे सावित्रीबाई फुले पुणे
विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि पुढे पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठ या तीन विद्यापीठांचा प्रभारी कुलगुरू म्हणून काम करण्याची अभूतपूर्व
संधी मला लाभली, याचे सारे श्रेय शिवाजी विद्यापीठ परिवाराला आहे. आंबेडकर-शाहू
यांच्यानंतर महात्मा फुले, लोकहितवादी आणि पुन्हा डॉ. आंबेडकर यांच्या कर्मभूमीकडे
झालेला हा प्रवास अनुभव समृद्ध करणारा ठरला. मुंबई विद्यापीठाची जबाबदारी ही तर
अत्यंत अभूतपूर्व परिस्थितीत माझ्याकडे आली होती. सुमारे नऊ महिने ती सावरण्यासाठी
मी अथकपणे कार्यरत होतो. या कालावधीत माझ्या इथल्या परिवाराने माझी स्थिती समजून घेत
इथला कारभार अत्यंत जबाबदारीने चालविला, कधीही तक्रारीला जागा ठेवली नाहीत,
याबद्दल कौतुक करावे तितके थोडेच आहे. महापूर काळात विद्यापीठातील सहकाऱ्यांनी
ज्या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पूरग्रस्तांसह पूरग्रस्त जनावरे, विद्यार्थी
यांना मदतीचा हात दिला, त्याला तोड नाही, असे कौतुकोद्गारही त्यांनी काढले.
माझ्या कारकीर्दीत केलेली सर्वाधिक चांगली गोष्ट कोणती असेल, तर ती ‘जलयुक्त विद्यापीठ योजना’ होय, असे सांगून कुलगुरू
डॉ. शिंदे म्हणाले, या कालावधीत पूर्वीच्या जलसाठ्यांच्या जोडीला काही जुन्यांचे
पुनरुज्जीवन आणि नव्याने काहींची उभारणी अशा प्रकारे कॅम्पसवरील जलसाठ्यांची साठवण
क्षमता आजघडीला सुमारे ३१ कोटी लीटर इतकी वाढविण्यात यश आले आहे. कॅम्पसवर तीन
धरणांसह दहा शेततळी आणि नऊ विहीरी आहेत. पाण्याच्या बाबतीत विद्यापीठ पूर्णतः
स्वयंपूर्ण बनले आहे. पूर्वीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या जोडीला ६००० लीटर प्रति
तास इतक्या क्षमतेचा आर.ओ. प्रकल्प उभारला. या प्रकल्पाद्वारे सर्वांना समान दर्जाचे
शुद्ध पाणी पुरविले जाते. परिणामी, कॅम्पसवरील विद्यार्थ्यांतील पाण्यापासून
होणाऱ्या आजारांचे प्रमाण गेल्या तीन वर्षांत लक्षणीयरित्या कमी झाले आहे. या
जलयुक्त मोहिमेमुळेच पूर काळात कोल्हापूर शहराला पंधरा दिवसांहून अधिक काळ दररोज
शुद्ध पाण्याचा अखंडित पुरवठा करणे विद्यापीठाला शक्य झाल्याचेही त्यांनी
सांगितले.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, रुजू झालो, त्यावेळी काळाची पावले ओळखून
विद्यापीठीय व्यवस्थेमध्ये इनक्युबेशन केंद्रांचे महत्त्व लक्षात घेऊन तशा
प्रकल्पांना प्राधान्य देण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार विद्यापीठात आज शिवाजी
सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अॅन्ड लिंकेजिससह तीन इनक्युबेशन केंद्रांबरोबरच संलग्नित
२१ महाविद्यालयांमध्येही इनक्युबेशन सेंटर स्थापन झाली आहेत. तेवढ्यावरच न थांबता विद्यापीठाने
सेक्शन-८ कंपनी स्थापन केली. त्याखेरीज फॅकल्टी डेव्हलपमेंट सेंटर फॉर सायबर
सिक्युरिटी अॅन्ड डाटा सायन्सेस (MHRD), ‘रुसा’अंतर्गत
सेंटर फॉर नॅचरल प्रोडक्ट्स अॅन्ड अल्टरनेटिव्ह मेडिसीन, रिसोर्स
सेंटर फॉर इन्क्लुजिव्ह एज्युकेशन, सेंटर फॉर व्हीएलएसआय सिस्टीम डिझाईन, सेंटर
फॉर नॅनो-फॅब्रिक्स, स्पोर्ट्स फॅसिलिटी अॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर, स्टॅटिस्टिक्स
रिसर्च लॅब यांच्यासह भाभा अणूसंशोधन केंद्राची पर्यावरणीय तरंग मापनासाठीची
आयर्मोन सुविधा, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राअंतर्गत गूळ गुणवत्ता
तपासणी केंद्र, सेंटर फॉर स्कील अॅन्ड आंत्रप्रिन्युअरशीप डेव्हलपमेंट, सेंटर फॉर
लीडरशीप डेव्हलपमेंट, सेंटर फॉर करिअर गायडन्स अॅन्ड सायकॉलॉजिकल कौन्सेलिंग,
सेंटर फॉर एक्सलन्स इन सेरिकल्चर, सेंटर फॉर एक्सलन्स इन एपिकल्चर, सेंटर फॉर
एक्सलन्स इन टिश्यू-कल्चर, ‘आयजीटीआर’चे
अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी सेंटर इत्यादी केंद्रांची प्रस्थापना व यशस्वी
कार्यान्वयन झाले आहे.
शिवाजी विद्यापीठ हे
आता आयएसओ-
9001:2015 प्रमाणित असून प्रशासकीय प्रक्रियेचे स्टँडर्डायझेशन करण्याच्या दिशेने
विद्यापीठाची जागतिक निकषांनुसार वाटचाल सुरू असल्याचेच त्यातून स्पष्ट होत
असल्याचे सांगून कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, गतवर्षी जागतिक स्तरावर शैक्षणिक संस्थांच्या मूल्यांकनात दबदबा असलेल्या
ब्रिटीश ‘क्यू.एस. वर्ल्ड युनिव्हर्सिटी’ रँकिंगमध्ये भारतातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये शिवाजी
विद्यापीठाची क्रमवारी ५६-६० अशी आहे; तर, ‘ब्रिक्स’ देशांतील शैक्षणिक संस्थांमध्ये ही क्रमवारी २५१-२६० अशी
आहे. शिवाजी विद्यापीठाने
पंचवार्षिक बृहतआराखडा निर्माण करून अंमलबजावणीस सुरवात केली आहे. महाराष्ट्र
सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम-२०१६च्या निर्मितीमध्ये शिवाजी विद्यापीठाचे अत्यंत
मौलिक स्वरुपाचे योगदान राहिले.
विद्यापीठाने सुरू
केलेल्या माहिती-संवाद तंत्रज्ञानाधारित उपक्रमांची माहितीही कुलगुरू डॉ. शिंदे
यांनी दिली. ते म्हणाले, विद्यापीठातील सर्व बैठकांच्या कामकाजाचे संगणकीकृत
सॉफ्टवेअर शिव-सभा, विद्यापीठाची प्रकाशने विक्रीसाठी शिव- प्रकाशन, विद्यापीठाच्या
दीक्षान्त समारंभासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी शिव-दीक्षान्त, संलग्नित
महाविद्यालयांच्या नेव्हिगेशनसाठी शिव-सारथी अॅप, कर्मचाऱ्यांना
त्यांच्या सेवाविषयक बाबींसाठी शिव-कर्मचारी सेवा पोर्टल, विद्यापीठाचा वेब रेडिओ
शिव-वाणी, फायनान्स अॅन्ड अकाऊंट सिस्टिम सॉफ्टवेअर, विद्यापीठ मतदार
नोंदणीसाठी ऑनलाइन पोर्टल, पीजी विभागांत प्रवेशासाठी ऑनलाइन परीक्षा, संपूर्ण प्रवेश
प्रक्रियेचे संगणकीकरण, नियुक्त्यांविषयक बाबींसाठी पोर्टल, पीएच.डी., एम.फील.
संशोधक मार्गदर्शक नोंदणीसाठी पोर्टल, एनएसएस नोंदणीसाठी वेब पोर्टल असे अनेक
अभिनव उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मुडलअंतर्गत विविध साधन
कार्यक्रमांच्या निर्मितीसाठी २४x७ सपोर्ट डेस्कही निर्माण करण्यात आला आहे.
संशोधनाला चालना देण्यासाठी विद्यापीठाने संशोधन धोरण निश्चिती केली असल्याचे
सांगून कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी रिसर्च
सेन्सिटायझेशन स्कीम, विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकांसाठी रिसर्च इनिसिएशन
स्कीम, रिसर्च स्ट्रेन्दनिंग स्कीम, रिसर्च प्रमोशन स्कीम, रिसर्च अॅप्रिसिएशन
स्कीम,
शिक्षक, विद्यार्थी व रिसर्च गाईड या सर्वांसाठी बेस्ट रिसर्चर पुरस्कार, बेस्ट
परफॉर्मिंग डिपार्टमेंट स्कीम, संशोधक विद्यार्थ्यांसाठी वित्तसहाय्य योजना,
आयपीआर व पेटंट फाइलिंगसाठी सहायता, मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रांतील उत्तम संशोधन
निबंधांच्या परकीय भाषांमध्ये अनुवादासाठी अनुदान योजना तसेच डॉक्टरल व पोस्ट
डॉक्टरल कार्यक्रमांसाठी वित्त सहाय्य योजना अशा अनेक अभिनव योजना संशोधनाला
प्रोत्साहनासाठी सुरू करण्यात आल्या आहेत. संशोधनासाठी बाह्य अनुदान संस्थांकडूनही
विविध फेलोशीप व वित्तसहाय्य मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व मदत
करण्याचे धोरणही विद्यापीठाने सातत्याने अंगिकारले असल्याचे त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, विद्यापीठाने कौशल्य विकासासाठी गेल्या चार
वर्षांत विविध उपक्रम हाती घेतले. त्याचे परिणामही सकारात्मक दिसून आले.
विद्यार्थ्यांच्या बरोबरीनेच शिक्षणबाह्य मुले, नागरिक, महिला, दिव्यांग,
तृतीयपंथी, शेतकरी, उद्योजक-व्यावसायिक, बँकर आदी समाजघटकांसाठी विद्यापीठाने
विविध कौशल्य विकास कार्यशाळा व उपक्रम
राबविले आहेत. यामध्ये स्कील ऑन द स्पॉट, स्कील ऑन व्हील, कौशल्य व रोजगार मेळावे,
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथीयांसाठी विशेष कौशल्य विकास कार्यशाळा,
मेळावे यांचा समावेश आहे. यासाठी विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांसह विविध
ठिकाणी ४००हून अधिक कौशल्य प्रदान केंद्रे चालविली आहेत. त्या ठिकाणी तीन तास ते
एक वर्ष या कालावधीमध्ये २८२हून अधिक कौशल्ये प्रदान केली जातात. विद्यापीठाकडे
१५० प्रशिक्षित ट्रेनर्सची फौज असून त्यांनी आजपर्यंत दोन लाखांहून अधिक जणांना
विविध कौशल्ये प्रदान केली आहेत. विद्यापीठाने या कालावधीत विद्यापीठ
परिक्षेत्रासह पुणे येथेही आजवर एकूण ४८ कौशल्य व रोजगार मेळावे घेतले आहेत. या
रोजगार मेळाव्यांतून सुमारे ७० टक्के विद्यार्थ्यांना रोजगार संधी उपलब्ध झाल्याचेही
त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या प्रतिकृतीसह विविध
उपक्रमांचे उद्घाटन
शिवाजी विद्यापीठाचा
मानबिंदू असलेला विद्यापीठ प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य
पुतळ्याच्या प्रतिकृतीचे आज प्रमुख पाहुणे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते
अनावरण करण्यात आले. बी.आर. खेडकर यांनी मूळ पुतळा साकारला आहे. त्या पुतळ्याच्या
प्रतिकृती पगमार्क आर्ट गॅलरीचे रमण कुलकर्णी, अतुल डाके आणि मनोहर टॉईजचे दिपक
महामुनी यांनी साकारल्या आहेत. त्यांचाही आजच्या समारंभात गौरव करण्यात आला.
शिवपुतळ्याच्या प्रतिकृतीचे अनावरण करणे, हा आपल्या आयुष्यातील गौरवाचा क्षण
असल्याची भावना डॉ. भोसले यांनी व्यक्त केली. यावेळी पहिली प्रतिकृती कुलगुरू डॉ.
शिंदे यांनी कुलगुरू डॉ. भोसले यांना भेट देण्यात आली.
