Monday 30 December 2019

डॉ. आप्पासाहेब पवार यांच्यामुळे तळागाळातील विद्यार्थी उच्चशिक्षणाच्या प्रवाहात: प्रा. किसनराव कुराडे यांचे प्रतिपादन

शिवाजी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्यासह अन्य मान्यवर.


प्रा. किसनराव कुराडे यांचे स्वागत करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत (डावीकडून) डॉ. सी.टी. पवार, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. एस.जे. नाईक, प्रा. टी.के. सरगर.


कोल्हापूर, दि. ३० डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्यामुळेच तळागाळातील, बहुजन समाजातील मुलांना उच्चशिक्षणाच्या प्रवाहात स्थान लाभले, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. किसनराव कुराडे यांनी आज येथे काढले.
शिवाजी विद्यापीठाचे डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवन योजना आणि डॉ. आप्पासाहेब पवार कमवा व शिका प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पवार यांचा ३८वा स्मृतिदिन व विद्यार्थी भवनच्या सुवर्ममहोत्सवाचा उद्घाटन समारंभ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. किसनराव कुराडे बोलत होते. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर होते.
प्रा. कुराडे म्हणाले, यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई हे आप्पासाहेबांचे विद्यार्थी. कोल्हापुरात उच्चशिक्षणाची गंगा प्रवाहित करण्यासाठी त्यांनी आपल्या या विद्यार्थ्यांचे सहाय्य तर घेतलेच; शिवाय, ज्या पद्धतीने अथक वैयक्तिक योगदान देऊन या परिसराच्या भौतिक आणि शैक्षणिक विकास व विस्ताराची पायाभरणी केली, त्याला तोड नाही. आप्पासाहेबांनी बजावलेल्या पितामह स्वरुपाच्या कामगिरीमुळेच शिवाजी विद्यापीठ आज लौकिक पावले आहे.
प्रा. किसनराव कुराडे
शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी भवनच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी असलेल्या प्रा. कुराडे यांनी डॉ. पवार यांच्या अनेक आठवणी या प्रसंगी सांगितल्या. ते म्हणाले, आम्ही भवनचे विद्यार्थी विद्यापीठ परिसरातील शेतीत श्रमदान करीत असताना कंजारभाट समाजातील काही लोक दारुचे फुगे घेऊन या परिसरातून जात. वाटेत कोणी विद्यार्थी ग्राहक म्हणून मिळतो का, ते पाहात. हे लक्षात आल्यानंतर आम्ही आठ दहा जणांनी त्यांना चांगले दमात घेऊन पळवून लावले, त्यांची दारु रस्त्यावर ओतून दिली आणि पुन्हा कामाला सुरवात केली. थोड्या वेळाने तेथून कुलगुरू डॉ. पवार निघाले असताना त्यांना तो वास आला. विद्यार्थ्यांना विचारले असता, त्यांनी घडला प्रकार सांगितला. तेव्हा आप्पासाहेबांनी दोन वॉचमन त्या समाजाच्या वस्तीकडे पाठविले आणि त्यांनी पुन्हा असे केल्यास पोलिसांत देण्याची धमकी दिली. त्यावर ते बांधव, त्यांच्या घरातील महिला आणि मुले गयावया करू लागली. ही बाब वॉचमननी साहेबांच्या कानी घातली. तेव्हा या समाजाची चांगल्या शिक्षणाअभावी आणि रोजगाराअभावी परवड होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या लोकांना बोलावले, त्यांच्यासह त्यांच्या घरातील महिलांना उद्यमनगरात रोजगार मिळवून दिला. त्याचप्रमाणे भवनच्या विद्यार्थ्यांवर त्यांच्या मुलांना शिकविण्याची जबाबदारी दिली. शालाबाह्य कंजारभाट समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आप्पासाहेबांनी केलेल्या या धडपडीमुळे समोरच्याचा सकारात्मक विचार करण्याची शिकवण आपोआपच आमच्यात रुजली, असेही ते म्हणाले.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, विद्यार्थी भवनच्या विद्यार्थ्यांनी आपल्या पूर्वसुरींच्या अनुभवातून कृतीशील होण्याचा आदर्श घ्यावा. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श घेऊन आप्पासाहेबांनी विद्यापीठात कमवा व शिका योजनेची सुरवात केली, त्यामागे विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण देण्याचा हेतू होताच, पण त्या बरोबरीने कौशल्य विकास, आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वासाची पेरणीही त्यांनी केली. आप्पासाहेब हे विद्यापीठासाठी दीपस्तंभ होतेच, पण त्यांनी या समाजाला अनेक दीपस्तंभ निर्माण करून दिले, ज्यांनी समाजाला ज्ञान, दिशा, प्रकाश आणि आत्मविश्वास प्रदान केला. कमवा व शिका योजनेतील मुलींसाठी भवनच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त वसतिगृह उभारण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याची ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली. त्याचप्रमाणे भवनच्या माजी विद्यार्थ्यांनी कृतज्ञता निधी उभारून त्या माध्यमातून येथे विविध उपक्रम राबवावेत, तसेच भवनमध्ये शिकून बाहेर पडलेल्या ५० निवडक व्यक्तींच्या चरित्रांचा समावेश असणारे पुस्तक तयार करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
अध्यक्षीय भाषणात कुलसचिव डॉ. नांदवडेकर म्हणाले, डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या चरित्रातून आपल्याला चांगल्या गोष्टींसाठी आग्रही राहण्याचा आदर्श मिळतो. विद्यार्थी भवनने अनेक गुरूवर्य घडविले, म्हणून तळागाळातील विद्यार्थी शिक्षण घेऊ शकले. डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम येत्या चार महिन्यांत पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी भवनचे अधीक्षक डॉ. संभाजी शिंदे, डॉ. सी.टी. पवार, प्रा. जी.एस. हिरेमठ, प्रा. सुदाम पाटील, निवृत्त वेल्फेअर आयुक्त अंकुश मोरे, प्रा. शितोळे आदींनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रबोधिनीचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. एस.जे. नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्राचार्य जी.पी. माळी यांनी परिचय करून दिला. योगेश घाडेकर व सुप्रिया सोहोनी यांनी सूत्रसंचालन केले. प्रबोधिनीचे सचिव प्रा. टी.के. सरगर यांनी आभार मानले.
तत्पूर्वी, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते विद्यार्थी भवन परिसरात वृक्षारोपण व सुवर्णमहोत्सवी फलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच, विद्यापीठ प्रांगणातील डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या पुतळ्यांना कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, प्राचार्य मानसिंग जगताप, प्रा. अशोक जगताप, अधिष्ठाता डॉ. ए.एम. गुरव यांच्यासह अनेक शिक्षक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment