शिवाजी विद्यापीठात संविधान दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. श्यामसुंदर मिरजकर. व्यासपीठावर डॉ. श्रीकृष्ण महाजन. |
कोल्हापूर, २५ नोव्हेंबर: भारतीय संविधानाची निर्मिती
करून भारतातल्या कनिष्ठ समजल्या गेलेल्या समाजाच्या मानेवर पारंपरिक व्यवस्थेने
लादलेले गुलामगिरीचे जोखड भिरकावून देऊन नष्ट करण्याचे महान कार्य डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांनी केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांनी
आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने
संविधान दिनानिमित्त “डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान” या विषयावरील व्याख्यानात
ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन होते.
डॉ. मिरजकर म्हणाले, राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे व्यापक
दृष्टीने पाहिले पाहिजे. भारतीय राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वी भारतामध्ये
धर्मसूत्रे आणि मनुस्मृतीने निर्माण केलेल्या नियमांमध्ये भारतीय समाजव्यवस्थेमधील
शासन, प्रशासन कसे चालेल, याची मांडणी केली होती. भारतीय समाजावर वैदिक परंपराचा
पगडा तत्कालीन शासन व्यवस्थेवर दिसून येत होता. ती व्यवस्था गुलामीची होती. भारतीय
संविधानाच्या निर्मितीमधून ही गुलामगिरी डॉ. आंबेडकर यांनी नष्ट केली. ब्रिटीश साम्राज्यात
सुद्धा बाबासाहेबांनी विविध समित्या, गोलमेज परिषदा आदींच्या माध्यमातून समता, सामाजिक
न्याय आणि बंधुत्व या मूलभूत मानवी मूल्यांची आग्रही मांडणी केलेली दिसते. भारतीय
संविधानाने जनसामान्यांना प्रदान केलेल्या मूलभूत अधिकारांमुळे त्यांना सन्मानाने जगण्याची
संधी उपलब्ध झाली आहे. विद्यार्थी, शिक्षकांनी आपापल्या विषयासंदर्भातील भारतीय
संविधानाच्या योगदानाचे संशोधन केले पाहिजे. आपण संविधान आत्मीयतेने समजावून घेणे
आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. श्रीकृष्ण महाजन म्हणाले, आपण आता सांविधानिक नितीमत्ता,
सांविधानिक भाषा आणि संविधानातील आशय, तत्त्वज्ञान व व्यवहार यांच्या संदर्भात स्पष्ट
भूमिका घेऊन काम करावे लागणार आहे. भोवताली ज्या काही असंविधानिक गोष्टी घडत असतील,
तेथे प्रखर भूमिका घेणे काळाची गरज आहे.
अविनाश भाले यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले, तर आभार तेजपाल मोहरेकर यांनी
आभार मानले. या व्याख्यानास डॉ. पी.एस. कांबळे, डॉ. ए.बी. कांबळे, डॉ. के.डी.
सोनवणे, डॉ. रामोत्रा, डॉ. पवनकुमार गायकवाड, कास्ट्राईब संघटनेचे आनंद खामकर,
कुमार कांबळे यांच्यासह विविध अधिविभागांतील विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या
यशस्वितेसाठी सलमान काकतीकर, सचिन देठे, सुशांत पंडित, विक्रम कांबळे यांनी परिश्रम
घेतले.
Very informative activity on the eve of constitution day
ReplyDelete