त्याचप्रमाणे विद्यापीठाचा
बॅज, फोल्डर, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे ‘शिव-ज्ञानसागर इन्स्टिट्यूशनल रिपॉझिटरी’ व
‘इंडियन रिसर्च इन्फॉर्मेशन नेटवर्क
सिस्टीम’ (आयआरआयएनएस) आणि वॉक थ्रू लीड
बॉटेनिकल गार्डन या उपक्रमांचेही कुलगुरू डॉ. भोसले यांच्या हस्ते व्हर्चुअल उद्घाटन
करण्यात आले.
या वेळी विद्यापीठातील,
महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांची गुणवंत पाल्ये यांचा
विद्यापीठ प्रशासकीय तसेच कल्याण निधी पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. तसेच,
प्रशासकीय गुणवत्ता अभियानांतर्गत पुरस्कार प्राप्त प्रशासकीय विभाग व अधिविभाग
यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर 'नॅक'चे 'अ' मानांकन मिळविणाऱ्या
ईस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेज, सातारा व आर्ट्स, कॉमर्स अॅन्ड सायन्स कॉलेज, रानंदनगर, बुर्ली या संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा सत्कार करण्यात
आला.
उत्कृष्ट अधिविभागासाठीचा पहिला पुरस्कार ‘पदार्थविज्ञान’ला!
शिवाजी विद्यापीठाने या
वर्षीपासून उत्कृष्ट अधिविभाग पुरस्कार देण्यास सुरवात केली. विज्ञान व तंत्रज्ञान
आणि सामाजिक शास्त्रे असे दोन गट करून अधिविभागांचे सर्वंकष काटेकोर मूल्यमापन करण्यात
येऊन या पुरस्कार देण्यात येत असून संबंधित विभागाला पारितोषिकापोटी दहा लाख
रुपये, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्याचे ठरले. त्यानुसार यंदाचा उत्कृष्ट
अधिविभागासाठीचा पहिला पुरस्कार पदार्थविज्ञान विभागाने पटकाविला. विभागाच्या
वतीने अधिविभाग प्रमुख डॉ. पी.एस. पाटील यांनी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते
हा पुरस्कार स्वीकारला.
वर्धापन दिन समारंभात प्रदान करण्यात आलेल्या विविध पारितोषिक विजेत्यांची
नावे पुढीलप्रमाणे:
विद्यापीठातील गुणवंत
शिक्षक: प्रा.डॉ. संजय शामराव
चव्हाण (रसायनशास्त्र अधिविभाग)
विद्यापीठातील गुणवंत सेवक: मनोहर अनंत कुलकर्णी (सहाय्यक
अधीक्षक, आस्थापना विभाग), लक्ष्मण भीमराव परीट (प्र. शाळा परिचर, रसायनशास्त्र
अधिविभाग)
संलग्न
महाविद्यालयांतील गुणवंत प्राचार्य: डॉ. धनाजी गोविंदराव
कणसे (भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली)
बॅ. पी.जी. पाटील आदर्श
शिक्षक: प्रा.डॉ. भरत आदाप्पा नाईक (महावीर
महाविद्यालय, कोल्हापूर)
उत्कृष्ट
फोटोग्राफी पुरस्कार: प्रथम
(विभागून): शुभम रमेश हत्तरकी, संकेत उदय माळी,
द्वितिय (विभागून): सुंदरकुमार कांबळे,
सुभाष पोपटराव वाणी, तृतीय (विभागून):
उदयणादित्य पाटील, युवराज जगताप.
यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू
डॉ. डी.टी. शिर्के यांनी प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. संगीत
व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व पसायदान सादर केले. श्रीमती
नंदिनी पाटील व धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास
नांदवडेकर यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
तत्पूर्वी, विद्यापीठ प्रांगणात
प्रमुख पाहुणे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते शिवपुतळ्यास पुष्पहार घालून
अभिवादन करण्यात आले. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात
आले. यावेळी नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मधुकरराव गायकवाड, प्र-कुलगुरू
डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी
संचालक गजानन पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे
संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, अधिष्ठाता
डॉ. पी.डी. राऊत, डॉ. पी.एस. पाटील, डॉ. भारती पाटील, डॉ. ए.एम. गुरव, आयक्यूएसी
संचालक डॉ. आर.के. कामत, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ.
नमिता खोत, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड यांच्यासह अधिविभाग प्रमुख,
शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांचे कुटुंबिय, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment