कोल्हापूर, दि. १५ नोव्हेंबर: शिवाजी
विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘शिवाजी विद्यापीठ
परिसर छायाचित्रण स्पर्धे’स स्पर्धकांचा उदंड
प्रतिसाद लाभला. स्पर्धेसाठी आलेल्या सुमारे ६०० छायाचित्रांचे प्रदर्शन उद्यापासून
(दि. १६) दोन दिवस राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. उद्या सकाळी
११.३० वाजता कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. डी.टी.
शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार असून प्रदर्शन
सर्वांना पाहण्यास मोफत खुले राहील, अशी
माहिती कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आज येथे दिली.
कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी दिलेल्या
माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील गुणी कलाकार आणि छायाचित्रकार
यांच्यासाठी शिवाजी विद्यापीठ परिसराच्या छायाचित्रणाची स्पर्धा आयोजित करावी आणि
त्या माध्यमातून विद्यापीठ परिसराचे कलात्मक छायाचित्रण मोठ्या प्रमाणात उपलब्ध
व्हावे, या दृष्टीने सदर छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेला सर्व
स्तरांतील छायाचित्रकारांचा उदंड प्रतिसाद लाभला. स्पर्धेत एकूण १२४ स्पर्धक
सहभागी झाले. प्रत्येक स्पर्धकाला कमाल पाच छायाचित्रे पाठवावयाची होती. अशी
सुमारे ६०० छायाचित्रे स्पर्धेसाठी आली होती. या सर्व छायाचित्रांचे प्रदर्शन
उद्यापासून दोन दिवस विद्यापीठात भरविण्यात येणार आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी,
नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आस्वाद घ्यावा, असे आवाहनही त्यांनी
केले आहे.
शुभम हत्तरकी, संकेत
साळी स्पर्धेत प्रथम
कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी सदर स्पर्धेचा
निकालही जाहीर केला असून या स्पर्धेमध्ये श्री. शुभम रमेश हत्तरकी आणि श्री.
संकेत उदय साळी या दोघांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला आहे.
त्यांना प्रत्येकी रु. १२,५०० रोख व प्रमाणपत्र असे पारितोषिक प्रदान करण्यात
येईल. स्पर्धेतील द्वितीय व तृतीय क्रमांकही विभागून देण्यात आले आहेत. श्री.
सुंदरकुमार कांबळे व श्री. सुभाष पोपटराव वाणी यांना विभागून द्वितीय क्रमांक
देण्यात आला. त्यांना रु. ७५०० रोख व प्रमाणपत्र असे पारितोषिक देण्यात येईल. श्री.
उदयणादित्य एस. पाटील व युवराज जगन्नाथ जगताप यांना विभागून तृतीय क्रमांक देण्यात
आला असून त्यांना प्रत्येकी रु. ५००० रोख व प्रमाणपत्र देण्यात येईल. उपरोक्त
विजेत्यांना सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी विद्यापीठाच्या ५७व्या वर्धापन
दिन समारंभात पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. अन्य सहभागी स्पर्धकांना सहभाग
प्रमाणपत्र ई-मेलद्वारे पाठविण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे आवाहनही कुलसचिवांनी
केले आहे.
No comments:
Post a Comment