कोल्हापूर, दि.18 जानेवारी - सकारात्मक विचारांनी प्रेरीत होवून सामाजिक जबाबदारी निभावण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे येणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी (भा.प्र.से) यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने विद्यापीठ अधिविभागातील विद्यार्थ्यांसाठी एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहामध्ये करण्यात आले होते.कार्यशाळेचे उद्धाटन प्रसंगी 'प्रशासनातील नेतृत्व' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आयुक्त डॉ.कलशेट्टी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर होते. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.श्रीमती मिनाक्षी गजभिये यांची प्रमुख उपस्थिती होती.
आयुक्त डॉ.कलशेट्टी पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांमधील नेतृत्व विकास घडविण्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाची महत्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. माझ्या जडण घडणीमध्ये विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचा फार मोठा वाटा आहे. कोणत्याही कार्याच्या अंमलबजावणी करण्यामध्ये नेतृत्वाची अत्यंत आवश्यकता असते. एखाद्या कार्याच्या ध्येयपूर्तीकडे जाण्यासाठी, कार्याचे नियोजन, नियंत्रण आणि मार्गदर्शन करण्यासाठी सक्षम नेतृत्वाची निकड भासते. आपल्या कार्याप्रती प्रमाणिक व सकारात्मक राहून समूहामध्ये उत्साह व ऊर्जा निर्माण करण्याचे कौशल्ये असले पाहिजे. विविध अभियानांमध्ये कामे करीत असताना आपले व्यक्तीमत्व विकास उत्तम प्रकारे होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. विविध शाखांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनी समाजाप्रती कृतघ्न राहून सामाजिक बांधीलकी जोपासत नेतृत्व कौशल्ये आत्मसात केले पाहिजेत. आपल्याला नेमून दिलेल्या जबाबदारीच्या पलीकडे जाऊन आपली आवड आणि जिद्दीच्या माध्यमातून कार्य संपन्न केले पाहिजे.
अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर म्हणाले, संशोधनाच्या माध्यमातून समाजहीत जोपासण्यासाठी विद्यार्थींनी प्राथमिकता दिली पाहिजे. विद्यार्थीदशेत वावरताना प्रत्येक कार्यक्रमामध्ये पुढाकार घेवून, सर्वांना सोबत घेऊन हिरहिरेने कार्य संपन्न केले पाहिजे.एखाद्या कार्यामध्ये लोकांचा सहभाग, विविध घटकांचा सहभाग कसे वाढविता येईल यावर मंथन केले पाहिजे. विद्यार्थ्योचे प्रश्न, सहकार्यांचे प्रश्न, भागातील प्रश्न सोडविण्याची प्रवृत्ती स्वत:मध्ये विकसित करणे आवश्यक आहे.
स्वागत व प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ.आर.व्ही.गुरव यांनी केले.वृत्तपत्र विद्या व संवादशास्त्र अधिविभगाचे डॉ.शिवाजी जाधव यांनी आभार मानले.यावेळी विद्यापीठ परिसरातील विविध अधिविभागांमधील विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होते.
-----
No comments:
Post a Comment