शिवाजी विद्यापीठात कबीरपंथी भजन सादर करताना आष्टा व दुधगाव येथील भजनी मंडळांचे कलाकार. |
कबीरपंथी भजनांच्या
सादरीकरणाने विद्यापीठ परिसर नादमय
कोल्हापूर, दि. १५
जानेवारी: “खेती करो हरी नाम की मनवा, खेती करो हरी नाम की। पईसा ना लागे रुपिया ना लागे,
कवडी न लागे फुटकी।। मन के बैल सुरत पोहावे, रसि लगाऊँ गुरू ग्यान की। कहत कबीरा
सुन भाई साधु, भक्ति करो हरीहर की।।” या आणि यासारख्या कबीराच्या दोह्यांनी आज शिवाजी विद्यापीठाचा
परिसर नादमय होऊन गेला.
शिवाजी
विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाच्या वतीने सुरू असलेल्या मराठी भाषा संवर्धन
पंधरवड्याअंतर्गत आज सकाळी बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रासमोरील
हिरवळीवर आष्टा येथील कबीरपंथी भजनी मंडळाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कुलगुरू डॉ. देवानंद
शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे
औपचारिक उद्घाटन करण्यात आले. कुलगुरू डॉ. शिंदे यावेळी म्हणाले की, कबीर आणि
तुकाराम यांचा काळ वेगळा असला तरी त्यांची भाषा, वेदना आणि संवेदना एकच आहे. ते
दोघेही सर्वसामान्याची भाषा बोलतात आणि सर्वसामान्यासाठी आवाज उठवितात. त्यामुळे
त्यांच्याशी आपण पटकन जोडले जातो. या दोघांचे हे वैशिष्ट्य व्यक्तीगतरित्या मला
खूप भावते. महाराष्ट्रामध्ये कबीराचे दोहे पारंपरिक पद्धतीने जपले गेले आहेत.
त्यांना आज शिवाजी विद्यापीठाच्या व्यासपीठावरुन सादर करताना अत्यंत आनंद होतो
आहे. भारतीय लोककलेचा हा एक लुप्त होत चाललेला कलाप्रकार सादर करणाऱ्या कलावंतांना
विद्यापीठात आणल्याबद्दल मराठी अधिविभागाचे त्यांनी अभिनंदन केले.
यावेळी आष्टा येथील नवनाथ
भजनी मंडळाच्या विष्णू आबा थोरात, नारायण गाडगे, भारती मस्के, अजय गस्ती, विजय
दत्तू टोमके यांनी तर दुधगाव येथील कबीरपंथी भजनी मंडळाच्या अविनाश कुदळे, भरमू
भाऊ गाजी, कृष्णा आंबी, शिवाजी गवळी, मारुती गवळी, धोंडीराम सपकाळ या कलाकारांनी
कबीरपंथी तसेच वारकरी संप्रदायातील भजनांचे अत्यंत सुंदर सादरीकरण केले. मराठी
अधिविभागातील डॉ. नंदकुमार मोरे यांनी या कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी परिश्रम
घेतले.
यावेळी कुलसचिव डॉ.
विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, ज्ञानस्रोत केंद्र संचालक
डॉ. नमिता खोत, मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे, ज्येष्ठ विचारवंत डॉ.
सुनीलकुमार लवटे, उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, डॉ. वैभव ढेरे, डॉ. पी.बी. बिलावर
आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment