Friday, 10 January 2020

समकालीन राजकीय समस्यांचा विद्यापीठीय व्यवस्थेने वेध घेणे आवश्यक: खासदार प्रा. संजय मंडलिक



शिवाजी विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात उद्घाटनपर मार्गदर्शन करताना खासदार प्रा. संजय मंडलिक. व्यासपीठावर डॉ. रविंद्र भणगे, प्रा. भारती पाटील, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्राचार्य डॉ. प्रमोद पवार, डॉ. विलास आवारी, डॉ. बाळासाहेब भोसले.

शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागाच्या राष्ट्रीय चर्चासत्रात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.

राज्यशास्त्र अधिविभागाच्या दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उत्साहात उद्घाटन
कोल्हापूर, दि. १० जानेवारी: सद्यस्थितीत राजकीय क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील समकालीन समस्यांचा विद्यापीठीय व्यवस्थेने वेध घेऊन त्या अनुषंगाने संशोधक व विद्यार्थ्यांना अभ्यासाला प्रेरित करावे आणि नागरिकांना सुजाण बनविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त राज्यशास्त्रातील समकालीन समस्या या विषयावर आयोजित दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषद यांचे ३७ वे अधिवेशन अशा संयुक्त समारंभाचे उद्घाटक म्हणून प्रा. मंडलिक बोलत होते. विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर भाषा भवन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.
प्रा. मंडलिक म्हणाले, सध्या देशभरात एक प्रकारचे अनिश्चिततेचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजमाध्यमांमुळे वस्तुस्थिती आणि विपर्यास यातील भेद लक्षात न आल्याने गोंधळात भर पडते आहे. या पार्श्वभूमीवर या साऱ्या वातावरणामध्ये समाजाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाची आहे. विभागाच्या विद्यार्थ्यांना या परिस्थितीचे योग्य आकलन करता आले, तर त्याचे प्रतिबिंब त्यांचा अभ्यास व संशोधनात उमटेल. त्या दृष्टीने विभागाने समकालीन समस्यांचा वेध घेऊन एकूणच राजकारणाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घेणेही आवश्यक आहे. माध्यमांनीही ही सारी परिस्थिती संयमाने हाताळणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागाचे माजी विद्यार्थी असलेल्या प्रा. मंडलिक यांनी आपल्या विद्यार्थी दशेतल्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, खरे तर विद्यापीठीय राजकारणात स्टुडंट कौन्सिलच्या माध्यमातून प्रवेश करण्यासाठी म्हणून कायद्याचा अभ्यास सोडून राज्यशास्त्र विभागात प्रवेश घेतला. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम सुरूच ठेवले, मात्र इथल्या शिक्षकांनी अभ्यासाची कास मला सोडू दिली नाही. पहिल्या वर्षी बी प्लस एका टक्क्याने हुकला. दुसऱ्या वर्षी तो प्राप्त करण्यासाठी डी.यु. पवार सर, शिवाजीराव मोरे सर आदींनी प्रोत्साहित केले. या शिक्षकांमुळेच माझ्यासह प्रा. जयंत पाटील, वैभव नायकवडी, प्रा. भणगे वगैरे आम्ही प्राध्यापक होऊ शकलो. याच कालखंडात आमची राजकीय दृष्टीने शैक्षणिक जडणघडण झाली. इथल्या मार्गदर्शनामुळेच सहकार, समाजकारण आणि राजकारणात यशस्वी होऊ शकलो. राज्यशास्त्र विभागात मिळालेल्या आत्मविश्वासामुळेच संसदेत प्रश्न विचारण्याची ताकद माझ्यात निर्माण झाली. त्याबद्दल मी या विभागाचा सदैव कृतज्ञ आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, राज्यशास्त्र हा काही एकल पद्धतीने शिकण्याचा अगर शिकविण्याचा विषय नाही. राज्यशास्त्राच्या विविध शाखा अन्य अनेक विषयांना जाऊन मिळाल्या आहेत. समकाळात तर डिजीटल पॉलिटिक्स ते अॅनालिटिक्स अशी माहिती संवाद तंत्रज्ञानाची जोड देऊन या विषयाचा अभ्यास होणे आवश्यक आहे. गणितापासून ते संख्याशास्त्रासारख्या विषयांची या विश्लेषणासाठी मदत घेतली जात आहेत, त्याला आता या नवतंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. रविंद्र भणगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. बाळासाहेब भोसले यांनी आभार मानले. यावेळी व्यासपीठावर अधिवेशनाच्या समन्वयक डॉ. भारती पाटील, संमेलनाध्यक्ष डॉ. विलास आवारी आणि राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य प्रमोद पवार उपस्थित होते. यावेळी परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक, संशोधक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment