Thursday 21 November 2019

डिजीटल व्यवहारांमध्ये पायाभूत सुविधांद्वारे बळकटी आणण्यासाठी आरबीआय प्रयत्नशील - आरबीआयच्या सहाय्यक महाव्यवस्थापक अरूंधती सिन्हा


                                                                                


                                                                                                          
कोल्हापूर, दि.21 नोव्हेंबर - आज, कागदोपत्री व्यवहार कमी होवून डीजीटल पेमेंट, कार्ड पेमेंट या बरोबरच मोबाईल बैंकींगच्या मागणीमध्ये मोठयाप्रमाणात झालेली वाढ ही ग्राहकांच्या मागणीबरोबरच काळाची गरज बनलेली आहे.त्यामुळे आवश्यक त्या पायाभूत सुविधांमध्ये बळकटी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  यासाठी आरबीआय एक सुरक्षित प्रणाली तयार करीत आहे, असे प्रतिपादन रिझर्व्ह बैंक ऑफ इंडीया विभागीय कार्यालय मुंबई येथील सहाय्यक महाव्यवस्थापक अरूंधती सिन्हा यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या बैंक ऑफ इंडीया अध्यासन आणि रिझर्व्ह बैंक ऑफ इंडीया यांच्या संयुक्त विद्यमाने 'ई-पेमेंट सायबर घोटाळे' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र इमारतीमध्ये करण्यात आलेे.  या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना सिन्हा बोलत होत्या.  विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर अध्यक्षस्थानी होते.  यावेळी आरबीआय मुंबई येथील विभागीय कार्यालयाचे व्यवस्थापक अंकुर सिंग, बैंक ऑफ इंडिया कोल्हापूरचे विभागीय व्यवस्थापक नितीन देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
               अरूंधती सिन्हा पुढे म्हणाल्या, नव्या तंत्र प्रगत बैंकींग व्यवस्थेचा पेमेंट हा भाग असून त्याबाबत जनजागृती करण्याचे काम रिझर्व्ह बैंकेने हाती घेतले आहे.  यासाठी तीन वर्षांचा आराखडा तयार केला असून सुरक्षित, खात्रीशीर, परवडणारी देय प्रणाली करीत असताना खर्च घट, स्पर्धावाढ, सोईस्करता विश्वसनीयता हे चार महत्वाचे घटक आहेत.  ग्राहकांना जलदगतीने, सुरक्षितपणे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी ई-पेमेंटची व्यापकता वाढविण्याचे काम सुरू आहेे.  पुढील काळात अद्यावत तंत्रज्ञानामुळे बैंकींग आणि वित्त क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल होणार आहेत.  मागील पंधरा वर्षात मोबाईल बैंकींग नव्हते.  आपल्या देशामध्ये आर्थिक व्यवहार करीत असताना ओटीपीद्वारे प्रमाणिकरण करण्याच्या पध्दती अवलंबल्या जात आहेत.   देशभर ही एक अद्वितीय प्रणाली विकसित होत आहे.  बाहेरील देशांमध्ये आर्थिक व्यवहार करताना ही प्रणाली अवलंबली जात नाही. ते आपल्याकडून शिकून अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सुरक्षित आर्थिक व्यवहारांमध्ये जलदता आणण्यासाठी संपूर्ण बैंकींग उद्योगांसह अन्य पेमेंट सिस्टम ऑपरेटर्संनाही या प्रणालीबाबत सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.  रोख आर्थिक व्यवहार कमी करून डिजीटल व्यवहारांकडे जनसामान्यांचा कल वाढविण्याची प्रक्रीया दीर्घकालीन असली तरी त्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. बैंकींग क्षेत्रामधील पेमेंट पध्दती ही अर्थव्यवस्थेतील महत्वपूर्ण कणा आहे. डिजीटील व्यवहारांसाठी लोकपाल सुरक्षा पध्दती चांगल्या प्रकारे कार्यान्वीत झालेली आहे.  अनेक तरूणांना या क्षेत्रामधील नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. 
             आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ.विलास नांदवडेकर म्हणाले, सायबर गुन्हयांकडे गंभीरतेने सातत्याने लक्ष देणे आवश्यक आहे.  इंटरनेटच्या माध्यमातून जगामध्ये बैंकींग व्यवहारामध्ये काही चुकीच्या आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडत आहेत.  त्यासाठी बैंक, वित्त आणि ऑनलाईन डीजीटल व्यवहारांमध्ये सायबर सुरक्षा अधिक सक्षम करण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.  ग्राहाकांनीही कोणत्याही प्रकारच्या अमिशाला बळी पडता जागृकतेने व्यवहार केले पाहिजेत.
           या प्रसंगी बैंक ऑफ इंडिया कोल्हापूर, लिड बॅॅंकचे विभागीय व्यवस्थापक नितीन देशपांडे आणि अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.तळुले डी.सी. यांनीही मनोगत व्यक्त केले. विद्यापीठाच्या बैंक ऑफ इंडीया चेअर इन रूरल बैंकींगचे समन्वयक डॉ.व्ही.बी.ककडे यांनी स्वागत प्रास्ताविक केले.  याप्रंसगी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ.जे.एफ.पाटील, अनिल पाटील यांचेसह विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक, प्रशासकीय सेवक मोठयाप्रमाणात उपस्थित होते.
-----

No comments:

Post a Comment