Tuesday 7 January 2020

गांधीजींमुळे भारतीय राजकारणाला नैतिक अधिष्ठान: डॉ. न.गो. राजूरकर



शिवाजी विद्यापीठाच्या गांधी अभ्यास केंद्रातर्फे आयोजित उषा मेहता व्याख्यानमालेत बोलताना डॉ. न.गो. राजूरकर.

वर्धा येथील यशवंत दाते संस्थेचा डॉ. यशवंत सुमंत जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. अशोक चौसाळकर यांचा गौरव करताना डॉ. राजूरकर. शेजारी गांधी अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. भारती पाटील.

कोल्हापूर, दि.७ जानेवारी
: भारतीय राजकारणाला सर्वार्थाने नैतिक अधिष्ठान प्रदान करून त्याचे महत्त्व सातत्याने अधोरेखित करण्याचे कार्य महात्मा गांधी यांनी केले, असे प्रतिपादन हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठातील राज्यशास्त्र अधिविभागाचे माजी प्राध्यापक डॉ. न.गो. राजूरकर यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या गांधी अभ्यास केंद्रामार्फत आयोजित प्रा. डॉ. उषा मेहता स्मृती व्याख्यान मालेअंतर्गत महात्मा गांधीचे राजकीय नेतृत्वया विषयावर ते बोलत होते. मानव्यशास्त्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत व राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर होते.
डॉ. राजूरकर म्हणाले, समकालीन राजकारणामध्ये सर्व प्रकारच्या नैतिकतेला अत्यंत मागचे स्थान असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी यांच्या राजकारणाकडे पाहिले असता अत्यंत आदर्श राजकारणाचे ते मूर्तीमंत प्रतीक असल्याचे दिसून येते. गांधीजींनी जाणीवपूर्वक राजकारणातील साध्य व साधन या दोहोंच्या अनुषंगाने नैतिकतेचा आग्रह धरल्याचे व व्यक्तीगत जीवनात तिचा अवलंब केल्याचे दिसून येते. त्यामुळे महात्मा गांधी यांचे राजकारण आजच्या काळात आदर्श असले तरी त्या मार्गाचा अवलंब करणे आजच्या राजकीय नेतृत्वाला सहजशक्य नाही. तथापि, चांगले राजकीय नेतृत्व हे महात्मा गांधी यांच्या नैतिक मार्गाच्या आचरणातूनच घडणे शक्य आहे, हेही तितकेच खरे आहे.
डॉ. राजूरकर म्हणाले, महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले, तेव्हा काही मोजक्या शिक्षित लोकांनाच त्यांची माहिती होती; मात्र, दक्षिण आफ्रिकेत त्यांच्या कार्याचे चाहते मोठ्या संख्येने होते. भारतीय राजकारणात प्रवेश करीत असताना ओळख निर्माण करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. तथापि, पुढच्या अवघ्या पाच वर्षांतच इथल्या प्रत्येक सर्वसामान्यांपर्यंत गांधीजी पोहोचू शकले, कारण त्यांच्या प्रश्नांची ठाम उत्तरे गांधीजींकडे होती. हेही त्यांच्या राजकारणाचे फार महत्त्वाचे वैशिष्ट्य होते, असेही ते म्हणाले. डॉ. राजूरकर यांनी महात्मा गांधींचे जीवनचरित्र, त्यांची जडणघडण, त्यांच्यावरील प्रभाव, त्यांच्या राजकीय नेतृत्वाची वैशिष्टये यांविषयी अत्यंत साध्या सोप्या इंग्रजीतून विस्तृत विवेचन केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ. अशोक चौसाळकर यांनी लोकमान्य टिळक महात्मा गांधी यांच्या संबंधावर भाष्य करत त्याविषयीचे गैरसमज दूर केले. आजच्या पिढीला महात्मा गांधींच्या विचारांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी डॉ. चौसाळकर यांना वर्धा येथील यशवंत दाते स्मृती संस्थेचा डॉ. यशवंत सुमंत स्मृती जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्द गांधी अभ्यास केंद्रातर्फे प्रा. राजूरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी गांधी अभ्यास केंद्रच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी स्वागत प्रास्ताविक केले, तर नेहा वाडेकर यांनी आभार मानले. श्रेय मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विविध अधिविभागांसह महाविद्यालयांतील प्राध्यापक, विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment