शिवाजी विद्यापीठाचे सामनावीर राजेश कोळी |
कुलगुरू चषक क्रिकेट स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी क्रीडारसिकांची शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर मोठी गर्दी होऊ लागली आहे. |
कोल्हापूर, दि. २० नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठाचे स्टार क्रिकेटपटू व
कप्तान सागर पवार आणि राजेश कोळी यांच्या दमदार ९४ धावांच्या सलामी भागीदारीच्या
जोरावर शिवाजी विद्यापीठाच्या संघाने जम्मू केंद्रीय विद्यापीठ संघावर तब्बल ९२ धावांनी विजय
मिळविला. अन्य सामन्यांत जामिया मिलिया, जम्मू, रोहटक आदी संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले.
सकाळच्या सत्रात नाणेपेक
जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या शिवाजी विद्यापीठ संघाचे कप्तान सागर पवार आणि
राजेश कोळी यांनी दमदार सलामी दिली. सागर पवार ५२ धावांवर बाद झाले. राजेश कोळी ५२
धावांवर नाबाद राहिले. त्यांच्या भागीदारीमुळे शिवाजी विद्यापीठाने २० षटकांत ४
बाद १५५ अशी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना जम्मू विद्यापीठाचा संघ
१६.४ षटकांत अवघ्या ६३ धावांत गारद झाला. फलंदाजांनी आपली कामगिरी चोख
बजावल्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या गोलंदाजांनीही पाहुण्या संघाला जखडून ठेवण्यात
यश मिळविले. विश्वनाथ वरुटे याने ४ तर योगेश दळवी आणि रमेश ढोणुक्षे यांनी
प्रत्येकी २ बळी मिळविले. विजयात महत्त्वाचा वाटा उचलणारे राजेश कोळी सामनावीर
ठरले.
दुपारच्या सत्रातला
सर्वाधिक चर्चेचा सामना जम्मू विद्यापीठ, जम्मू आणि अजमेरच्या महर्षी दयानंद
सरस्वती विद्यापीठ यांच्यातला ठरला. जम्मू विद्यापीठाच्या दीपक कुमार याने
धडाकेबाज फलंदाजीचे दर्शन घडविताना १०२ धावांची शतकी खेळी केली. या जोरावर जम्मू
संघाने अजमेरसमोर ३ गड्यांच्या मोबदल्यात तब्बल २२८ धावांचे मोठे आव्हान ठेवले.
प्रत्युत्तरादाखल अजमेर संघाला २० षटकांत ९ बाद ८६ धावाच करता आल्या. जम्मूच्या
विजयात मोलाचा वाटा उचलणारा दीपक कुमार सामनावीर ठरला.
दुपारी पुण्याच्या
सावित्रीबाई फुले विद्यापीठाला नवी दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया
विद्यापीठाकडून पराभव स्वीकारावा लागला. पुणे विद्यापीठाने नाणेफेक जिंकून प्रथम
फलंदाजी करताना १९.५ षटकांत सर्व बाद ११२ धावा केल्या. जामिया मिलियाच्या संघाने
हे आव्हान १६ षटकांत अवघ्या ३ गड्यांच्या मोबदल्यात पार केले आणि ७ गडी राखून
सामना जिंकला. १५ धावांत ३ बळी मिळविणारा व १४ धावा करणारा जामिया मिलियाचा
मोहम्मद अखलाख सामनावीर ठरला.
राहुरीच्या महात्मा फुले
कृषी विद्यापीठाला सिमल्याच्या हिमाचल प्रदेश विद्यापीठाकडून ४ गडी राखून पराभव
स्वीकारावा लागला. राहुरीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना जालंदर धनवटेच्या ६९
धावांच्या खेळीच्या जोरावर १८.१ षटकांत सर्व बाद १२८ धावांचे आव्हान सिमल्याच्या
संघासमोर ठेवले. हे आव्हान सिमला विद्यापीठाने १९ षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात
पार केले. ४ बळी घेऊन विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या सिमल्याच्या धरम प्रकाशला
सामनावीर घोषित करण्यात आले.
तत्पूर्वी, सकाळच्या सत्रातील दुसऱ्या सामन्यात रोहटकच्या
महर्षी दयानंद विद्यापीठाने चंदीगढच्या पंजाब विद्यापीठाचा ८ गडी राखून पराभव
केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चंदीगढच्या संघाने २० षटकांत ६ बळींच्या
मोबदल्यात १४९ धावा केल्या. हे आव्हान सामनावीर नरेंद्र कुमारच्या नाबाद ९२
धावांच्या खेळीच्या बळावर रोहटक विद्यापीठाच्या संघाने १९ षटकांत अवघ्या २ बळींत
पार केले.
सकाळचा तिसरा सामना दीन दयाल उपाध्याय गोरखपूर
विद्यापीठ, गोरखपूर वि. लाला लजपतराय पशुविज्ञान विद्यापीठ, हिस्सार यांच्यात
झाला. गोरखपूरने प्रथम फलंदाजी करताना १७ षटकांत सर्व बाद ७४ धावा केल्या. हिस्सार
संघाने एकही गडी न गमावता हा अवघ्या ५.५ षटकांत अगदी लीलया एकतर्फी जिंकला.
हिस्सार संघाकडून गोलंदाजी करताना गोरखपूरच्या ५ खेळाडूंना १५ धावांत पॅव्हेलियनचा
रस्ता दाखविणारा विकास खरब सामनावीर ठरला.
उद्याचे सामने:
सकाळचे सत्र (सकाळी ८.३० वा.)
१) महर्षी दयानंद
सरस्वती विद्यापीठ, अजमेर वि. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
२) मुंबई विद्यापीठ,
मुंबई वि. पंजाबी विद्यापीठ, पतियाळा
३) शिवाजी विद्यापीठ,
कोल्हापूर वि. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
दुपारचे सत्र (दु. १ वा.)
४) शेर-ए-काश्मीर कृषी
विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ, जम्मू वि. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
५) हिमाचल प्रदेश
विद्यापीठ, सिमला वि. महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहटक
६) महात्मा फुले कृषी
विद्यापीठ, राहुरी वि. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर
Its nice Sir
ReplyDeleteअतिशय सुंदर
ReplyDelete