कोल्हापूर, दि. ८ जानेवारी: पारंपरिक वारकरी भजने, विठुमाऊलीचा गजर अन् त्याला टाळ मृदुंगाची साथ अशा
अत्यंत भक्तीमय, उत्साही वातावरणात निघालेल्या ग्रंथदिंडीने शिवाजी विद्यापीठाच्या
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे आज उद्घाटन झाले. आजपासून पुढे पंधरवडाभर मराठी
भाषेच्या अनुषंगाने अनेकविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन मराठी अधिविभागाच्या
वतीने करण्यात आले आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या
मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर आज सकाळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ.
विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, ग्रंथपाल डॉ. नमिता खोत,
मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे, इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉ. अक्षय सरवदे,
डॉ. नंदकुमार मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी पूजनाने ग्रंथदिंडीस प्रारंभ
करण्यात आला.
या ग्रंथदिंडीत विठ्ठल
मंदिर भजनी मंडळ, मंगळवार पेठ, कोल्हापूर, महादेव रामचंद्र यादव ग्रुप भजनी मंडळ,
टोप, पांडुरंगनगरी महिला भजनी मंडळ, कोल्हापूर यांच्यासह महे, कसबा बीड,
कासारवाडी, पाचगाव, प्रयाग चिखली, सिद्धनेर्ली, हणमंतवाडी या ठिकाणच्या भजनी
मंडळांसह सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातील तीस विद्यार्थी-विद्यार्थिनी
सहभागी झाले. मुख्य इमारतीपासून ते वि.स. खांडेकर भाषा भवनपर्यंत निघालेल्या या
दिंडीमुळे विद्यापीठातील अवघे वातावरण नादमय होऊन निघाले. दिंडी भाषा भवन येथे
पोहोचल्यानंतर सभागृहामध्येही पारंपरिक वारकरी भजनांचेही मोठ्या भक्तीमय वातावरणात
सादरीकरण झाले.
या मराठी भाषा संवर्धन
पंधरवड्याअंतर्गत ग्रंथ प्रकाशन, युनिकोड कार्यशाळा, लेखक-विद्यार्ती संवाद,
परिसंवाद, प्रमाण मराछठी लेखन कार्यशाळा आणि म.सु. पाटील समीक्षा पुरस्कार वितरण
सोहळा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment