शिवाजी विद्यापीठात डॉ. सरोजिनी बाबर यांच्या कार्याविषयी आयोजित चर्चासत्रात बीजभाषण करताना डॉ. राजन गवस |
कोल्हापूर, दि. ७ जानेवारी: स्वकर्तृत्व
आणि व्यक्तीमत्त्वातून बहुजन स्त्रीला आत्मभान प्रदान करण्याचे कार्य डॉ. सरोजिनी
बाबर यांनी केले, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी आज येथे
केले.
शिवाजी विद्यापीठाचे यशवंतराव चव्हाण अध्यासन केंद्र व महर्षी विठ्ठल
रामजी शिंदे अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सरोजिनी बाबर: कार्य व संशोधन लेखन’ या विषयावरील एकदिवसीय चर्चासत्रात बीजभाषण करताना डॉ. गवस बोलत होते. शिवाजी
विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार तर अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ.
डी.टी. शिर्के होते. आयोजन केले आहे. यावेळी डॉ. बाबर यांच्या भगिनी कुमुदिनी पवार
यांचे नातू करण पवार प्रमुख उपस्थित होते.
Dr. Rajan Gavas |
डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जिवितकार्याचे सर्वंकष महत्त्व अधोरेखित
करताना डॉ. गवस म्हणाले, डॉ. बाबर या बहुजन समाजातील कर्तृत्ववान स्त्री तर
होत्याच, शिवाय, लोकज्ञानाचा संचय करणारी कर्तबगार संशोधक आणि गोतावळा जपण्याची
वृत्ती असणारी उत्तम माणूसपणा हाही त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा एक अविभिन्न घटक
होता. या तिहेरी भूमिकांत वावरत असताना साहित्य, संशोधन, राजकारण, समाजकारण अशा
विविध क्षेत्रांत त्यांनी आपले योगदान दिले आणि त्या माध्यमातून समाजाला काही ना
काही देण्याचा कसोशीने प्रयत्न केला. हे सर्व त्यांनी कोणत्याही मान्यतेसाठी केले
नाही. किंबहुना, मान्यतेला नकार देऊन स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यामध्ये जसे दलित
साहित्य यशस्वी झाले, तसेच मान्यतेचे निकष बाजूला ठेवून काम करणाऱ्यांत सरोजिनी
अक्कांचे नाव अग्रेसर आहे.
डॉ. सरोजिनी बाबर यांचा मनःपिंड घडविण्यात कर्मवीर भाऊराव पाटील आणि
साने गुरूजी यांचे मोठे योगदान असून त्यांच्या प्रेरणेनेच अक्कांना लोकसाहित्यातील
संशोधनाची प्रेरणा मिळाल्याचे सांगून डॉ. गवस म्हणाले, शेतीच्या अवतीभोवती पडलेल्या
ज्ञानाचे संकलन होण्याची कळकळ डॉ. बाबर यांच्या मनी होती. त्यातून समाज अधिक उन्नत
होण्याची शक्यता त्यांना जाणवत असे. माणूस आणि माती यांचे ऋणानुबंध जपले तरच
माणूसपण खऱ्या अर्थाने समृद्ध होईल, अशी त्यांची धारणा होती. त्यातूनच त्यांनी वंचितांच्या
प्रश्नांना मिळेल त्या व्यसपीठावर वाचा फोडली. विधिमंडळाच्या माध्यमातून गोरगरीब मुलांच्या नादारीच्या (ईबीसी)
निर्णयामध्ये सरोजिनी अक्कांचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरला. बिकट प्रश्नावर सखोल,
अभ्यासपूर्ण व संदर्भांसहित मांडणी करण्याची त्यांची हातोटी माहिती असणाऱ्या
सदस्यांना त्यांनी अशा विषयावर आवर्जून बोलावे, असे वाटत असे. सरोजिनी अक्का आपले
संपूर्ण आयुष्य याच करारीपणाने जगल्या. त्यातून त्यांनी स्वतःच्या व्यक्तीमत्त्वाचा
एक धाक निर्माण केला होता. स्त्रियांच्या बाबतीतले तत्कालीन सामाजिक वास्तव प्रखरच
होते, त्याला छेद देऊन सरोजिनी अक्कांनी आपली कारकीर्द घडविली.
लोकसाहित्य या संज्ञेपेक्षा लोकज्ञान ही संज्ञा अधिक योग्य वाटत
असल्याचे सांगून डॉ. गवस म्हणाले, शिक्षणासह अनेक बाबींपासून वंचित असलेल्या
समाजातील लोक हजारो वर्षे ज्ञान संक्रमणासाठी मौखिक साधन वापरत असत. हे त्यांचे
संचित साधन असे. तथापि, या रचनांचा आपल्याला उपयोग नाही, म्हणून ती नाकारण्याचे
काम अभिजन वर्गाने केले. यामुळे हजारो वर्षांच्या एका महत्त्वाच्या ज्ञानपरंपरेकडे
पाठ फिरविण्यात आली. जे मूळचे लोकज्ञान, त्याला लोकसाहित्य असे नाव देऊन टाकले.
त्यात विद्यापीठीय व्यवस्थेत बंद खोलीत बसून लोकसाहित्याचे संशोधन करणाऱ्यांमुळे
तर याविषयी आणखी अनास्था निर्माण झाली. तथापि, या लोकज्ञान व संचिताचे महत्त्व ओळखणारी
सम काळातली एक महत्त्वाची स्त्री म्हणून डॉ. बाबर यांच्या कार्याकडे पाहायला हवे,
असेही ते म्हणाले.
Dr. Jaysingrao Pawar |
यावेळी डॉ. जयसिंगराव पवार यांनी डॉ. बाबर यांच्या आठवणींना उजाळा
दिला. ते म्हणाले, मराठी भाषेच्या इतिहासामध्ये लोकसाहित्याच्या अनुषंगाने अभ्यास
करताना पहिले नमन डॉ. सरोजिनी बाबर यांना करावे लागेल. लोकसाहित्याच्या संशोधक
म्हणून त्या जितक्या मोठ्या होत्या, तितक्याच एक सहृदयी व्यक्ती म्हणून ही मोठ्या
होत्या. यातून त्यांनी माझ्यासह अनेकांना सातत्याने सहकार्याचा हात दिला. वडिल
कृष्णराव मास्तरांच्या संस्कारांचा त्यांच्या जडणघडणीत मोठा वाटा राहिला. तत्कालीन
अनेक सत्यशोधक, पुरोगामी समाजसुधारकांचा त्यांच्या घरी वावर असे. त्यांच्या
सहवासाचे प्रतिबिंब अक्कांच्या जीवनात उमटले. हा वारसा अक्कांनी हयातभर टिकविला,
वाढविला.
Dr. D.T. Shirke |
अध्यक्षीय भाषणात डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, एका व्यक्तीने आपल्या
आयुष्यात किती कामे करावीत, याचे प्रत्यंतर डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जीवनपटाकडे
नजर टाकली असता लक्षात येते. स्वातंत्र्य चळवळीपासून ते सर्वस्पर्शी
साहित्यनिर्मिती ते राजकारण, समाजकारण असा सार्वत्रिक वावर त्यांचा होता. दरवर्षी
होणाऱ्या मराठी भाषा पंधरवड्यामध्ये त्यांच्या कार्यावर चिंतन करणारे अशा प्रकारचे
सत्र असावे. त्याचप्रमाणे विद्यापीठ उभारत असलेल्या नूतन संग्रहालयामध्ये
लोकसाहित्याचे एक दालन असावे आणि त्यात सरोजिनी बाबर यांच्या कार्याचा समावेश
असावा, अशा स्वरुपाचा प्रस्ताव अध्यासनामार्फत सादर करावा, अशी सूचनाही त्यांनी या
प्रसंगी केली.
यावेळी वैशाली भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृह
राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या शुभसंदेशांचे तर संजय पाटील यांनी कुमुदिनी पवार
यांच्या मनोगताचे वाचन केले. डॉ. प्रकाश पवार यांनी प्रास्ताविक केले. तत्पूर्वी,
मान्यवरांच्या हस्ते महर्षी वि.रा. शिंदे, यशवंतराव चव्हाण व सरोजिनी बाबर यांच्या
प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
No comments:
Post a Comment